मंगळवार, १३ सप्टेंबर, २०१६

7/12 वर पतीच्या नावाबरोबर आता पत्नीचेही नाव शासने लक्ष्मी मुक्ती योजना कार्यान्वित -प्रांताधिकारी प्रशांत पाटील शिये येथे संवादपर्व कार्यक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद

            

कोल्हापूर, दि. 13 :  सात-बारावर पतीच्या नावाबरोबरच पत्नीचे नावही नोंद करण्यासाठी शासने लक्ष्मी मुक्ती योजना कार्यान्वित केली असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वानी अग्रही रहावे, असे आवाहन करवीरचे उप विभागीय अधिकारी प्रशांत पाटील यांनी आज येथे बोलताना केले.
            येथील करवीर तालुक्यातील शिये येथील जय भवानी क्रिडा मंडळाच्यावतीने  आयोजित केलेल्या गणेशोत्सवात जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने संवादपर्व कार्यक्रमात उप विभागीय अधिकारी प्रशांत पाटील बोलत होते. संवादपर्व कार्यक्रमास माहिती अधिकारी एस. आर. माने, जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील, पंचायत समिती सदस्य जयसिंग काशिद, राजाराम साखर कारखान्याचे सदस्य किरण जाधव, सरपंच विश्वास पाटील, मंडळाचे अध्यक्ष निवास पाटील , यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली.
            महिलांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनविण्यासाठी लक्ष्मी मुक्ती योजना उपयुक्त ठरत असल्याचे स्पष्ट करुन उप विभागीय अधिकारी प्रशांत पाटील म्हणाले, या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुरुषांनी आपल्या पत्नीचे नाव सात-बारा उताऱ्यावर लावण्यासाठी तलाठी कार्यालयात पत्नीच्या सहमतीसह अर्ज करावा. अर्ज केल्यानंतर तात्काळ पत्नीचे नाव सात-बारावर लावण्यात येईल, असेही ते म्हणाले.
             नागरीकांना शासकीय सेवा तसेच सुविधा अधिक गतीमान पारदर्शक रित्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य शासनाने सेवा  हमी कायदा लागू केला आहे.  सेवा हमी कायद्यान्वये महसूल विभागासह अन्य सर्व संबंधित विभागाकडील कामा संदर्भातील सेवा जनतेला देण्यास प्राधान्य दिले आहे. महसूल विभागाने सेवा हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करुन जनतेला हव्या असणाऱ्या सेवा प्राधान्य क्रमाने उपलब्ध करुन देण्याची दक्षता घेतली असल्याचेही उप विभागीय अधिकारी प्रशांत पाटील म्हणाले. याबरोबरच जनतेला आपल्या तक्रारी इंटरनेट माध्यमाद्वारे शासनाकडे मांडण्याची सुविधा आपले सरकार या प्रणालीद्वारे राज्य शासनाने उपलब्ध करुन दिली असून, आपले सरकार पोर्टवरील सर्व प्रकरणांची 21 दिवस निर्गती करण्याचे निर्देशही दिले आहेत.
             स्त्रीभ्रुण हत्या हा समाजाला लागलेला कलंक असून हा कलंक पुसून टाकण्यासाठी सर्वानीच कटीबध्द व्हावे, असे आवाहन करुन उप विभागीय अधिकारी प्रशांत पाटील म्हणाले, समाजात मुलींना  सन्मानाची आणि समानतेची वागणूक देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आज राज्यातला मुलींचा जननदर हा 1000 मुलांच्या मागे 894 इतका आहे,  तर कोेल्हापूरात  मुलींचाजन्म दर 1000 मुलांच्या मागे 893 इतका आहे.  मुलांच्या बरोबरीनेच मुलींचा जन्मदर वाढावा, त्यांना चांगली शिक्षण मिळावा, त्यांच्या आरोग्यचा दर्जा उंचवावा यासाठी शासनाने बेटी बचाओ, बेटी पढाओ  तसेच  माझी कन्या भाग्यश्री अशा महत्वकांक्षी योजना सुरु केल्या आहेत. याबरोबरच समाजात होणारी स्त्रीभ्रुण हत्या रोखण्यासाठी  शासनामार्फत पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. 
            स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्याने भरवी कामगिरी केली असून जिल्ह्यातील तीन नगरपालिकांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे तर 9 नगरपालिकापैक 8 नगरपालिका हागणदारीमुक्त बनल्या आहेत. जिल्ह्याच्या गावागावात स्वच्छतेची मोहिम प्रभावीपणे राबविली जात असून नजिकच्या काळात संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी गावकऱ्यांनी स्वच्छ महाराष्ट्र अभियानात सक्रीय व्हावे, असे आवाहनही उप विभागीय अधिकारी प्रशांत पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी जलयुक्त शिवार अभियान, पंतप्रधान पीक विमा योजना, सामाजिक सहाय्याच्या योजना, प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियान, तंटामुक्त अभियान अशा विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.
गणेशोत्सवात संवादपर्व उपक्रमाद्वारे शासन राबवित असलेल्या विविध विकास तसेच कल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उदेशाने शासनाने सुरु केलेंल्या संवादपर्व उपक्रमाविषयी माहिती अधिकारी एस. आर. माने यांनी माहिती सांगितली.
प्रारंभी सरपंच विश्वास पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत करुन मंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच गावाच्या अडीअडचणी विषद केल्या. या संवादपर्व कार्यक्रमास गामकामगार तलाठी यु.एन.लांबोरे, मान्यवर पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित  होते.
000000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.