मंगळवार, २७ सप्टेंबर, २०१६

महालक्ष्मी मंदिरात जिल्हा प्रशासनातर्फे स्वच्छता






कोल्हापूर दि.28: शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरात प्रशासनाच्यावतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलीस अधिक्षक प्रदिप देशपांडे महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी स्वत: आघाडीवर राहून या मोहिमेचे नेतृत्व केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांच्या हस्ते नवरात्रौत्सव काळात येणाऱ्या महिलांसाठी मंदिराच्या उत्तर दरवाजाजवळ आयसीआयसीआय बँकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या हिरकणी कक्षाचे उद्घाटनही करण्यात आले.
        या मोहिमेत आमदार चंद्रदिप नरके ही सहभागी झाले यावेळी अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे, शहर पोलीस उपाधिक्षक भरतकुमार राणे, पोलीस उपधिक्षक अमरसिंह जाधव, देवस्थान समितीचे सचिव विजय पवार, नगरसेवक अजित ठाणेकर, पोलीस निरिक्षक अनिल देशमुख यांच्यासह अधिकारी, कर्मचारी देवस्थान समितीचे सदस्य यांची उपस्थिती होती.
        नवरात्रौत्सव काळात मंदिर आणि परिसरात प्लास्टिक बंदीचा निर्णय घेण्यात आला असून हा निर्णय काटेकोरपणे पाळला जावा यासाठी प्रशासनाच्यावतीने भाविक  आणि दुकानदारांना आवाहन करण्यात आले आहे. प्लास्टिक बंदीला दुकानदारांनीही सहमती दिली असून प्लास्टीक पिशवी ऐवजी कापडी  पिशवी वापरण्यात येणार आहेत. या उपक्रमांसाठी आयसीआयसीआय बँकेतर्फे 10 हजार पिशव्या दुकानदारांना वितरीत करण्यात आल्या.
        आज राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेला जिल्हाधिकाऱ्यांनी मंदिराच्या आवारातील उत्तर दरवाजाजवळ असणाऱ्या जनरेटररुम जवळील गटारीपासून सुरुवात केली. स्वत: जिल्हाधिकारी डॉ. सैनी आणि पोलीस अधिक्षक प्रदिप देशपांडे यांनी जुन्या वायरिंग खाली असणारी घाण स्वच्छ केली. पाहता पाहताच स्वच्छता अभियानात भाग घेण्यासाठी जमा झालेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी हातात झाडू, सुपल्या, कचराकुंड्या घेऊन मंदिर परिसरात स्वच्छतेला सुरुवात केली. महालक्ष्मी उद्यानाजवळील साचलेल्या झावळ्या, गवत, कचरा, पालापाचोळा स्वच्छ केला गेला. नगारखाना स्वच्छ केला. मंदिर परिसरातील दुकानांखालील असणारा कचरा काढला, संपुर्ण मंदिर यावेळी स्वच्छ करण्यात आला.  मंदिराच्या आवारातील स्वच्छते दरम्यान सापडलेले कासव कळंबा तलावात सोडण्यासाठी देण्यात आले. प्रशासनातर्फे ही स्वच्छता मोहिम राबविली जात असतानाच दर्शनासाठी मंदिरात आलेल्या भाविकांनीही यामध्ये सहभाग घेतला. स्वयंसेवी संस्थांनीही यामध्ये सहभाग घेतला. स्वच्छता अभियानानंतर जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक आणि महानगर पालिका आयुक्त यांनी संपुर्ण परिसराची पुन्हा पाहणी केली आणि समाधान व्यक्त केले.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.