कोल्हापूर
दि. 8 : उपलब्ध
पाण्याचा काटकसरीने आणि आवश्यक तेवढाच वापर करुन शेती उत्पादन वाढविण्यासाठी प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना उपयुक्त असून यंदा या योजनेसाठी जिल्ह्यास 7 कोटीची तरतूद करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी दिली.
राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने गणेशोत्सवात संवादपर्व हा उपक्रम राज्यभर राबविला जात असून, कोल्हापूर जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांच्या सहकार्याने संवादपर्व कार्यक्रमातून सामाजिक जाणिवजागृतीची, प्रबोधनाची श्रेष्ठ परंपरा पुढे नेण्यास प्राधान्य दिले आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने कागल तालुक्यातील मौजे सांगाव येथे श्री छत्रपती शिवाजीराजे आर. पी ग्रुप तरुण मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या गणेशोत्सवात संवादपर्व कार्यक्रमात जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी बोलत होते. यावेळी माहिती अधिकारी एस. आर. माने, कागलचे पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, उपनिरीक्षक डी.बी. वाघचौरे, मंडळाचे अध्यक्ष राहूल पाटील, कार्याध्यक्ष संदीप पाटील आदिजण उपस्थित होते.
पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा जास्तीत जास्त उपयोग करुन घेण्यासाठी प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना उपयुक्त ठरत असल्याचे स्पष्ट करुन श्री. मास्तोळी म्हणाले, ही योजना गतवर्षापासून राबविण्यात येत असून, अत्यल्प भूधारकांकरीता 45 टक्के व सर्वसाधारण भूधारकांकरीता 35 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. मात्र या योजनेचा लाभ घेण्यास 7 सप्टेंबरपासून सुरुवात झाली असून ही मुदत 6 ऑक्टोबर 2016
पर्यंत आहे. शेतकऱ्यांनी आपला अर्ज मुदतीत ऑनलाईन भरावा असे आवाहनही त्यांनी केले. या योजनेची सविस्तर माहिती शासनाच्या www.mahaari. gov. in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठीसाठी संकेतस्थळासह मंडल, तालुका, उपविभागीय कृषि अधिकारी, यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.
गावागावात पाणीसाठे निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान हा क्रांतीकारी उपक्रम राबविला असून, जिल्ह्यात गेल्यावर्षी 69 गावात हे अभियान प्रभावीपणे राबविल्याने या गावांमध्ये चांगला पाणीसाठा निर्माण झाला आहे. यंदा या अभियानांतर्गत 20 गावांची निवड केली असून या गावांमध्येही हे अभियान गतिमान करण्यास प्राधान्य दिले आहे. जिल्ह्यात पावसाच्या पाण्याचा थेंब न थेंब अडवून जमिनीत मुरविण्यास कृषि विभागाचे सर्वोच्च प्राधान्य राहील असेही श्री. मास्तोळी यावेळी म्हणाले.
प्रारंभी मंडळाचे अध्यक्ष राहूल पाटील यांनी स्वागत केले. माहिती अधिकारी एस. आर. माने यांनी संवादपर्व या उपक्रमाची संकल्पना विषद करुन गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या प्राधान्यक्रमाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याबाबत गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच गावकऱ्यांनी योगदान द्यावे असे सांगितले.
यावेळी मंडळाचे पदाधिकारी, प्रतिष्ठीत नागरिक, गणेशभक्त आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.