सोमवार, २६ सप्टेंबर, २०१६

मरावे परि अवयवदान करुन उरावे दिव्यांग बांधवांचा निर्धार





        कोल्हापूर, दि. 26 : राज्यात राबविण्यात आलेल्या महा अवयवदान अभियानाला प्रतिसाद देत कोल्हापूरातील 50 दिव्यांग बांधवांनी मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प करुन अवयवदानाची समत्तीपत्रे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याहस्ते छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे अधीष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याकडे सुपूर्द केली आणि 'मरावे परि अवयवदान करुन उरावे' असा निर्धार जाहिर केला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात कोल्हापूर जिल्ह्याचा फार मोठा नावलौकिक आहे. या परंपरेला अनुसरुनच दिव्यांग बांधवांनी अवयवदान अभियानाला प्रतिसाद देत राबविलेला हा उपक्रम भारतातील पहिला आणि दिशादर्शक असा उपक्रम असल्याचे प्रतिपादन केले.
            जिल्हाधिकारी कार्यालयात प्रहार अपंग क्रांती संघटनेच्यावतीने 50 दिव्यांग बांधवांनी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याहस्ते छत्रपती शाहू महराज वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना अवयवदानाची समत्तीपत्रे सुपूर्त केली. यावेळी त्यांना जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांच्याहस्ते डोनरकार्ड प्रदान करण्यात आले.
            पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन कि बात कार्यक्रमामधून अवयवदान अभियानाला चालना दिली. राज्य शासनानेही महा अवयवदान अभियान राबवून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. याला प्रतिसाद देत कोल्हापूरातील दिव्यांग बांधवांनी अवयवदानाची समत्तीपत्रे छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाकडे सुपूर्त केली. हा उपक्रम संपूर्ण समाजासाठी आदर्श व दिशादर्शक असल्याचे सांगून जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी जिल्ह्यात 25 ते 27 लाख प्रौढ लोकसंख्या असून तेवढी डोनरकार्ड वितरीत व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. दिव्यांग बांधवांशी चर्चा करत असताना त्यांनी समाजाला मदत करायची इच्छा असणारे व गरज असणारी यांची सांगड घालण्याचे काम आपण करु . ज्या दिव्यांगांना कृत्रिम अवयवांची गरज आहे अशांची यादी करुन दिल्यास निश्चितपणे त्यांना मदत केली जाईल.
            डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिव्यांग बांधवांचा हा उपक्रम म्हणजे अवयवदानाच्या अभियानातील आदर्श असून त्यातून समाजात मोठ्या प्रमाणात जनजागृती होईल असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक अपंग प्रल्हार क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवदत्त माने यांनी केले. यावेळी अपंग व्यवसाय प्रशिक्षण योजनेचे श्री. देवडे, संघटनेचे कार्यध्यक्ष विकास चौगले, तुकाराम पाटील, शैलेश सातपुते, संदीप दळवी, संजय जाधव, प्रशांत म्हेत्तर, रामचंद्र वडेर, सुरेश ढेरे, नलिनी दवर,रंजना गुलाईकर यांच्यासह दिव्यांग बांधव उपस्थित होते.

 00 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.