रविवार, ११ सप्टेंबर, २०१६

जमिनीबाबतचे ब्रिटीशकालीन कायदे बदलणार - महसूल मंत्री चंद्रकांत पाटील


              



पन्हाळा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन
कोल्हापूर दि. 10: शेतकऱ्यांची सर्वात जास्त संबधित महसूल विभाग असून महसूल विभागाने शेतकऱ्यांच्या जमिनीचे वाद सोडवून दिले पाहिजेत. यासाठी जमिनी संबधित ब्रिटीशकालीन कायदे बदलण्यासाठी प्रयत्नशिल असून डिसेंबर मध्ये होणाऱ्या अधिवेशनात महसूलचे  10 कायदे असतील यासाठी महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी आपण स्वत: प्रयत्नशिल असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
उपविभागीय अधिकारी कार्यालय पन्हाळाच्या नूतन प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन समारंभ महसूल मंत्री  चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार राजू शेट्‌टी होते. यावेळी आ. सतेज पाटील, आ. सत्यजित पाटील, आ. चंद्रदिप नरके, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा पोलिस अधिक्षक प्रदिप देशपांडे,  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता एस. एस. साळुंखे, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, नगराध्यक्ष असिफ मोकाशी, पंचायत समिती सभापती सुनिता पाटील, उपविभागीय अधिकारी रविंद्र खाडे, माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील, गोकुळचे संचालक बाबा देसाई  यांची प्रमुख उपस्थिती होती.
नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या क्षेत्राबाहेर अनियंत्रीत विकास सुरु आहे. त्याला नियंत्रित करुन नियोजनबध्द विकास करण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
जुन्या आणि पडक्या इमारतीतून उपविभागीय कार्यालयासाठी उत्कृष्ट इमारत उभी केल्याबद्दल उपविभागीय अधिकारी रविंद्र खाडे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांचे अभिनंदन करुन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रशासकीय रचनेत कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी इमारत चांगली वातावरण प्रसन्न असणे आवश्यक आहे. या दृष्टीने उपविभागीय कार्यालय पन्हाळाची इमारत अतिशय चांगली झाली असून यातून जनतेची कामेही गतीने झाली पाहिजेत.
शेतकऱ्यांच्या जमिनींचे वाद महसूल विभागाने सोडविले पाहिजेत असे सांगून महसूल मंत्री म्हणाले ,  ब्रिटीशकालीन कायदे बदलण्यासाठी प्रयत्नशिल आहे. डिसेंबर मध्ये होणाऱ्या अधिवेशानात महसूल विभागाचे 10 कायदे असतील जनतेच्या सोईसाठी सातबारा ऑनलाईन देणे सुरु असून यामध्ये काही ठिकाणी अडथळे निर्माण होत आहेत. यासाठी हाती सातबारा देण्याची मुदत सप्टेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे. पण याबरोबरच सर्कल कार्यालयामध्ये वर्कस्टेशन निर्माण करुन देण्यात येत आहे. यात राज्यात 68 टक्के तर जिल्ह्यात 76 टक्के काम झाले आहे. यातून ऑनलाईन सातबारा कार्यप्रणाली लवकरच संपुर्णत: सक्षम होईल.
     रस्त्यांची कामे वेगाने पुर्ण करण्यात येत असून सार्वजनिक बांधकामकडील 86 हजार रस्त्यांचा समावेश आहे. त्यामुळे येत्या काळात प्रत्येक गाव, वाडी मुख्य रस्त्यांशी जोडली जाईल.
     पन्हाळ्याचे विद्रुपीकरण होऊ नये यासाठी पन्हाळा परिसरातील गावांचा स्वतंत्र विकास आराखडा होणे आवश्यक असल्याचे सांगून खासदार राजु शेट्टी यांनी विकास आराखड्यात जनतेला विश्वासात घेणे आवश्यक आसल्याचे स्पष्ट केले. पन्हाळा तालुक्यातील नद्यांवरील केटीवेअर जिर्ण झाले असून त्याठिकाणी पर्यायी पुल तयार होणे, पन्हाळगडाच्या दोन्ही बाजुच्या गावंामधील रस्ते सुस्थितीत होणे आवश्यक असल्याचे तसेच गुंठेवारीत घरे बांधतांना रस्त्यांचे नियोजन होणे आवश्यक आहे असेही सांगितले.
     अधिकार जास्त असलेल्या महसूल विभागाचे सक्षमीकरणही अधिक होणे आवश्यक असल्याचे सांगून आमदार सतेज पाटील यांनी नवीन तालुक्यांची पुनर्रचना करताना जनता आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्याची गरज व्यक्त केली. यावेळी त्यांनी तुकडेबंदी जमिन कायद्यात सुधारणा होणे आवश्यक असल्याचे सांगून साताबाराचे काम ऑफलाईन व्हावे, जळीत नुकसानग्रस्तांना मिळणाऱ्या मदतीत वाढ होणे आवश्यक असल्याचे सांगितले तसेच नगरपालिकेच्या जुन्या इमारतीत व्यायामशाळा सुरु झाल्यास आमदार फंडातून साहित्य खरेदीसाठी 10 लाखांचा निधी देऊ असे स्पष्ट केले.
     आमदार चंद्रदिप नरके यांनी नविन सुसज्ज इमारतीतून लोकांच्या कामाचा निपटाराही जलद व्हावा असे सांगून पन्हाळ्याला येण्यासाठी एकच रस्ता आहे. यावर दरडी कोसळू लागल्यास प्रमुख रस्ता बंद होईल. त्यामुळे दुसरा रस्ता तातडीने मंजूर करावा, दुर्ग संवर्धानात पन्हाळा आणि गगनगड यांचा समावेश असावा अशी मागणी केली. तसेच प्रादेशिक आराखडा तयार करत असताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन तयार करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.
     आमदार सत्यजित पाटील यांनी प्रशासकीय इमारत दर्जेदार असणे, कार्यसंस्कृती कार्यक्षमता या दोहोंच्या दृष्टीने आवश्यक असल्याचे सांगून महसूल खात्याला प्रत्येक गावात चांगल्या चावडीची आवश्यकता व्यक्त केली. पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषद असल्याने विकास आराखडा तयार करुन पर्यटनाला चालना द्यावी, मंडल रचनेची पुनर्रचना व्हावी, महसूल विभागातील रिक्त जागा भराव्यात अशी मागणी करुन अनेक वर्ष रखडलेली पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर केल्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले.
     जिल्हाधिकारी डॉ अमित सैनी यांनी पन्हाळा येथील उपविभागीय कार्यालयाची नूतन वास्तू म्हणजे जिर्ण इमारतीच्या उत्कृष्ट जिर्णाेध्दाराचे आदर्श उदाहरण असल्याचे सांगून राधानगरी, भुदरगड, चंदगड आणि शाहुवाडी या ठिकाणची उपविभागीय कार्यालये होणे आवश्यक असल्याचे सांगितले.  जिल्ह्यातील पाच तहसिल कार्यालयांसाठी विशेष मंजूरी आणि चावड्यांसाठी टप्प्याटप्प्याने विकास यातून महसूल प्रशासनात कोल्हापूर जिल्हा आदर्श मॉडेल व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
     प्रातांधिकारी रविंद्र खाडे यांनी 37 लाख रुपये खर्चून ही इमारत उभी करण्यात आल्याचे सांगून यामध्ये रेकॉर्ड रुम, संरक्षक भींत, मिटींग हॉल यांची काम होणे आवश्यक आहे.  तसेच इमारती शेजारील धोकादायक डी.पी हालविणेही आवश्यक असल्याचे सांगितले.
     प्रास्ताविक रविंद्र खाडे यांनी केले, स्वागत जिल्हाधिकारी डॉ सैनी यांनी केले तर आभार उपविभागीय अधिकारी सुचेता शिंदे यांनी मानले.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.