सोमवार, १ मार्च, २०२१

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 


कोल्हापूर, दि. 1 (जिल्हा माहिती कार्यालय) : महिला व बाल विकास विभागातर्फे देण्यात येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती/संस्थांनी आपले परिपूर्ण प्रस्ताव 13 मार्च पर्यंत जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयास सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला  व बाल विकास अधिकारी श्रीमती एस.डी.शिंदे यांनी केकले आहे.

महिला व बाल विकास विभागातर्फे महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला व संस्थांना दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरविण्यात येते. सन 2015-16,2016-17,2017-18,2018-19,2019-20 या वर्षीच्या पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती/संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

राज्यस्तरीय पुरस्कार-  1 लाख 1 रूपये रोख, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ. महिला व बाल विकास क्षेत्रात किमान 25 वर्षाचा सामाजिक कार्याचा अनुभव असावा. ज्या महिलांना जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुरस्कार, दलितमित्र पुरस्कार अथवा सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त झाला आहे, त्या महिला तो पुरस्कार मिळाल्याचे 5 वर्षापर्यंत राज्यस्तरीय पुरस्करासाठी पात्र राहणार नाहीत.

विभागीय पुरस्कार- 25 हजार 1 रूपये रोख, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ. महिला व बाल विकास क्षेत्रात संस्थेचे किमान 7 वर्षे कार्य असावे. नोंदणीकृत संस्थेस दलित मित्र पुरस्कार प्राप्त नसावा. संस्था राजकारणापासून अलिप्त असावी. तसेच तिचे कार्य व सेवा ही पक्षातील व राजकारणापासून अलिप्त असावी.

जिल्हास्तरीय पुरस्कार -  10 हजार 1 रूपये रोख, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ. महिला व बाल विकास क्षेत्रात किमान 10 वर्षे सामाजिक कार्य असावे. ज्या महिलांना दलित मित्र पुरस्कार किंवा सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळालेला आहे, त्या महिलांना हा जिल्हास्तरीय पुरस्कार अनुज्ञेय राहणार नाही.

वरील प्रमाणे अर्हता असणाऱ्या इच्छुक व्यक्ती/संस्थांनी अर्हतेशी संबंधित आवश्यक कागदपत्रे तसेच खालील प्रमाणपत्रे/ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कार- चारित्र्य चांगले असल्याबाबत, कोणताही फौजदारी तसेच सार्वजनिक संपत्तीचा अपहार केल्याबाबतचा गुन्हा दाखल नसल्याचे पोलीस अधीक्षक यांचे प्रमाणपत्र. प्रस्तावधारकाने महिलांसंबंधित केलेल्या सामाजिक कार्याची तपशीलवार माहिती. वृत्तपत्र कात्रणे, फोटो इत्यादी. सध्या कोणत्या पदावर कार्यरत आहेत. यापूर्वी कोणते पुरस्कार मिळाले आहेत त्याचा तपशील.

विभागीय स्तर पुरस्कार- संस्थेची माहिती व कार्याचा अहवाल. संस्थेचे पदाधिकारी यांचे चारित्र्य चांगले असल्याबाबत त्यांच्यावर कोणताही फौजदारी तसेच सार्वजनिक संपत्तीचा अपहार केले नसल्याबाबतची व संस्था राजकारणापासून अलिप्त असल्याचे पोलीस अधीक्षक यांचे प्रमाणपत्र. वृत्तपत्र कात्रणे, फोटो इत्यादी. संस्थेस यापूर्वी पुरस्कार मिळाला आहे काय ? असल्यास तपशील. संस्था नोंदणी प्रमाणपत्र व घटनेची प्रत.

इच्छुक व्यक्ती/संस्थांनी विहित नमुन्यातील अर्जासाठी तसेच अधिक माहितीसाठी महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.मुदतीनंतर येणाऱ्या प्रस्तावांचा कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही, असेही श्रीम. एस.डी.शिंदे यांनी सांगितले आहे.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.