कोल्हापूर, दि. 19 (जिल्हा माहिती
कार्यालय): जागतिक वारसास्थळ लाभलेल्या राधानगरी अभयारण्याची नवी ओळख लोगोच्या
माध्यमातून होईल. या नव्या लोगोमुळे एक दिशा मिळेल. संवर्धन आणि पर्यटन यामध्ये
समतोल राखला जावा, असे प्रतिपादन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी व्यक्त केले.
राधानगरी अभयारण्याच्या नव्याने केलेल्या
लोगोचे अनावरण श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्याहस्ते राधानगरी येथे काल करण्यात
आले. याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, पुराभिलेख विभागाचे
अभिलेखपाल गणेश खोडके, विभागीय वन अधिकारी विशाल माळी, लोगो निर्मिती करणारे सुनील
गरूड, इतिहास अभ्यासक राम यादव, ऋतुराज इंगळे, रवीराज कदम उपस्थित होते.
छत्रपती राजर्षी शाहू महाराज राखीव ठेवलेल्या
दाजीपूर परिसरातील जंगलाचे 1958 मध्ये राज्यातील पहिले अभयारण्य निर्माण करण्यात
आले. 1985 मध्ये त्याचा विस्तार करून राधानगरी अभयारण्य असे नामकरण करण्यात आले.
या अभयारण्याची ओळख निर्माण करणारा लोगो तयार करण्यासाठी विभागीय वन अधिकारी श्री.
माळी यांनी खुली स्पर्धा भरवून समिती नियुक्त् केली होती. लोगोतील त्रुटी दूर
करून कलाकार सुनील गरूड यांनी नवीन लोगो तयार केला आहे, अशी माहिती श्री. माळी
यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली.
नव्या लोगोमध्ये छत्रपती राजर्षी शाहू
महाराजांची प्रतिमा, राधानगरी अभयारण्याचे वैशिष्ट्य असणारा गवा, अंजन, बिबट्या,
राज्यप्राणी शेकरू, फुलपाखरू, पक्षी, राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या दप्तरी
इंग्रजी अक्षरामध्ये लिहीलेल्या अक्षरावरून राधानगरी हे शब्द इंग्रजीमध्ये तसेच
मराठीमधील शब्दाचा समावेश आहे. या अक्षरांसाठी पुराभिलेख विभागाचे श्री. खोडके
यांची मदत घेण्यात आली. लोगो बनवणारे श्री. गरूड यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री. सातपुते, श्री. खोडके, श्री. कदम,
श्री. इंगळे यांनीही मनोगत व्यक्त केले.
पत्रकार विक्रम रेपे यांनी सूत्रसंचालन केले तर
वनरक्षक अंबाजी बिराडे यांनी आभार मानले.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.