मंगळवार, २३ मार्च, २०२१

मुद्रांक शुल्क भरलेल्या दस्त नोंदणीचा कालावधी चार महिने असल्याने कार्यालयात गर्दी न करण्याचे आवाहन

 


 

कोल्हापूर, दि. 23 (जिल्हा माहिती कार्यालय): मुद्रांक शुल्क भरलेले उक्त दस्तऐवज नोंदणी अधिनियमानुसार दस्त निष्पादित केलेल्या दिनांकापासून चार महिन्यांच्या आत नोंदणीसाठी सादर करता येतात, त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी करू नये, असे आवाहन प्र.सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी एम.एस.भुते यांनी केले आहे.

महसुल वन विभाग, महाराष्ट्र शासन मुंबई यांचे दि. 29 ऑगस्ट, 2020 रोजीचे शासन राजपत्रानुसार, कोणत्याही स्थावर मिळकतीबाबतच्या अभिहस्तांरणपत्र किंवा विक्रीपत्राच्या, तसेच 29 वर्षापेक्षा जास्त कालावधीचे भाडेपट्टा या दस्ताऐवजांवर उक्त अधिनियामास जोडलेल्या अनुसूची 1 च्या अनुच्छेद 25 च्या खंड (बी) 36(iv) अन्वये अधिभारासह आकारणी योग्य असलेले मुद्रांक शुल्क  दि.01 सप्टेंबर 2020 पासून सुरु होणाऱ्या आणि दिनांक 31 डिसेंबर 2020 रोजी संपणाऱ्या कालावधीकरीता 3% तर दि. 01 जानेवारी 2021 पासून सुरु होणाऱ्या 31 मार्च 2021 रोजी संपणाऱ्या कालावधीकरिता 2% ने कमी केले आहे.

शासनाने दिलेल्या मुद्रांक शुल्काची सवलत दि. 31 मार्च 2021 अखेर पर्यत असल्याने, या संधीचा लाभ घेण्याकरीता जिल्ह्यातील एकूण 18 दुय्यम निबंधक कार्यालयात उक्त सवलत संपत असल्याने गर्दी होण्याची शक्यता आहे. माहे मार्च 2021 पर्यंत मुद्रांक शुल्क सवलतीचा उपरोक्त प्रमाणे लाभ घेण्याच्या दृष्टीकोनातून निष्पादित करून मुद्रांक शुल्क भरलेले उक्त दस्तऐवज नोंदणी अधिनियम 1908 चे कलम 23 नुसार दस्त निष्पादित केलेल्या दिनांकापासून चार महिन्यांच्या आंत नोंदणीसाठी सादर करता येते.

कोव्हिड - 19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता मार्च अखेर दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी करता, वरील प्रमाणे नोंदणी कायद्यातील तरतुदीचा लाभ घ्यावा, तसेच कोव्हीड-19 च्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार सुरक्षात्मक उपाययोजनांचे कार्यालयात पालन करावे, असेही आवाहन श्री.भुते यांनी केले आहे.

000000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.