कोल्हापूर, दि. 3 (जिल्हा माहिती कार्यालय) : प्रमोद
महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानंतर्गत जिल्ह्यात विविध क्षेत्रांमधील
सुशिक्षित बेरोजगारांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम लवकरच सुरु करण्यात येणार आहे. हा
कार्यक्रम नि:शुल्क असून, प्रशिक्षणाअंती प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. भविष्यात
नोकरी, स्वयंरोजगार, रोजगाराची संधी देखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, अशी
माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी माळी यांनी दिली.
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत
सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींसाठी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान
योजना (PMKUVA) व किमान कौशल्य विकास कार्यक्रम (DPC) योजनेची
अंमलबजावणी सुरु आहे.
होतकरु तरुणांना प्रशिक्षण, योग्य मार्गदर्शन
नसल्याने, तसेच आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने रोजगार निमार्ण करणे शक्य होत
नाही. तसेच त्यातील ज्ञानदेखील नसते. अनेक तरुण उच्च शिक्षण घेऊनही बेरोजगार
आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा कौशल्य
विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कोल्हापूर तर्फे विविध कार्यक्रम
घेऊन बेरोजगारांना प्रशिक्षण दिले जाते. कौशल्य विकास प्रशिक्षणाचा लाभ घेऊ
इच्छिणाऱ्या 15 ते 45 वयोगटातील सुशिक्षित बेरोजगार इच्छुक उमेदवारांनी विभागाच्या
www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी. तसेच ऑफलाईन नोंदणीसाठी जिल्हा कौशल्य विकास,
रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पागा इमारत, भवानी मंडप, कोल्हापूर येथील
कार्यालयास संपर्क साधावा.
सुशिक्षित बेरोजगारांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाची
माहिती जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औद्योगिक
विकास प्रशिक्षण संस्था यांनी संबंधित विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व
उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त श्री. माळी यांनी केले आहे.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.