कोल्हापूर दि. 12 (जिल्हा माहिती कार्यालय) :-
गतवर्षी कोरोना प्रतिबंधासाठी सर्वांच्या सहकार्याने राबविण्यात आलेलेल्या
उपक्रमाची राज्यस्तरावर नोंद घेऊन ते संपूर्ण राज्यात राबविण्यात आले. त्याच
प्रमाणे कोरोनाची दाहकता कमी करण्यासाठी सर्व घटकांनी लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन
आपले कुटुंब, समाज, जिल्हा सुरक्षित ठेवण्यासाठी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना आणि लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी
जिल्ह्यातील सरपंच, तहसिलदार, गटविकास अधिकारी,ग्राम समिती सदस्य यांच्याशी
जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी दूरदृश्य
प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी
बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अतीरिक्त जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी
उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, अधिष्ठाता डॉ. मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा
आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, करवीरचे प्रातांधिकारी वैभव नावडकर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, कोरोना
प्रतिबंधासाठी गतवर्षी ग्राम समित्यांनी उल्लेखनीय काम केले
आहे. पण आता आपल्या शेजारच्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण
लक्षात घेता येणाऱ्या काळात धोका टाळण्यासाठी पुन्हा सर्वांनी जागरुक राहून काळजी
घेणे गरजेचे आहे. सध्या मास्क वापरण्याचे प्रमाण कमी झाले असून
ही चिंतेची बाब आहे. गावात कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ग्राम समित्यांनी मास्क वापरणे, वारंवार हात
धुणे आणि सामाजिक अंतर पाळणे या त्री सुत्रीचा वापर करण्यासाठी गावातील लोकांमध्ये
प्रबोधन करावे. शाळा सुरु झाल्यामुळे मुले विना मास्क शाळेत
जाणार नाहीत तसेच लग्न, वाढदिवस यासह सार्वजनिकरित्या साजरे होणाऱ्या कार्यक्रमात
गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. ग्राम समित्यांनी यासाठी बैठका घेऊन नियोजन
करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी दिल्या.
लसीकरणात जिल्हा अग्रेसर ठेवा
लसीकरणामुळे प्रतिकारशक्ती वाढणार असल्याने 45 ते 59 वर्ष वयोगटातील
व्याधीग्रस्त नागरिकांनी आणि 60 वर्षावरील
ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे. जिल्ह्यात 150 केंद्रावर लसीकरणाची सोय
करण्यात आली असून ग्राम समित्यांनी, प्रभाग समित्यांनी आपल्या गावातील/प्रभागातील लोकांची यादी करुन त्यांचे लसीकरण करुन
घेण्यासाठी पुढाकार घ्यावा. 45 ते 59
वर्ष वयोगट व 60 वर्षावरील वयोगटात येणाऱ्या सरपंच, सेवा सोसायट्यांचे संचालक,
तालीम मंडळाचे कार्यकर्ते, तसेच मान्यवर नागरीकांनी पुढाकार घेऊन स्वत: लसीकरण
करुन घ्यावे. ज्या जिल्ह्यात या वयोगतील लोकांचे 31 मार्चपर्यंत 100 टक्के लसीकरण
पूर्ण होईल त्या जिल्ह्यात लसीकरणाचा पुढचा टप्पा सुरु करण्यात येणार असल्याने
जिल्हा लसीकरणामध्ये अग्रेसर ठेवण्यात सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी
यांनी केले.
पोलीस अधीक्षक श्री. बलकडे म्हणाले, कोरोनाचा
संसर्ग रोखण्यासाठी दक्षता घेणे महत्वाचे आहे. मास्क अनिवार्य असून विना मास्क
फिरणाऱ्यावर पोलीस विभागामार्फत कारवाई करण्यात येईल. कारवाई करणे हा पोलीस
विभागाचा उद्देश नसून कोरोनाला आळा घालून समाज, जिल्हा कोव्हिड पासून सुरक्षित
ठेवणे ठेवणे उद्देश असल्याचे ते म्हणाले. येणाऱ्या काळात गावात होणाऱ्या यात्रा, सण, जयंती यामध्ये गर्दी होणार
नाही याची दक्षता ग्रामसमित्यांबरोरच गावकऱ्यांनी घ्यावी असे आवाहनही त्यांनी
केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चव्हाण म्हणाले,
लोकप्रतिनिधी सामाजिक उत्तरदायित्व समजून
लसीकरणामध्ये सहभाग वाढवावा. लसीकरणाचे नियोजन करुन त्याप्रमाणे आपल्या गावातील
लोकांनी नोंदणी करावी. नोंदणी केलेल्या लोकांना लसीकरण केंद्रावर पाठवून त्यांची
लसीकरण पूर्ण होईल यासाठी त्यांनी आपले योगदान द्यावे.
आयुक्त डॉ. बलकवडे म्हणाल्या, प्रभाग
समित्यांनी त्यांच्या प्रभागात लसीकरणाचे नियोजन करावे. शहरात कोरोना रुग्ण आढळून
आल्यास त्याभागात कंटेन्मेंट झोन करण्याबाबत योग्यती कार्यवाही करावी. खासगी
हॉस्पिटल यांनी त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांची माहिती प्रशासनास द्यावी.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळे यांनी जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्ण, उपचार घेत
असलेल्या रुग्णांची माहिती दिली. तसेच यापुढे प्राथमिक आरोग्य केंद, म.न.पा.
दवाखाने, जिल्हा परिषदेकडील आरोग्य केंद्रावर सोमवार ते शनिवार लसीकरण केले जाईल.
तसेच लसीकरणासाठी केंद्री जादा वेळे सुरु ठेवण्यात येणार असल्याचे म्हणाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.