सोमवार, २२ मार्च, २०२१

पीसीपीएनडीटी अंतर्गत स्टिंग ऑपरेशनमधील डॉ. अरविंद कांबळे व गिरीष कुंभोजकर यांचा जामीन फेटाळला 31 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी

 


कोल्हापूर, दि. 22 (जिल्हा माहिती कार्यालय): पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील मातृसेवा हॉस्पिटलमध्ये जिल्हास्तरीय पथकामार्फत पीसीपीएनडीटी कायद्यान्वये स्टिंग ऑपरेशन करण्यात आले होते. अनधिकृत पोर्टेबल सोनोग्राफी मशिनव्दारे गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉ. अरविंद कांबळे व गिरीष कुंभोजकर यांचा जामिन अर्ज पन्हाळा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी फेटाळून 31 मार्च 2021 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

गोपनीय प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार 16 डिसेंबर 2020 रोजी पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत डॉ. अरविंद सिताराम कांबळे यांच्या कोडोली येथील मातृसेवा हॉस्पिटल येथे जिल्हास्तरीय पथकामार्फत पीसीपीएनडीटी कायद्यान्वये स्टिंग ऑपरेशन करण्यात आले. सदर महिला या दिवशी साडेपाचच्या सुमारास डॉ. कांबळे यांच्या मातृसेवा हॉस्पिटलमध्ये गेली. थोड्या वेळाने डॉ. कांबळे यांनी हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावर असणाऱ्या खोलीमध्ये पोर्टेबल सोनोग्राफी मशीनव्दारे महिलेची सोनोग्राफी करून तिच्या पोटातील गर्भ मुलगी असल्याचे सांगितले. या महिलेकडून त्याबाबतची रक्कम सोनोग्राफीपूर्वीच डॉक्टरने घेतली होती.

डॉ. कांबळे यांना सोनोग्राफी केंद्राची नोंदणी व गर्भपात केंद्राची नोंदणी यापूर्वी देण्यात आली होती. परंतु, 2016 मध्ये डॉ. कांबळे यांच्यावर गर्भपातासंदर्भातील गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या केंद्रास पुन:नोंदणी देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांची सोनोग्राफी मशीन संबंधित वैद्यकीय अधीक्षक तथा समुचित प्राधिकारी ग्रामीण रुग्णालय पन्हाळा यांच्यामार्फत सील करण्यात आले होते. असे असतानादेखील डॉ. अरविंद कांबळे यांनी दुसरे अनधिकृत पोर्टेबल सोनोग्राफी मशीन घेऊन त्याव्दारे गर्भलिंग निदान करत होते.

या प्रकरणी सर्व संबंधितांचे जाबजबाब व चौकशी पूर्ण करून वैद्यकीय अधीक्षक तथा समुचित अधिकारी ग्रामीण रूगणालय पन्हाळा यांच्यामार्फत डॉ. कांबळे व कुंभोजकर यांच्या विरूध्द पन्हाळा येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आले होते. 18 मार्च रोजी याबाबत प्रथम सुनावणी झाली. यावेळी दोन्ही आरोपींकडून जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. हा जामीन अर्ज फेटाळून दोघांना 31 मार्च पर्यंत न्यायालीयन कोठडी देण्याचा आदेश प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी प्रेरणा निकम यांनी दिला.

या स्टिंग ऑपरेशनमध्ये पोलीस उपअधीक्षक (गृह) सुनीता नाशिककर, पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी, पोलीस उपनिरीक्षक विभावरी रेळेकर, पोलीस अभिजीत घाडगे,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, पन्हाळा ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनंदा गायकवाड, पीसीपीएनडीटी वकील डॉ. गौरी पाटील, दिलिपसिंह जाधव, संजीव बोडके यांचा सहभाग महत्वाचा होता.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.