कोल्हापूर, दि. 22 (जिल्हा माहिती कार्यालय) : कोरोनाचा संसर्ग वाढू नये
यासाठी काळजी घेतली पाहीजे. ‘नो मास्क नो एन्ट्री’ या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी
करुन कोरोना प्रतिबंधासाठी सर्वच क्षेत्रातील प्रमुखांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन
पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केले.
कोरोना
प्रतिबंधात्मक उपाययोजना व नियोजनाबाबत पालकमंत्री श्री. पाटील यांच्या
अध्यक्षतेखाली महाराणी ताराराणी सभागृहात आज बैठक घेण्यात आली. या बैठकीला
जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, महापालिका
आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर जिल्हाधिकारी किशोर
पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके
उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.
पाटील म्हणाले, सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याबाबत काटेकोर
उपाययोजना करायला हव्यात. राज्याला कोल्हापूरने दिलेली ‘नो मास्क नो एन्ट्री’ या
मोहिमेची काटेकोर अंमलबजावणी व्हायला हवी. सर्वांनीच दक्षता घेतली पाहीजे. मागील
अनुभव पाहता आपण सर्वांनी काळजी घेऊन आपली जबाबदारी पार पाडावी. गांभिर्याने सर्व
क्षेत्रातील प्रमुखाने याबाबत दक्षता घ्यावी.
यंत्रणा सज्ज ठेऊन कोल्हापूर कोव्हिड मुक्त ठेऊ
जिल्हाधिकारी श्री.
देसाई म्हणाले, मागील वर्षी अतिशय शिस्तबध्द यंत्रणा राबविली होती. त्याचप्रमाणे
प्रतिबंधात्मक तयारीवर भर द्यावा लागेल. मास्कचा वापर, सामाजिक अंतर आणि
सॅनिटायझरचा वापर या त्रिसूत्रिवर भर द्यावा लागेल.
·
‘मास्क नाही तर प्रवेश नाही’ हा फलक लावून त्याची अंमलबजावणी हवी.
·
प्रवासी क्षमतेनुसार, नियमानुसार
वाहतूक हवी.
·
मास्क हवाच, अनिर्बंध्द वाहतूक नको.
·
50 टक्के क्षमतेनुसार हॉटेल चालवावेत, लॉकडॉऊनची वेळ येवू देऊ नका.
·
स्वस्त धान्य दुकानांवर गर्दी टाळावी, मास्कचा वापर हवा, पॉस मशिनसाठी
सॅनिटायझर वापरा.
·
लक्षणे दिसताच शासकीय रुग्णालयात कामगारांनी उपचारासाठी गेलं पाहीजे.
·
खासगी रुग्णालयांनी मागील बेडची संख्या तपासून तयारी ठेवावी, आरोग्य
कर्मचाऱ्यांचे लसीकरण व्हायला हवे.
·
मास्क शिवाय एसटीत प्रवासी नसावा याबाबत वाहकांना सूचना द्यावी.
·
शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षकाबरोबर विद्यार्थ्यांनाही मास्क हवा.
·
मंगल कार्यालय व्यवस्थापकांनी दक्ष राहून नियमांचे काटेकोर पालन करावे.
·
सर्व यंत्रणा सज्ज ठेवू आणि कोल्हापूर जिल्ह्याला कोव्हिड पासून मुक्त ठेवू.
ज्येष्ठांना लसीकरण नेऊन आधुनिक श्रावणबाळ व्हा- संजयसिंह चव्हाण
45 वर्षावरील बाधित तसेच
60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रावर नेऊन त्यांचे लसीकरण 31 मार्च पूर्वी
पूर्ण करावे आणि तरुणांनी आधुनिक श्रावणबाळ व्हावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी
अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले. खानावळी आणि हॉटेलमध्ये बैठक रचनेत बदल करावा.
समोरासमोर बसण्याऐवजी भिंतीकडेला तोंड करुन जेवण्यासाठी बसवावे. खासगी रुग्णालयात ‘मी
लस घेतली आहे, लस सुरक्षित आहे, ती आपणही घ्यावी’ असे फलक डॉक्टरांनी लावावेत. दुसरी
लाट रोखण्यासाठी लोक प्रबोधन, लोक चळवळ व्हायला हवी, असेही श्री. चव्हाण म्हणाले.
लॉकडाऊन नको तर प्रत्येकाने काळजी घ्या- शैलेश बलकवडे
लॉकडाऊन, संचारबंदी
नको असेल तर प्रत्येकांनी स्वत:ची आणि इतरांचीही काळजी घेतली पाहीजे. नियमांचे काटेकोर
पालन केले पाहिजे. त्याचे प्रबोधनही करावे. प्रशासनास मदत करावी, असे आवाहन पोलीस
अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले.
जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉ. योगेश साळे यांनी यावेळी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली. या बैठकीला
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.
एस. मोरे, विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांच्यासह रिक्षा संघटना, नाभिक संघटना, हॉटेल
मालक संघटना, रेशन दुकान संघटना, सिनेमागृह संघटना, क्रिडाई, चेंबर ऑफ कॉमर्स,
इंजिनिअरिंग असोसिएशन, कोल्हापूर मेडिकल असोसिएशन, पेट्रोल पंप असोसिएशन, एलपीजी
असोसिएशन, रिलायन्स मॉल, स्टार बझार, मार्केट यार्ड आदींचे पदाधिकारी उपस्थित
होते.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.