कोल्हापूर,
दि. 17 (जिल्हा माहिती कार्यालय) : स्त्री-भ्रूण हत्या रोखण्यासाठी नवीन
तंत्रज्ञानाचा वापर व्हायला हवा. दोषींना शिक्षेचे प्रमाण वाढण्यासाठी त्याबाबत
आवश्यक ती खबरदारी घेवून अभिमान वाटावा असं काम करण्याची आवश्यकता आहे. त्याबरोबरच
जनजागृतीची आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
संजयसिंह चव्हाण यांनी केले.
पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत आयेाजित
कार्यशाळेत उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल
माळी, डॉ. गोरख मंद्रुपकर, विधी व सेवा प्राधिकरणाचे न्यायाधीश पंकज देशपांडे, डॉ.
गीता पिल्लई, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक आदी उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक डॉ. वेदक यांनी
करून, ‘मुलीच्या जन्माचे स्वागत करू या, देश समृध्द बनवू या’ सेल्फी पॉईटबाबत
माहिती दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चव्हाण
म्हणाले, गर्भ लिंग निदान चाचणीच्या माहितीसाठी
तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी सायलेंट ऑबझर्व्हरचा वापर केला होता. जिल्ह्याने
यात खूप मोठे योगदान दिले आहे. मुलींचे प्रमाण वाढवण्यासाठी अजूनही खूप मोठा पल्ला
आपल्याला गाठायचा आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मुलींचे प्रमाण जास्त आहे.
आपण शिक्षित झालो पण सुशिक्षीत झालो का याचं उत्तर शोधावं लागेल.
छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी राबवलेल्या कायद्यांचा आजही अभ्यास करावा
लागेल. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी
करावी लागेल. स्त्री-भ्रूण हत्या रोखण्यासाठी जी प्रतिज्ञा घेतोय ती प्रामाणिकपणे
पाळली जातेय का याचा गांभीर्याने विचार करावा लागेल. सीमा भागात भ्रूण हत्या होते
का त्यावर लक्ष केंद्रीत करावे लागेल. सोनोग्राफी केंद्रांची तपासणी होणे आवश्यक
आहे. एखादी तरी स्त्री-भ्रूण हत्या रोखेन, ती होणार नाही यासाठी प्रत्येकाने
प्रयत्न करावा, हेच या कार्यशाळेचे फलित असेल, असेही ते शेवटी म्हणाले.
यावेळी कोडोली येथे स्टींग ऑपरेशन करून
डॉक्टरवर कारवाई करण्यात सहभागी झालेल्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी, पोलीस
उपनिरीक्षक विभावरी रेळेकर, पोलीस अभिजित घाडगे, पूजा सूर्यवंशी, गीता हसूरकर,
सुनील गायकवाड, डॉ. हर्षला वेदक, संजीव बोरगे, दिलीप जाधव, पीसीपीएनटीडी सल्लागार ॲड.
गौरी पाटील यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
यानंतरच्या सत्रात डॉ. मंद्रुपकर यांनी
पीसीपीएनडीटी व एमटीपी कायदा अंमलबजावणी व त्यातील अडथळे यावर मार्गदर्शन केले. शहाजी
लॉ कॉलेजचे प्राध्यापक डॉ. मौलाना शेख यांनी पीसीपीएनडीटी कायदा विश्लेषण या
विषयावर मार्गदर्शन केले. समाजसेविका प्रियदर्शनी चोरगे यांनी बाल लैंगिक अत्याचार
कायदा या विषयावर मार्गदर्शन केले. शेवटी डॉ. वेदक यांनी आभार मानले.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.