बुधवार, १० मार्च, २०२१

माविम व कृषी विज्ञान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन साजरा

 

 






कोल्हापूर, दि. 10 (जिल्हा माहिती कार्यालय): कृषी विज्ञान केंद्र तळसंदे व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन साजरा करण्या आला.

मेळाव्यास बँक ऑफ इंडियाचे जिल्हा अग्रणी व्यवस्थापक राहू माने, आय.डी.बी.आय. बँकेच्या माधवी कदम, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ संशोधक जयवंत जगताप आदी उपस्थित होते.               

मेळाव्याची सुरूवात स्वागत गीताने करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दीपप्रज्वलन करण्यात आले.

श्री. जगताप यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, आमच्या केंद्रामार्फत जिल्ह्यातील विविध शेती उपयोगी प्रशिक्षण आयोजित केले जाते. माविममधील बचत गटातील महिलांना विविध उद्योग व्यवसाय करणारे प्रशिक्षण दिले आहे. यावेळी झूम ॲपव्दारे बारामतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती शिंगाडे यांनी महिलांना मार्गदर्शन केले तसेच राहुरी, अहमदनगरचे प्रा. डॉ. बास्तेवाडे यांनी महिलांना शेती करत असताना होणारे काबाड-कष्ट कसे कमी होईल यासाठी विविध प्रकारच्या मशिनरी तयार करण्यात आलेल्या आहेत ते सांगितले.

माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंजाडे म्हणाले,  जिल्ह्यातील  गरीब, गरजू, मागासवर्गीय, विधवा, परीतक्ता, भूमिहीन महिला, अल्पभूधारक महिला वंचित महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून  महिला सक्षमीकरणाचे कार्य करीत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये माविम अंतर्गत 108 गावात, 1 महानगरपालिका 9 नगरपरिषदामध्ये 4198 बचत गटाच्या माध्यमातून 58811 महिलांचे संघटन करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात माविममार्फत  95 टक्के बचत गटांच्या  अंगावर 75.67 कोटी  रुपयांचे कर्ज  आह.   चालू आर्थिक वर्षाचा विचार करता या महिना अखेर 1561 बचत गटांना 40.60 कोटी रुपयांचा पतपुरवठा बँकेमार्फत  करण्यात आलेला आहे. तसेच 200 संयुक्त देयता समूह (JLG) यांना 3 कोटी रु. पतपुरवठा करण्यात आलेला आहे. नाबार्ड मार्फत शक्ती कार्यक्रम सुरु असून सर्व बचत टांना ऑनलाईन वाटप करण्यात आलेले आहे. जिल्हा नियोजन समितीकडून माविम स्थापित आधार उन्नती cmrc ला कापडी पिशव्यांचे 2 युनिट सुरु करण्यात आलेले आहेत. WASH कार्यक्रम अंतर्गत 6 सी एम आर सी मार्फत महिलांना स्वच्छता आरोग्याविषयी जनजागृती केली जाते .

      DAY NULM मधील शहरातील बचत गटातील महिलांना रोजगार संधी मिळावी महिलांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी याकरिता City Livlihood Centre (CLC) स्थापन करण्यात आलेली आहे. तरी सर्व महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे वाह करण्यात आले आहे. यावेळी जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्या देवून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या .

      श्रीमती कदम म्हणाल्या, आजच्या युगात स्त्री ही एकच महान शक्ती आहे. माविम सोबत नव्याने काम सुरु करण्यात आलेले आहे. माविम महिला सक्षमीकरणाकरिता चांगल्या प्रकारे काम करत आहे. भविष्यात असेच काम करत पुढे जावू, असेही त्या म्हणाल्या.

श्री. माने म्हणाले, महिला आर्थिक विकास महामंडळ हे जिल्ह्यात खरोखर बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे काम करत आहे. माविमच्या माध्यमातून बचत गटाला कोट्यवधीचे बँक कर्ज मिळवून दिले आहे. त्यांच्या उद्योग-व्यवसायाला चालना दिली आहे. बचत गटातील महिलांचे परतफेडीचे प्रमाणही चांगले आहे. माविममधील बचत गटातील महिलांचे विविध शासकीय विभागासोबत समन्वय आहे.

माविममधील जास्तीत-जास्त महिलांनी विमा पॉलिसी काढली आहे. बँक इंडिया मार्फत आर्थिक साक्षरता प्रशिक्षण वेळोवेळी दिले जाते. बचत गटामुळे महिलांचा आर्थिक स्तर      उंचावलेला आहे ही आनंदाची गर्वाची बाब आहे. बचत गटाला उद्योग व्यवसायाकरिता कर्ज उपलब्ध करून दिले जाईल,असे आश्वासनही त्यांनी  दिले. बचत गटातील महिला हे कर्ज उद्योग व्यवसायमध्ये गुंतवून कर्जाची 100 टक्के परतफेड करतील असे नियोजन करावे, असेही ते म्हणाले.

      जागतिक महिला दिनानिमित आयोजित पाककला स्पर्धेत विद्या गुरव प्रथम क्रमांक, सीमा पाटील द्वितीय क्रमांक, सुजाता शिंदे तृतीय क्रमांक, मृदुला पिळणकर दिपाली गायकवाड उत्तेजनार्थ क्रमांक काढण्यात आले.निबंध स्पर्धेत सारिका पाटील, पूनम साळुंके, संगीता एद, प्रियांका कांबळे, भाग्यश्री खोत यांनी क्रमांक पटकाविला. कोविड योध्दा म्हणून कोल्हापूरच्या रुक्मिणी शिंदे पेठवडगावच्या कविता सोळशे इचलकरंजीच्या मनीषा पाटील यांचा प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.

           उखाणा स्पर्धेतील अमिता पाटील, राजश्री चौगुले व आनंदी पाटील यांनाही प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. 

     शेवटी सुधीर सूर्यगंध यांनी मान्यवरांचे आभार मानले. ते म्हणाले, महिलांनी रोजच्या रोज डायरी वापरली पाहिजे जेणे करून आपण कशावर किती खर्च केले यांचा ताळमेळ लागला पाहिजे. सूत्रसंचालन दीपाली मस्के यांनी केले.

लेखाधिकारी विनायक कुलकर्णी, सहाय्यक संनियंत्रण अधिकारी उमेश लिंगनूरकर, लेखा सहाय्यक विजय कलकुटकी, असिस्टंट सारिका पाटील, मदतनीस जितेंद्र जाधव, सर्व लोकसंचलित साधन केंद्राच्या अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष, खजिनदार, व्यवस्थापक, लेखापाल, क्षेत्रीय समन्वयक क्षमता वृद्धी समन्वयक,उपजीविका समन्वयक सर्व सहयोगिनी उपस्थित होत्या. 

000000

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.