शिक्षकांच्या मदतीतून होणाऱ्या डायग्नोस्टीक
सेंटरची इमारत सुसज्ज, अद्ययावत बनवा
-
पालकमंत्री सतेज पाटील
*आवश्यकता भासल्यास जिल्हा नियोजन समितीमधून निधी
उपलब्ध करून देवू
कोल्हापूर, दि. 1 (जिमाका) : शिक्षकांच्या आर्थिक मदतीतून उभारण्यात येणाऱ्या
डायग्नोस्टीक सेंटरची इमारत सुसज्ज आणि अद्ययावत बनवा. यंत्र सामुग्रीसाठी निधी कमी
पडल्यास जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून देवू, अशी अशी ग्वाही
पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
या डायग्नोस्टिक सेंटरसाठी जिल्ह्यातील
शिक्षकांनी सुमारे तीन कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यासंदर्भात शिक्षकांसोबत
आज शासकीय विश्रामगृह येथे बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी
राहुल रेखावार, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.
आयसोलेशन हॉस्पिटलच्या परिसरामध्ये एक
सुसज्ज वैद्यकीय इमारत उभी करण्यासाठी,
जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी आपला एक दिवसाचा पगार दिला आहे. यातून सुमारे
तीन कोटीचा निधी जमा झाला असून यातून डायग्नोस्टीक सेंटरची उभारणी करण्यात येणार
आहे. यावेळी नियोजित ‘राजर्षी शाहू डायग्नोस्टीक सेंटर’ इमारत आराखड्याचे सादरीकरण
करण्यात आले. ही इमारत तीन मजल्यांची होईल या दृष्टीने आराखडा करा अशा सूचना
पालकमंत्री सतेज पाटील यांनी केल्या.
या डायग्नोस्टिक सेंटर मध्ये कमीत कमी
खर्चात आरोग्याच्या सर्व तपासण्या होण्यासाठी नियोजन करण्यात येईल. यामुळे
सर्वसामान्यांच्या सर्व तपासण्या माफक दरात होतील. इमारतीचे काम लवकरात लवकर पूर्ण
व्हावे यासाठी टेंडर प्रक्रिया आणि निधी हस्तांतरण लवकर करण्याची सूचनाही त्यांनी
बैठकीत केली. यावेळी त्यांनी शिक्षकांच्या सूचना जाणून घेतल्या.
0 0 0 00 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.