बुधवार, १७ नोव्हेंबर, २०२१

'विद्यार्थी संसद' सारखे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्ये व निवडणूक प्रक्रियेची माहिती द्यावी -मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

 

 





कोल्हापूर, दि. 17 (जिमाका): महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये 'विद्यार्थी संसद' (स्टुडंट पार्लमेंट) सारखे उपक्रम राबवून लोकशाही मूल्यांची व निवडणूक प्रक्रियेची प्रत्यक्ष माहिती विद्यार्थ्यांना करुन द्यायला हवी, असे आवाहन प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.

          मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर मधील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात काल विविध जिल्ह्यांतील प्राचार्यांसोबत बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, उप जिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, तहसीलदार शीतल मुळ्ये-भामरे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष तथा प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव प्राचार्या शुभांगी गावडे, सह सचिव प्राचार्य राजेंद्र शेजवळ, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

      मतदान प्रक्रियेत युवक व विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांबाबत श्री. देशपांडे यांनी प्राचार्यांकडून सूचना जाणून घेतल्या. तसेच निवडणूक आयोगाच्या वतीने महिलांसाठी उखाणा स्पर्धा, गौरी गणपती सजावट स्पर्धा आदी उपक्रमांच्या माध्यमातून मतदार जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. मतदार जनजागृतीमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचे आवाहन करुन ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी 'Voters Helpline App' मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन घेऊन आपापल्या कुटुंबातील सदस्यांची नावे मतदार यादीत असल्याची माहिती घ्यावी.  मतदार यादीत नाव नसल्यास अँपद्वारे नावनोंदणी करावी, असे महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांना सांगितल्यास 'कृतीतून शिक्षणाचे धडे' गिरवले जातील.  निवडणूक प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवायला हवा. 'ऍक्टिव्हिटी बेस्ड एज्युकेशन'  दिल्यास विद्यार्थ्यांना जीवन जगण्याची कौशल्ये मिळतील, असे त्यांनी आवर्जून सांगितले. निवडणूक साक्षरता मंच शाळांमध्ये स्थापन होण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

प्राचार्य अभयकुमार साळुंखे म्हणाले, निवडणुकांमध्ये बहुतांशी भागात केवळ 40 ते 50 टक्के मतदान होते, हे प्रमाण वाढणे अत्यंत आवश्यक आहे. सुशिक्षित वर्गातील मतदार मतदानाचा हक्क बजावण्यात मागे असताना दिसते. खरेतर सुशिक्षित, सुजाण माणसांनी स्वतः मतदान करुन इतरांना हा पवित्र हक्क बजावण्यासाठी प्रवृत्त करणे गरजेचे असल्याचे सांगितले.

 

 

 

संस्थेच्या सचिव तथा प्राचार्य शुभांगी गावडे यांनी आभार मानले.

तरुण मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणावर युवकांचा सक्रिय सहभाग असतो. यासाठी तरुण मंडळे व स्वयंसेवी संस्थांना मतदार नोंदणी प्रक्रियेत सहभागी करून घ्यायला हवे, अशी सूचना संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी केली.

विद्यार्थ्यांची शंभर टक्के मतदार नोंदणी पूर्ण करणाऱ्या महाविद्यालय व विद्यापीठांचे विशेष गुणांकन करावे, शाळांमध्ये निवडणूक लोकशाही मंच नियमित सुरु रहावा यांसह महत्वपूर्ण सूचना यावेळी उपस्थित प्राचार्यांनी  केल्या, यावर नक्कीच विचार केला जाईल, असे श्री. देशपांडे यांनी सांगितले.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.