मंगळवार, १६ नोव्हेंबर, २०२१

मतदार याद्यांचा विशेष सं‍क्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवा प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या सूचना

 





कोल्हापूर  दि. 16 (जिल्हा माहिती कार्यालय) : भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित जाहीर केलेला छायाचित्रांसह मतदार याद्यांचा विशेष सं‍क्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवून अचूक मतदार याद्या तयार कराव्यात, अशा सूचना प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज दिल्या.

            प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांनी मतदार  यादी विशेष  सं‍क्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम कामकाजाचा आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला. बैठकीस जिल्हाधिकारी राहुल रेखावार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

             श्री. देशपांडे म्हणाले, 1 नोव्हेंबर रोजी अस्तित्वात असलेली प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.  या यादीबाबत असणारे दावे व हरकती 20 डिसेंबर पर्यंत स्वीकारल्या जाणार  आहेत.  मतदार यादीबाबत असलेल्या हरकती व दावे निकाली काढून नवीन नोंदणी केलेल्या मतदारांचा समावेश करुन  जानेवारीस अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या यादीमध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहू नयेत यासाठी सर्वांनी खबरदारी घ्यावी. केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना याबाबत प्रशिक्षण देण्यात यावे.

            जिल्ह्यात मतदान केंद्रामध्ये वाढ झाली असेल किंवा मतदान केंद्राची जागा बदलली असेल तर तसा बदल मतदार यादीमध्येही झाला असल्याची खात्री करावी. मतदार यादी संदर्भातील कोणतीही कामे प्रलंबित राहणार नाहीत याची दक्षता संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशा सूचनाही श्री. देशपांडे यांनी दिल्या. मतदार यादीतील दुबार नावे वगळणे, मृत्यू झालेल्यांची नावे वगळणे तसेच मतदार यादीतील फोटोबाबतची प्रकरणे याबाबत आवश्यक खातरजमा करुन कार्यवाही करण्यात यावी. प्रत्येक गावात, महापालिका, नगरपालिकेच्या प्रत्येक वॉर्डात मतदार यादीचे वाचन करण्यात येऊन मयत नावे वगळण्याबाबत कार्यवाही करावी.

            मतदार याद्यांच्या विशेष सं‍क्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करावा. याबरोबरच शालेय, महाविद्यालय स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन करावे. बचत गट मेळाव्यामधून मतदार नोंदणीसाठी जागृती करावी, अशा सूचनाही प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांनी दिल्या.  

000000

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.