कोल्हापूर दि. 22 (जिमाका)
: जिल्हास्तरीय माता मृत्यू गुणवत्ता अभिवचन
समितीची सभा मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात
आली. या सभेमध्ये मागील वर्षापासून आज अखेर झालेल्या संस्था व सामाजिक स्तरावरील
एकुण 9 माता मृत्यूंचे सखोल अन्वेक्षण तज्ञांच्या
उपस्थित करण्यात आले.
सभेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, स्त्री रोग
(FOGSI) संघटनेच्या अध्यक्षा डॉ. निरुपमा सखदेव, जनरल सर्जन डॉ. रवि शेटये, भूलतज्ञ डॉ. विद्या पॉल, विकृती
विशेष तज्ञ डॉ. रविंद्र नामे, डॉ. विद्या
काळे, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. फारुख देसाई, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस
बी. थोरात आणि माता मृत्यू झालेल्या कुटुंबातील नातेवाईक उपस्थित होते.
यावेळी संजयसिंह चव्हाण म्हणाले, गरोदर मातांचे मृत्यू कमी करण्यासाठी समितीमध्ये
अवलोकन निष्कर्षानुसार सुचवलेल्या शिफारसी सर्व शासकीय व खासगी यंत्रणेच्या
कार्यक्षेत्रातील अधिकारी कर्मचारी
यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात व
त्यानुसार त्यामध्ये सुधारणा असल्याचे सनियंत्रण करावे. तसेच टाळता येणारे गरोदर
मातांचे मृत्यू संस्था स्तरावर होत असतील व त्यामध्ये गरोदरपणात, बाळंतपणाच्या उपचारामध्ये
निष्काळजीपणा केल्याचे समिती निष्कर्ष असल्यास, संबधित रुग्णालयाला नोटीस देणे,
प्रसुती व सुश्रृषा कायदा २००५ अंतर्गत नोंदणी स्थगित करणे, वारंवार त्याच चुका होत असल्यास वैद्यकीय व्यवसाय नोंदणी रद्द करण्याची शिफारस
मेडीकल कौन्सीलकडे करावी.
सभेच्या सुरुवातीला
माता मृत्यू झालेल्या नातेवाईकांकडून माता मृत्यू घटनेची माहिती घेण्यात आली.
त्यानंतर माता मृत्यू उपचारादरम्यान विविध स्तरावरील विलंब जसे कुटुंब स्तरावरील
विलंब, वाहतुक विलंब व आरोग्य संस्था स्तरावरील उपचाराबाबत विलंब या बाबत सखोल व
सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रसुतीपूर्व, प्रसुती दरम्यान व प्रसुती पश्चात
देण्यात येणाऱ्या सेवांची गुणवत्ता बाबत चर्चा करण्यात आली. सिझरचे प्रमाण कमी करण्यासाठी गरोदर माता समुपदेशन सत्रामध्ये
कोविड लसीकरण, आजारपण, आहार,
व्यायाम याबाबत माहिती दयावी, असे डॉ. सखदेव यांनी सांगितले.
तसेच माता मृत्यूच्या कारणांचा शोध घेवून त्या
टाळता येण्यासाठी उपाय योजनांचे
समाज प्रबोधन व्हावे व वैद्यकीय सेवेमध्ये सुधारणा व्हावी यासाठी व्यापक जनजागृती करण्यात
यावी. भविष्यात त्याच कारणांमुळे होणाऱ्या माता मृत्यूला प्रतिबंध करण्यासाठी
सामाजिक स्तरावरील प्रतिबंधात्मक उपाय योजना व उपचार स्तरावरील सुधारणात्मक उपाय
योजना याबाबत समितीने शिफारसी केल्या.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.