कोल्हापूर, दि. 19 (जि.मा.का.):
कोल्हापूर व इचलकरंजी नदी घाटावर सुर्यषष्ठी व्रत व पुजेसाठी देण्यात आलेली
परवानगी कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी
दौलत देसाई यांनी महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, इचलकरंजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी
यांना निर्देश दिले.
उद्या दि. 20 नोव्हेंबर
रोजी सायंकाळी व 21 नोव्हेंबर रोजी प्रात:काळी कोल्हापूर व इचलकरंजी पंचगंगा नदी
घाटावर सुर्यषष्ठी व्रत व पुजेचे आयोजन करण्यास काही अटी व शर्तीस अधीन राहून
परवानगी देण्यात आली होती. परंतु, दिवाळी उत्सव व हिवाळा लक्षात घेता या आजाराच्या
दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच नदी काठावर तलावाकाठी छट पुजे दरम्यान
दरवर्षी होणारी गर्दी लक्षात घेता या ठिकाणी गर्दीमुळे कोव्हिड-19 मार्गदर्शक
तत्वांचे विशेषत: सामाजिक अंतर राखणे इ. चे पालन छटपुजेसाठी येणाऱ्या भाविकांकडून
शक्य होईल असे दिसून येत नाही. त्यामुळे कोव्हिड-19 विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता
नाकारता येत नाही. तसेच विविध महानगरांमध्ये उदा. दिल्ली, मुंबई इ. शहरांमध्ये
सामुहिक छटपुजेस कोव्हिड-19 महामारीच्या अनुषंगाने बंदी/ कडक अटी घातलेल्या आहेत. त्याअनुषंगाने
कोव्हिड-19 चा संसर्ग रोखण्यासाठी यावर्षी छटपुजा आयोजनाबाबत खालील सूचना
करण्याबाबत सुचविले आहे.
नदी किनारी, तलावाकाठी
छटपुजेस होणारी गर्दी लक्षात घेता कोव्हिड-19 मार्गदर्शक तत्वांचे विशेषत: सामाजिक
अंतर राखणे इत्यादीचे पालन होणार नाही, त्याअनुषंगाने नदी किनारी, तालावाकाठी
छटपुजेची परवानगी देण्यात येणार नाही.
शहरी भागासाठी महानगरपालिका
क्षेत्रामध्ये विभाग स्तरावर (वॉर्ड) व
जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये तालुका स्तरावर छटपुजेसाठी परवानगी मागणाऱ्या
संस्थेस, कृत्रिम तलाव स्वखर्चाने बांधण्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडून
मान्यता घेण्यात यावी, तसेच छटपुजेनंतर कृत्रिम तलाव बुजवण्याची जबाबदारी संस्थेची
असेल. मात्र या ठिकाणी सामाजिक अंतर ठेवणे शक्य व्हावे म्हणून आवश्यक व्यवस्था
असावी.
कृत्रिम तलावाच्या ठिकाणी भाविकांची गर्दी जमू
नये यासाठी स्थानिक पातळीवर पोलीस विभागाची मदत घेण्यात यावी. तसेच अशा ठिकाणी
भाविकांना फक्त पुजेसाठी परवानगी असेल.
कृत्रिम तलावाच्या
ठिकाणी महानगरपालिका क्षेत्रामध्ये विभाग स्तरावर (वॉर्ड) व ग्रामीण भागामध्ये
तालुका स्तरावर कोव्हिड-19 करिता वैद्यकीय पथक स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत
उपलब्ध करून घ्यावे व आवश्यकतेनुसार भाविकांची (ॲन्टीजन/ पीसीआर टेस्टींग)चाचणी
करण्यात यावी.
कृत्रिम तलावाच्या
ठिकाणी निर्माल्य कलश ठेवण्यात यावे. अशा ठिकाणी ध्वनी प्रदूषण होऊन सर्वोच्च न्यायालयाच्या
आदेशांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत छटपुजेच्या
निमित्ताने सामाजिक अंतर न राखता एकत्र जमणार नाही व त्यामुळे कोव्हिड-19 चा
प्रसार, प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी. या ठिकाणी
एकावेळी 50 पेक्षा जास्त व्यक्तींना उपस्थित राहता येणार नाही. उपस्थित प्रत्येक
व्यक्तीचे अनिवार्यतेने थर्मल स्क्रिनिंग करण्यात यावे. या ठिकाणी प्रत्येक
व्यक्तीने तीन पदरी मास्क किंवा साधा कापडी मास्क किंवा रूमाल अथवा कापडाने नाक व
तोंड झाकून वावरणे बंधनकारक राहिल.
या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीने
आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार योग्य
ते शारिरीक अंतर राखणेबाबतचा नियम काटेकोरपणे पाळण्यात यावा. कार्यक्रमास दहा वर्षाच्या
आतील तसेच पासष्ट वर्षावरील व्यक्तींना सहभाग देवू नये. ताप, सर्दी, खोकला इ. कोरोना
सदृश्य लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना सहभाग देवू नये. एकमेकांच्या वस्तू उदा. पुजेचे
साहित्य एकमेकांनी हाताळू नयेत. कार्यक्रमाच्या ठिकाणी हात धुण्याकरिता साबण व पुरेशा
प्रमाणात सॅनिटायझर्स ठेवण्यात यावेत. 1 टक्का सोडियम हायपोक्लोराईड वापरून हे ठिकाणी
निर्जंतुकीकरण करण्यात यावे. पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या
व्दिवार्षिक निवडणुकीची अचारसंहिता सुरू असल्याने आचारसंहितेचे काटेकोर व तंतोतंत
पालन करण्यात यावे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.