कोल्हापूर, दि. 22 (जिल्हा माहिती
कार्यालय) : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. काल
रात्रीपासून बऱ्याच नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. नदीकाठचे नागरिक, पुरामुळे
बाधित होणाऱ्या नागरिकांबरोबरच सर्वांनी प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे
तंतोतंत पालन करून सहकार्य करावे, जेणेकरून वेळेत मदत उपलब्ध करुन देवून जिवीत व
वित्तहानी टाळता येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
जिल्ह्यात
पावसाच्या पाण्यामुळे बंद करण्यात आलेले रस्ते नागरिकांनी ओलांडू नयेत. तसेच या ठिकाणी
लावण्यात आलेले बॅरीगेट्स काढण्याचा प्रयत्न करून स्वत:चा व कुटूंबियांचा जीव
धोक्यात घालू नये.
पूर परिस्थितीत
मदत कार्यासाठी एनडीआरएफची दोन पथके जिल्ह्यात दाखल झाली असून एक पथक शिरोळ
तालुक्यात तर दुसरे पथक करवीर येथे दाखल झाले आहे. गर्भवती महिला, कोरोनाचे रूग्ण,
प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिक तसेच गंभीर आजाराच्या रूग्णांना वेळेत उपचार मिळवून
देण्यासाठी आरोग्य विभागाने तयारी केली आहे. प्रशासन, आरोग्य विभाग तसेच गावातील
आपत्ती व्यवस्थापन समितीने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करून नागरिकांनी सहकार्य
करावे.
पूरपरिस्थितीत
नागरिकांच्या स्थलांतरासाठी प्रशासनाच्यावतीने सुरक्षित ठिकाणी निवाऱ्याची आवश्यक
ती व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासनाने विस्थापित होण्याची सूचना केल्यास
तात्काळ स्थलांतरीत होवून प्रशासनाला सहकार्य करावे. नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी
स्थलांतरित होताना आवश्यक ती महत्वाची कागदपत्रे, आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन
कार्ड, मौल्यवान वस्तू, औषधे, स्वत:चे साहित्य जसे साबण, ब्रश, पेस्ट, मोबाईल
चार्जर, आवश्यक तेवढे कपडे, दोरी आदी साहित्य सोबत घ्यावे. घर सोडताना घरातील
अवजड, किंमती साहित्य जसे सोफा, टिव्ही कपाटे इ. घरातील सर्वात उंच ठिकाणी ठेवावे.
घरातील लाईटचा मेन स्विच, गॅस सिलेंडर बंद करावेत, असेही आवाहन जिल्हाधिकारी
श्री. रेखावार यांनी केले आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.