शुक्रवार, १६ जुलै, २०२१

सोयाबीनवरील खोडमाशी व चक्रीभुंगा किडींचे व्यवस्थापन

 

कोल्हापूर, दि. 16 (जिल्हा माहिती कार्यालय): जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातील पावसानंतर ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली आहे त्यांचे पिक सद्यस्थितीत 25 ते 30 दिवसांचे आहे. या सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. ज्या शेतकऱ्यांनी जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस झाल्यानंतर सोयाबीनची पेरणी केली आहे अशा सोयाबीन पिकावरसुध्दा पुढील काही दिवसात या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तसेच या दरम्यान सोयाबीन पिकावर चक्रीभुंगा किडीच्या प्रादुर्भावाची सुध्दा शक्यता नाकारता येत नाही. म्हणून शेतकऱ्यांनी जागरूक राहून या किडींचे व्यवस्थापन करावे.

खोडमाशी- खोडमाशी लहान, चमकदार काळ्या रंगाची असून त्यांची लांबी 2 मिमी असते. अंड्यातून निघालेली अळी पाय नसलेली, फिक्कट पिवळ्या रंगाची, 2-4 मिमी लांब असते. ही अळी प्रथम जवळच्या पानाच्या शिरेला छिद्र करते. नंतर पानाचे देठातून झाडाच्या मुख्य खोडात किंवा फांदीत प्रवेश करून आतील भाग पोखरून खाते. प्रादुर्भावग्रस्त खोड चिरून पाहिल्यास पांढूरक्या रंगाची अळी किंवा कोष लालसर नागमोडी भागात दिसते. खोडमाशीचा प्रादुर्भाव पिकाचे सुरूवातीचे अवस्थेत झाल्यास किडग्रस्त झाड वाळते व मोठ्या प्रमाणात नुकसान होते. खोडमाशीची अळी तसेच कोष फांद्यात, खोडात असतो. अशा किडग्रस्त झाडावरील फुलांची गळ होते व शेंगातील दाण्याचे वजन कमी होऊन उत्पादनात 16-30 टक्के घट होते.

चक्रीभुंगा- चक्रीभुंग्याची मादी पानाच्या देठावर, फांदीवर किंवा मुख्य खोडावर साधारणत: एकमेकांपासून 1 ते 1.5 सेमी अंतरावर एकमेकास समांतर दोन गोल काप तयार करून त्यामध्ये अंडी टाकते. त्यामुळे चकी कापाचा वरचा भाग सुकतो. अंड्यातून निघालेली अळी पानाचे देठ आणि फांदीतून आत जाते, मुख्य खोडाचा भाग पोखरते. या किडीचा प्रादुर्भाव मूग, उडिद, चवळी या पिकावरसुध्दा होऊ शकतो. पिकाच्या सुरुवारतीच्या अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास झाडाची पाने, फांद्या व मुख्य खोडाचा भाग वाळतो. पिक साधारणत: दिड महिन्याचे झाल्यावर चक्रि भुंग्याचा प्रादुर्भाव असलेले झाड वाळत नाही पण किडग्रस्त झाडास कमी शेंगा लागतात परिणामी उत्पादनात घट येते.

 

 

किडींच्या व्यवस्थापनासाठी पिवळे चिकट सापळे लावून नियमित माशांचा प्रादुर्भाव पाहणे (25 नग प्रती हेक्टर). खोडमाशी व चक्रीभुंगा प्रादुर्भावामुळे किडग्रस्त पाने, फांद्या वाळतात अशी किडग्रस्त झाडे, पाने, फांद्या यांचा आतील किडीसह नायनाट करावा. खोडमाशी व चक्रीभुंग्याने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर (सरासरी 10 टक्के किडग्रस्त झाडे) या दोन्ही किडींच्या नियंत्रणासाठी इथियॉन 50 टक्के-30 मिली किंवा इंडोक्झाकार्ब 15.8 टक्के-6.7 मिली किंवा क्लोरॅट्रॅनिप्रोल 18.5 टक्के-3.0 मिली किंवा थायोमेथोक्झाम 12.6 + लॅमब्डा सायहॅलोथ्रीन 9.5 टक्के झेडसी-2.50 मिली यापैकी कोणतेही एक किटकनाशकाची प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

अधिक माहितीसाठी क्षेत्रीय स्तरावरील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून वेळीच सोयाबीन पिकावरील किडी ओळखून त्यांचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे.

000000

 

 

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.