कोल्हापूर, दि. 21 (जिल्हा माहिती कार्यालय) : सन
२०१९ मध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नद्यांना पूर आला होता. पुरामध्ये विविध
तालुक्यांतील काही गावे पूर्ण तर काही अंशतः बाधित झाली होती. त्यामुळे पूरग्रस्त
जनावरांना सुरक्षित ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात विस्थापित करण्यात आले होते. सन
२०२१ मध्ये हवामान खात्याने मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली
असून कोल्हापूर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे हातकणंगले, शिरोळ,
करवीर, पन्हाळा, चंदगड, गडहिंग्लज तालुक्यातील संभाव्य विस्थापित कराव्या
लागणाऱ्या जनावरांकरिता तात्पुरत्या स्वरुपात छावणी उभी करून चारा, पाणी व
पशुखाद्य मुबलक प्रमाणात पुरविण्यासाठी
सेवाभावी संस्थांकडून दरपत्रके मागविण्यात येत आहेत.
अटी व शर्ती-
* शासकीय
निकषाप्रमाणे व केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती निकषांप्रमाणे छावणीत दाखल
असलेल्या प्रति मोठ्या जनावरास प्रतिदिन रु.७०/- व लहान जनावरास प्रतिदिन रु.३५/-
अनुदान देय राहील.
* तात्पुरत्या
स्वरुपाच्या छावणीत दाखल होणाऱ्या जनावरांचे पावसापासून संरक्षण होण्याकरिता शेडची
सोय करणे आवश्यक राहील तसेच रात्रीच्या वेळी प्रकाश व्यवस्था करण्यात यावी.
* निवारा
शेड उभारणे, प्रकाश योजना, पाणी, वाळलेला किंवा ओला चारा व पशुखाद्य या बाबींसाठी
येणारा खर्च नमूद अनुदानातून भागविण्यात
यावा.
*जनावरांच्या छावण्यात दाखल झालेल्या
जनावरांपासून उत्पन्न होणारे मलमूत्र याची विल्हेवाट संबंधित संस्थेने करावी.
* वाळलेल्या
चाऱ्याचा साठा तसेच निवारा याचे आगीपासून संरक्षण करण्यासाठी आग प्रतिबंधक
उपाययोजना करण्यात यावी. तसेच पोलीस अधिनियम कलम, ११६/११७ नुसार छावणी परिसरात
धुम्रपान करण्यास प्रतिबंध करण्यात यावा.
* जनावरांच्या
छावण्यात दाखल झालेल्या जनावरांना सर्व प्रकारच्या पशुवैद्यकीय सेवा
कार्यक्षेत्रातील पशुवैद्यकीय दवाखान्यातील अधिकारी/कर्मचारी यांच्यामार्फत
निःशुल्क पुरविण्यात येतील.
* छावणीत
दाखल होणाऱ्या मोठ्या व लहान जनावरांना पिण्यासाठी पुरेशा प्रमाणात स्वच्छ पाणी
उपलब्ध करून देण्यात यावे.
* शासन
निकषाप्रमाणे छावणीत दाखल झालेल्या प्रति मोठ्या व लहान जनावरास प्रतिदिन वाळलेला
किंवा हिरवा चारा व पशुखाद्य खालीलप्रमाणे देण्यात यावे.
चाऱ्याचा प्रकार, मोठी जनावरे, लहान जनावरे
पुढील प्रमाणे-
१) हिरवा
चारा - १५ किलोग्रॅम- ७.५ किलोग्रॅम
२) पशुखाद्य
(आठवड्यातून ३ दिवस १ दिवसाआड) - १ किलोग्रॅम - ०.५
किलोग्रॅम
किंवा
१) वाळलेला
चारा - ६ किलोग्रॅम - ३ किलोग्रॅम
२) पशुखाद्य
(आठवड्यातून ३ दिवस १ दिवसाआड) - १ किलोग्रॅम -
०.५ किलोग्रॅम
सेवाभावी/गोरक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्थांनी दिनांक २७ जुलै
२०२१ पर्यंत शासकीय वेळेत बंद लिफाफ्यामध्ये दरपत्रके संबंधित तहसीलदार कार्यालयास
सादर करावीत. अधिकच्या माहितीसाठी संबंधित तालुक्यातील तहसीलदार कार्यालयातील
पुरवठा शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन संबंधित तहसीलदार तथा अध्यक्ष, आपत्ती
व्यवस्थापन समिती यांनी केले आहे.
*अधिक माहितीसाठी सोबत- त्या त्या तालुक्यातील
सविस्तर माहितीच्या प्रती
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.