इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, ३० जुलै, २०२१

कायम पुराचा धोका असणाऱ्या गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावू - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

 






 

- नृसिंहवाडी व शिरोळ येथील पूरग्रस्तांशी साधला संवाद

- पद्माराजे हायस्कूल येथील पूरग्रस्त निवारा केंद्राची केली पाहणी

कोल्हापूर, दि 30 (जिल्हा माहिती कार्यालय) : कायम पुराचा धोका असणाऱ्या गावांनी एकत्र येऊन एकमताने ठराव मंजूर करावा, पुनर्वसनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावू, पूरग्रस्त भागाची पाहणी करत असून याबाबत जिल्हास्तरावर बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सविस्तर चर्चा करुन योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज दिले.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांच्या समवेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, मुख्य सचिव सिताराम कुंटे, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहूल रेखावर, मनपा आयुक्त डॉ .कांदबरी बलकवडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, शिरोळ नगराध्यक्ष अमरसिंह पाटील,  माजी आमदार उल्हास पाटील, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, माजी आमदार सत्यजित पाटील, तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.

नृसिंहवाडी तिर्थ क्षेत्र येथे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पूरपरिस्थितीची पाहणी करुन बाधित नागरिकांशी संवाद साधला. तसेच पूरग्रस्तांसाठी निर्माण करण्यात आलेल्या पद्माराजे हायस्कूल शिरोळ येथील निवारा केंद्रास भेट देऊन संवाद साधला. नृसिंहवाडी येथे स्थानिकांनी सन 2019 चा पूर , सुरु असलेली कोरोनाची परिस्थिती व आता आलेला महापूर यामुळे येथील सर्वच जनजीवन विस्कळीत झाले असून याबाबत ठोस कार्यवाही व्हावी, अशी मागणी स्थानिक पूरग्रस्त नागरिक, व्यापारी, देवस्थानचे पदाधिकारी यांनी केली.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.