कोल्हापूर,
दि. 20 (जिल्हा माहिती कार्यालय) : सध्या जिल्ह्यात पाऊस चांगला होत असून
जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास, त्याच्या निवारणासाठी सज्ज
रहावे. तसेच संबंधित सर्व यंत्रणांनी आपत्ती व्यवस्थापनाचा सूक्ष्म आराखडा तयार
करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले.
जिल्ह्यातील पूर परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या
अध्यक्षतेखाली महाराणी ताराराणी सभागृहात आढावा बैठक झाली, यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, सार्वजनिक बांधकाम
विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन
देसाई, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, जिल्हा आपत्ती
व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी विविध विभागांच्या प्रमुखांनी अतिवृष्टी, पूरपरिस्थिती निवारण व
मदतकार्याच्या दृष्टीने करण्यात आलेल्या तयारीची सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
जिल्हाधिकारी श्री रेखावार म्हणाले, मान्सून
काळात काही रस्ते व पूल पाण्याखाली जाऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ शकतो. अशा
परिस्थितीतही काही नागरिक पूल ओलांडण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी अपघात होऊ नये,
यासाठी पुराचे पाणी आलेले रस्ते बॅरिकेड्स लावून तात्काळ बंद करावेत. तसेच अशा
मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवावी. जिल्ह्यातील पाझर तलाव सुस्थितीत
असल्याची खात्री करा. पूरपरिस्थिती निर्माण होत असल्याचे आढळून आल्यास बाधित
होणाऱ्या गावांतील नागरिकांपर्यंत वेळेत माहिती(सूचना/अलर्ट) पोहोचवावी.
पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने महावितरण विभागाने आवश्यक साहित्याची देखभाल, दुरुस्ती
करुन घ्यावी. गरजेनुसार मनुष्यबळ व अधिकचे साहित्य तयार ठेवावे. अतिवृष्टी व वादळी
वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यास त्वरित वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी आवश्यक
साधनसामग्री व मनुष्यबळ तयार ठेवा.
पूर परिस्थितीत पाण्याचा वेढा पडण्याची शक्यता
असणाऱ्या गावांना मदतकार्य पोहोचवण्याच्या दृष्टीने गावनिहाय आराखडा तयार ठेवा. या
गावांमधील नागरिकांसाठी पुरेसे अन्नधान्य व औषधसाठा उपलब्ध ठेवावा. पूरपरिस्थिती
निर्माण झाल्यास एकही जनावर वाहून जाऊ नये, यादृष्टीने काटेकोर नियोजन करावे.
छावणीतील जनावरांसाठी पुरेसे पशुखाद्य, ओला व सुका चारा, औषधसाठा तयार ठेवा.
भूस्खलन होणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती करुन घ्या. भूस्खलनामुळे नागरिकांना इजा
पोहोचू नये, यासाठी उपाययोजना करा. पूरपरिस्थितीत अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी
प्रशिक्षित बचाव पथके तयार ठेवावीत. मान्सून कालावधीत आरोग्य सुविधा, शुध्द पाणी
पुरवठा याविषयी उपाययोजना करा. हे करताना कोरोना प्रादुर्भाव परिस्थिती लक्षात
घेऊन सुरक्षित अंतर, मास्क, सॅनिटायझर आदी खबरदारी घ्यावी, असे जिल्हाधिकारी श्री
रेखावार यांनी आवर्जून सांगितले.
जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे म्हणाले,
पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास पुरबाधित गावात महसूल, पोलीस, आरोग्य व अन्य संबंधित
विभागांनी समन्वयाने काम करावे.
अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण
झाल्यास तात्काळ मदत उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या विविध
विभागांनी केलेल्या तयारीची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
संजयसिंह चव्हाण यांनी दिली.
संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा
प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या तयारीबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन
अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी सादरीकरणातून सविस्तर माहिती दिली.
यावेळी महसूल, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा,
आरोग्य, कृषी, महानगरपालिका, जिल्हा परिषद, महावितरण, महाराष्ट्र राज्य परिवहन
महामंडळ, बीएसएनएल आदी विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागाच्या वतीने
केलेल्या तयारीची सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्य करणाऱ्या स्वयंसेवकांच्या कामाचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी
केले कौतुक पूरपरिस्थिती व आपत्कालीन परिस्थितीत
नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासनासोबत कार्यरत असणाऱ्या विविध स्वयंसेवी
संस्थांतील स्वयंसेवकांच्या कामाचे कौतुक जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी
केले. कठीण प्रसंगी घरापासून दूर राहून समाजासाठी मदतकार्य करणाऱ्या या
स्वयंसेवकांचे काम प्रेरणादायी आहे, असे ते म्हणाले. यावेळी प्रातिनिधिक
स्वरुपात शुभांगी घराळ हिला जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांच्या हस्ते
पुष्पगुच्छ देऊन स्वयंसेवकांच्या कामाचा त्यांनी गौरव केला. |
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.