बुधवार, २४ जून, २०२०


प्रजादक्ष राजा : राजर्षी शाहू
           प्रजादक्ष आणि लोककल्याणकारी राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा 26 जुन हा जन्मदिन संपूर्ण राज्यभर आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक परिवर्तनाच्या चळवळीत राजर्षि छत्रपती शाहूंच मोलाच कार्य आहे. सामाजिक सुधारणेमध्येही शाहूंचं महत्वपूर्ण योगदान आहे. अशा या युगपुरुषाला आणि प्रजादक्ष रयतेच्या राजाला विनम्र अभिवादन !
सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून राजर्षी शाहुंनी गरीब, गरजु, वंचित आणि उपेक्षितांना न्याय देण्याबरोबरच शिक्षण, सामाजिक व आर्थिक परिवर्तनातून बहुजन समाजात जागृती निर्माण केली.  शिक्षणाव्दारे समाजातील अनिष्ठ प्रथा आणि रुढी दूर करण्याचा प्रयत्न शाहूंनी केला. शाहूंनी शेतकरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांच्या तसेच दुर्बल आणि उपेक्षित घटकातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला सर्वार्थाने महत्व देवून शिक्षणाची गंगा वंचित व दुर्बलापर्यत पोहोचविण्याचे महान कार्य केले. तसेच व्यापास आणि शेती डोळ्यासमोर ठेवून व्यापार आणि शेती क्षेत्राला प्रोत्साहन दिले. 
थोर युगपुरुष- समाज सुधारक, प्रजादक्ष लोकराजा, जनतेचा कैवारी अशा अनेक उपाध्या राजर्षी शाहूंना लावल्या गेल्या आहेत. शाहु एक महान लोककल्याणकारी राजा अशा शब्दातही शाहुंच्या कार्याचा गौरव होत आहे. शाहूंनी आपल्या राज्यकारभारामध्ये लोककल्याणाला सर्वार्थानं महत्व दिले. गोरगरिब, उपेक्षित आणि वंचित माणसाच्या विकासाला आणि कल्याणाला राजर्षी शाहुंनी प्राधान्य दिले. हीच त्यांची भूमीका सर्वार्थाने मोलाची आहे. राजर्षी शाहूंचा जन्म दिन 26 जुन हा सामाजिक न्याय दिन म्हणूनही राज्यात विविध कार्यक्रमांनी साजरा केला जातो. कोल्हापूरातील घराघरात राजर्षी शाहूंचा जन्मदिन मोठ्या उत्साहाने, आनंदमय वातावरणात साजरा केला जातो. शाहु जयंती निमित्त संपूर्ण कोल्हापूर शाहुमय होते.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्म कागलच्या घाटगे घराण्यात 26 जून 1874 रेाजी झाला. श्रीमंत राधाबाईसाहेब  या त्यांच्या आई तर श्रीमंत जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाटगे हे पिता होते. शाहूंचे मूळ नांव यशवंतराव. 17 मार्च 1884 रोजी शाहूंना कोल्हापूर संस्थानचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी आनंदीबाईंनी दत्तक घेतले. शिक्षण घेतल्यावर 1 एप्रिल 1891 रोजी शाहूंचा श्रीमंत लक्ष्मीबाईंशी विवाह झाला. विवाह समयी लक्ष्मीबाईंचे वय 11 वर्षाचे होते. राजर्षि छत्रपती शाहूंनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वयाच्या 20 वर्षी म्हणजे 2 एप्रिल 1894 रोजी कोल्हापूर संस्थानाची सूत्रे हाती घेतली. 28 वर्षे राज्यकारभार करुन समाजाला नवी दिशा व विचार दिला. शाहू महाराजांनी समाजरचनेविषयक आणि समाज उन्नतीविषयी जी काही महत्वाकांक्षी कामे केली त्यामध्ये बहुजन समाजाला समाजाच्या मूळ प्रवाहात आणून त्यांना जागृत बनविण्याचा त्यांच्या कार्याला तोड नाही.  सर्व सामान्य माणसांचे कल्याण हेच कर्तव्य मानून शाहूंनी समाजाला नवा विचार व दिशा दाखविली. परंपरागत रुढी व अनिष्ठ प्रथांना बगल देवून शिक्षणातून प्रगतीकडे जाण्याचा नवा विचार त्यांनी समाजात रुढ केला. परंपरागत रुढी, कायदे बाजूला ठेउन जनहिताचे आणि  लोककल्याणाचे कायदे केले. नवनव्या लोकहिताच्या, समाजविकासाच्या योजना व कार्यक्रम त्यांनी राबविले. 
राजर्षी शाहूंनी शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहत आणले. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे शाहूंनी पटवून दिले. बहुजन समाजात शिक्षणाचा प्रचार करण्यावर त्यांनी भर दिला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी शाहुनी कोल्हापूरात शिक्षणाच्या व वसतीगृहाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य दिले. कोल्हापूरातील दसरा चौकात सर्व समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरु करुन ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची कवाडे उघडी केली. आजही दसरा चौकातील शाहुंनी उभी केलेली वसतिगृहे पाहून शाहुंच्या थोर कार्याने उर भरुन येतो. गरीब व गरजू विद्यार्थ्याना शिष्यवृत्या  देण्याची योजना राबविली. त्यांनी आपल्या संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. 
राजर्षी छत्रपती शाहूंनी संगीत, नाट्य, चित्रकला, मल्लविद्या आदी कलांना राजाश्रय देऊन महाराष्ट्रात कलेच्या क्षेत्रात अव्दितीय कामगिरी केली. अनेक दिग्‌ज गायक-गायिकांनी शाहूंच्या आश्रयाने अखिल भारतीय स्तरावर कीर्ती संपादन केली. त्यांनी अनेक नाटक कंपन्यांना व गुणी कलावंतांना आश्रय दिला. बालगंधर्व व संगीतसूर्य केशवराव भोसले हे थोर कलावंत शहूंनीच महाराष्ट्राला दिले. संगीत व नाट्यकलेच्या जोपासनेसाठी त्यांनी कोल्हापुरात भव्य पॅलेस थिएटर (केशवराव भोसले नाट्यगृह) बांधले. त्याच्या शेजारीच खुल्या नाट्यगृहाचीही सोय केली. शाहूंच्या दरबारात आबालाल रहिमानसारखा महान चित्रकार कलावंत होऊन गेला. बाबूराव पेंटर, दत्तोबा दळवी प्रभृती चित्रकारांना त्यांचे प्रोत्साहन मिळाले. मल्लविद्येच्या प्रांतात शाहूंनी संस्थानासह सर्व देशांतील मल्लांना आश्रय दिला. रोमच्या आखाड्याच्या धर्तीवर कोल्हापुरात कुस्तीचे मैदान बांधले. त्यांच्या कारकीर्दीत कोल्हापूर ही ‘मल्लविद्येची पंढरी' बनली. 
            ग्रामीण जतनेच्या उध्दारासाठी कृषि विकासातून ग्रामीण अर्थव्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यास राजर्षी शाहूंनी मोठं कार्य त्याकाळी केले. शेतकऱ्यांना कृषि विषयक नवे विचार दिले. आधुनिक शेतीचा मंत्र आणि शेती क्षेत्रातील तंत्राज्ञानाचा व अवजाराचे महत्व शेतकऱ्यांना त्यांनी पटवून दिले. सामाजिक सुधारणेबरोबरच शाहूंनी व्यापार व उद्योगधंद्याच्या विकासालाही प्रोत्साहन दिले. त्यांनी शेती व व्यापारासाठी शाहुपुरीत बाजाराची स्थापना केली. शिक्षणाच्या सुविधा आणि सवलती देऊन बहुजन समाजाना शिक्षणाव्दारे नवी ताकद आणि उमेद दिली. एकंदरीत राजर्षी छत्रपती शाहुं महाराजांचे समाजहिताचे आणि  लोककल्याणकारी कार्य नव्या पिढीला प्रेरणादाई आहे. 
                                                                                 
                                                                                             - एस.आर. माने
                                                                                        - कोल्हापूर.
000000
                                                

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.