‘मेहंदी, नाचगाणं, सजावट अशा कला-गुणांच्या
नवरंगाने आमचं आयुष्य सजलय. अंगावरील साडीचा एक-एक धागा दु:खाने विणलाय..पण पदर
सुखाचा आहे. आम्हीही सर्वसामान्य पुरूष आणि स्त्री असणाऱ्या आई-वडीलांच्या पोटीच
जन्म घेतलाय. आम्हालाही प्रेम हवय, सन्मान हवाय, आधाराची गरज आहे,’अशी माफक
अपेक्षा समाजाकडून करतानाच महाराष्ट्र राज्य तृतीय पंथ हक्कांचे संरक्षण व कल्याण
मंडळाच्या सदस्य मयुरी आळवेकर यांनी मंडळाच्या माध्यमातून तृतीयपंथीयांच्या
हक्कासाठी, सन्मानासाठी प्रयत्न करणार
असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र
शासनाच्या महाराष्ट्र राज्य तृतीय पंथ हक्कांचे संरक्षण व कल्याण मंडळावर
कोल्हापुरातील मयुरी आळवेकर यांची नुकतीच सदस्य म्हणून निवड झाली आहे. या
निमित्ताने त्यांच्याशी बातचीत करण्याचा योग आला. मयुरी या कोल्हापुरातीलच !
सहावीनंतर त्यांची शाळा सुटली आणि खऱ्या अर्थाने समाजातील शिक्षणाला सुरूवात झाली.
लहानपणी वडील वारले आणि घरात सर्वात मोठ्या असणाऱ्या मयुरीवर घरची जबाबदारी आली. गवंड्याच्या हाताखाली तसेच हॉटेलमध्ये
अशा विविध ठिकाणी काम करत त्यांनी घराची जबाबदारी पेलली. वयाच्या 18 व्या वर्षी
त्यांनी घर सोडले.
‘तृतीयपंथी ही
एक छत्री आहे,’ असं सांगून त्या म्हणतात, या
छत्रीखाली हिजडा, जोगते, एलजीबीटी असे सर्वच प्रकार येतात. एल (लेस्बीयन) म्हणजे
समलैंगिक स्त्री, जी (गे) म्हणजे समलैंगिक पुरूष, बी (बायोसेक्सुएल) म्हणजे स्त्री
आणि पुरूष दोघांकडेही आकर्षित होणारे, टी (ट्रान्सजेंडर) म्हणजे लिंग परिवर्तन. आई-वडीलांनी
ज्यावेळी आपलं अपत्य तृतीयपंथी असल्याचे समजल्यावर खरेतर त्याला त्यांनी आधार
द्यायला हवा. परंतु, दुर्देवाने तसे होताना दिसत नाही. इतर भावा-बहिणींची लग्नं
होणार नाहीत या आणि घराच्या प्रतिष्ठेसाठी अशा अपत्यांना घरातून हाकलून दिले जाते.
प्रसंगी त्यांचा छळवाद मांडला जातो. त्यातून ते घर सोडतात.
घरातून बाहेर
काढलेल्या, घर सोडलेल्या अशा मुलांना आम्ही आधार देतो.ज्यांची शिकण्याची इच्छा आहे अशांना यशवंतराव चव्हाण मुक्त
विद्यापिठाच्या माध्यमातून प्रवेश दिला जातो. 37 जणांनी अर्ज केला होता. त्यापैकी 14
जण परीक्षा पास झाले आहेत. दुर्गा
पिसाळ हिने बीएची पदवी प्राप्त केली आहे. बऱ्याच जणांनी नर्सिंगचे प्रशिक्षण घेतले
आहे. खासगी रूग्णालयामध्ये नोकरीही करत होते. परंतु, तिथेही समाजाच्या मानहानीकारक
वागणुकीमुळे अपमानीत होवून नोकरी
सोडावी लागली आहे. काहीजण जिल्हा
परिषदेच्या शाळेत शिक्षिकेची नोकरीही करीत आहेत.
शहरामध्ये 120
तर जिल्ह्यामध्ये सुमारे 500 तृतीयपंथी असल्याचे त्यांनी सांगितले. भगवान
शिवशंकराला आम्ही मानतो.त्याचबरोबर जोगते रेणुका आणि यल्लमा देवीला मानतात, असे
त्या म्हणाल्या. माझ्या मैत्री संघटनेच्या माध्यमातून विशेषत: समाजातील सर्वच क्षेत्रातील 1500 समलैंगिक जोडले आहेत. तृतीयपंथीयांमध्ये
समाजातील सर्व धर्म, जातींचा समावेश आहे. 2016 मध्ये लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी उज्जैनमध्ये किन्नर आखाड्याची स्थापना
केली. मुंबई, कोल्हापूर, नाशिक, धुळे अशा चार महामंडलेश्वराची स्थापनाही झाली आहे.
दक्षिण महाराष्ट्राच्या महामंडलेश्वराच्या पदाची जबाबदारी आपल्याकडे असल्याचे
सांगून मयुरी म्हणाल्या, उज्जैन, प्रयाग या ठिकाणी आखाड्याचे कुंभ झाले आहेत. 2021
ला हरिव्दारला होणाऱ्या कुंभाची सद्या तयारी सुरू आहे.
तृतीयपंथीयांमध्ये
गुरू-चेला परंपरा असल्याचे सांगून त्या म्हणाल्या, चेल्याने गुरूच्या मृत्यूपर्यंत त्याला
सांभाळायचे असते. आम्हाला सांगायला अभिमान वाटतो वृध्दाश्रमात आमचा एकही गुरू नाही
आणि नसतो. गुरूच्या जबाबदारी बरोबरच अनेकजण सोडलेल्या घराची विशेषत: आई-वडीलांना
तसेच घरच्या जबाबदारीला मदतही करत असतात. त्यांचे वृध्द आई-वडीलही वृध्दाश्रमात
नसतात. सद्या माझे 25 चेले असून 5 चेल्यांचे चेले आहेत. बऱ्याच वेळा सर्वसामान्य
असणाऱ्या निराधार मुलांना दत्तक घेतो.
सद्या बेंगलोर येथील हेल्पिंग हार्ट संस्थेत दत्तक घेतलेली 5 मुलं शिकत आहेत.
तत्कालीन
जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी तृतीयपंथीयांसाठी सहकार्याचे धोरण ठेवले होते.
त्यांच्या हाताला काम देण्यासाठी त्यांचा विशेष प्रयत्न होता. रामायण,
महाभारतमध्येही किन्नर संस्कृतीचा उल्लेख आहे. याबाबत शालेय शिक्षणात याचा सविस्तर
समावेश झाल्यास निश्चितच समाजामध्ये तृतीयपंथीयांना समानतेची वागणूक मिळण्यास मदत
होईल. शासकीय योजनांचे प्रशिक्षण तसेच शासकीय नोकऱ्या मिळण्यासाठी माझा या
समितीच्या माध्यमातून सदस्य म्हणून प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. समाजाला,
घरच्या लोकांना ‘शरम’ नाही तर ‘शान’ वाटेल असे काम करण्यासाठी तृतीयपंथीयांना हवी
आहे आपल्या सर्वांची अर्थात समाजाच्या आधाराची गरज !
प्रशांत सातपुते
जिल्हा
माहिती अधिकारी
कोल्हापूर
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.