इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, ३० जून, २०२०

जिल्ह्यात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन -जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई



कोव्हीड विषाणू व्यवस्थापनाबाबत राष्ट्रीय दिशानिर्देशाचे पालन आवश्यक
कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय): कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याकरीता  प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत  येत्या 31 जुलैपर्यंत वाढविण्यात येत असल्याची माहिती जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
सद्यपरिस्थितीत कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यावर तात्काळ नियंत्रण करुन  कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत दिनांक 31 जुलै 2020 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत वाढविण्यात येत असून प्रतिबंधीत / बंद क्षेत्रे व सुट / वगळण्यात आलेली क्षेत्रे कायम ठेवणेत येत आहेत. शासनाच्या दिनांक 29 जून 2020 रोजीच्या आदेशामध्ये नमुद प्रतिबंध व सुट लागु असेल.
कोरोना विषाणू (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 मधील तरतूदींच्या अंमलबजावणीसाठी निर्गमीत केलेल्या अधिसुचनेनुसार तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदी प्रमाणे जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोव्हिड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे. त्यानुसार लॉकडाऊनचे आदेश जारी केले आहेत. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेव भारतीय दंड संहीता 1860 (45) याच्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
कोव्हीड 19 विषाणू व्यवस्थापनाबाबत राष्ट्रीय दिशानिर्देशाचे पालन आवश्यक
कोव्हीड 19 विषाणू व्यवस्थापनाबाबत राष्ट्रीय दिशानिर्देश जिल्हयातील सर्व नागरिकांनी सार्वजनिक तसेच कामाच्या ठिकाणी मास्क, चेहरा झाकावयाचे साधन वापरणे बंधनकारक आहे. सर्व सार्वजनिक ठिकाणी तसेच वाहतुकीदरम्यान सर्व नागरिकांनी सामाजिक अंतराचा निकष पाळणे बंधनकारक आहे. दुकानामध्ये व  दुकान परिसरामध्ये 5 पेक्षा जास्त व्यक्ती / गिऱ्हाईक तसेच उपस्थित असलेल्या व्यक्ती / गिऱ्हाईक मध्ये 6 फुटापेक्षा जास्त अंतर राखणे बंधनकारक असेल. विवाह कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त 50 नातेवाईक / नागरिक यांना सामाजिक अंतराचे निकष पाळून हजर राहणेस परवानगी असेल.  अंत्यसंस्कार / अंत्ययात्रेसाठी जास्तीत जास्त 50 नातेवाईक / नागरिक यांना सामाजिक अंतराचे निकष पाळून हजर राहणेस परवानगी असेल. राज्य तसेच स्थानिक प्राधिकरणाव्दारे करण्यात आलेल्या नियमानुसार तसेच कायद्यामध्ये नमूद असलेल्या तरतूदीनुसार सार्वजनिक ठिकाणी तसेच कामाच्या ठिकाणी थुंकणे हे दंडनिय असेल. सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ खाण्यास परवानगी असणार नाही.
कामाच्या ठिकाणाबाबतचे अतिरिक्त दिशानिर्देशानुसार शक्यतोवर काम हे घरातून करणे विषयीची बाब पाळण्यात यावी.  कार्यालये/ आस्थापनामधील सर्व प्रवेश व बाहेर पडण्याच्या ठिकाणी तसेच कार्यालयातील सार्वजनिक ठिकाणी थर्मल स्कॅनिग/ हॅड वॉश/ सॅनिटायझर हे उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. कामाच्या ठिकाणीअसलेल्या सार्वजनिक वापराचे ठिकाणे तसेच सर्व गोष्टी ज्या मानवी संपर्कामध्ये उदा. दरवाज्याचे हॅण्डल, इत्यादी तसेच सतत हाताळली जाणाऱ्या बाबींची पुन्हा पुन्हा निजतुकिकरण करण्यात याव्यात.  तसेच कामाच्या ठिकाणी सर्व नागरिकांनी कामागारामधील पुरेसे अंतर, कामाच्या वेंळादरम्यान पुरेसे अंतर त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या जेवणाच्या वेळामध्ये सामाजिक अंतराचा निकष पाळणे गरजेचे असल्याचेही जिल्हाधिकारी श्री.  देसाई यांनी स्पष्ट केले आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.