शुक्रवार, १९ जून, २०२०

उत्पादन शुल्क, भुदरगड पोलीस व गुन्हा अन्वेषण शाखेची संयुक्त कारवाई गोवा बनावटीच्या दारुसह 32 लाख 8 हजार 760 रुपयांचा मुद्देमाल जप्त



       
            कोल्हापूर, दि. 19 (जिल्हा माहिती कार्यालय): गोवा बनावटीच्या विदेशी मद्यांची वाहतूक करणाऱ्या माल वाहतूक कॅन्टर (क्र.केए 25 सी 0701) भुदरगड तालुक्यातील कुर गावच्या हद्दीत काल रात्री 9.45 च्या सुमारास पकडला. राज्य उत्पादन शुल्क, भुदरगड पोलीस व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या संयुक्त कारवाईत 23 लाख 3 हजार 760 किंमतीच्या मद्यासह 32 लाख 8 हजार 760 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून वाहनचालक हरिश केशव गौडा (व.व. 29, रा. कासुर, गौड, ता. होनावरा, जि. कारवार) याला ताब्यात घेतले आहे.
       राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश पाटील यांनी याबाबत माहिती दिली.गारगोटी रस्त्यावरून गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीनुसार पथकातील अधिकाऱ्यांनी भुदरगड तालुक्यातील कुर गावच्या हद्दीत कोल्हापूर-गारगोटी रस्त्यावर बस स्थानक चौकात सापळा लावला. रात्री 9.45 च्या सुमारास मिळालेल्या माहितीप्रमाणे माल वाहतूक कॅन्टर वाहन येत असल्याचे दिसले. ते थांबवून वाहनात काय आहे अशी विचारणा करून तपासणी केली.  प्रथमदर्शी वाहनाचा हौदा पूर्णपणे रिकामा असल्याचे दिसून आले.
          खात्रीशीर माहिती मिळाली असल्याने कर्मचाऱ्यांनी वाहनाची कसून तपासणी केली. यात हौद्यामध्ये वरती असलेल्या पत्र्याच्या प्लेटांची पाहणी केली असता चोर कप्पा असल्याचे दिसून आले. या पत्र्यांच्या प्लेटा काढल्यानंतर आतील कप्प्यात विविध ब्रॅंन्डचे गोवा बनावटीचे विदेशी मद्य आढळले. रॉयल क्लासिक, मॅकडॉल क्र.1, रॉयल्स स्टॅग, इंपिरीयल ब्ल्यू, ब्लेंडर प्लाईड विस्की तसेच गोल्ड ॲण्ड ब्लॅक रम या ब्रॅंडच्या 750 मिली क्षमतेच्या बाटल्या असलेले 361 बॉक्स मिळाले. बाजार भावानुसार त्याची 23 लाख 3 हजार 760 इतकी किंमत आहे.
          या कारवाईत स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे निरीक्षक संभाजी बरगे यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक जगन्नाथ पाटील, किशोर नडे व जवान सचिन काळे, संदिप जानकर, सागर शिंदे, जय शिनगारे, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे अजित वाडेकर, ओंकार परब, सुनील केंबळेकर, विजय तळस्कर, अमर वासुदेव, भुदरगड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमित देशमुख, दयानंद देणके यांनी संयुक्तरित्या केली.
00000
         


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.