कोल्हापूर,
दि.१५ (जिल्हा माहिती कार्यालय)- शहरातील ११८२ मालमत्ता धारकांच्या मालमत्ता बी
टेन्युअर मुक्त करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
कोल्हापूर
शहरातील प्रॉपर्टी कार्ड उताऱ्यावरील चुकून लागलेला "ब" सत्ताप्रकार कमी
करुन "क" सत्ताप्रकार करण्यासाठी जिल्हाधिकारी श्री देसाई यांच्या
अध्यक्षतेखाली १७ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत मालमत्ता बी टेन्युअर मुक्त
करण्याबाबत निर्णय घेवून निर्देश देण्यात आले होते.
शहरातील ज्या प्रॉपर्टी कार्ड धारकांच्या
प्रॉपर्टीवर "ब " सत्ताप्रकार अशी नोंद चुकीने झालेल्या आहेत त्या
लोकांची गैरसोय टाळण्याकरिता जिल्हा प्रशासनामार्फत विशेष मोहीम हाती घेण्यात येत
असल्याचे सांगून जिल्हाधिकारी श्री देसाई म्हणाले, चुकून "ब" सत्ताप्रकारात
समाविष्ट झालेल्या जमिनींसाठी "क" सत्ताप्रकारात वर्ग करण्यासाठी
संबधितांना स्वत:हून अर्ज करावा लागू नये. तसेच यासाठी लागणारी इतर कागदपत्रे जसे
की, क ड ई पत्रक, इनाम पत्रक, चौकशी उतारा, प्रॉपर्टी कार्ड उतारा, बॉन्ड बुक
उतारा, हुजूर ठराव, असेसमेंटचा उतारा हे न मागता प्रशासकीय पातळीवरच या
कागदपत्रांची छाननी करुन प्रॉपर्टी कार्डावर चुकून लागलेला "ब"
सत्ताप्रकार कमी करण्यात येणार आहे.
या अनुषंगाने तहसिल स्तरावर तसेच नगर
भूमापन अधिकारी कार्यालय यांच्या स्तरावर विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. नगर
भूमापन अधिकाऱ्यांच्या या पथकाने त्यांच्या स्तरावर ४६ प्रॉपर्टी कार्डच्या बाबतीत
छाननी करुन त्यांचा अहवाल दिनांक १ जून, २०२० तर तहसिल कार्यालय करवीर यांच्या
पथकाने दिनांक ८ जून, २०२० रोजी अहवाल उपविभागीय अधिकारी कार्यालयास सादर केला. या
कागदपत्रांची तपासणी करून तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडील याच सिटी सर्वे
क्रमांकाच्या बाबतीत पूर्वी "ब" सत्ताप्रकार "क"
करण्याबाबतच्या कार्यवाहीची शहानिशा करुन दिनांक १२ जून, २०२० रोजी खालील सिटी
सर्व्हे क्रमांकाच्या बाबतीत चुकून लागलेले "ब" सत्ताप्रकार
"क" करण्याबाबत आदेश करण्यात आले आहेत. या आदेशाच्या प्रती नगर भूमापन
अधिकारी कोल्हापूर, तहसिल कार्यालय करवीर, गा.का.तलाठी करवीर व कसबा बावडा यांना
देण्यात आले आहेत. तसेच या सिटी सर्वे क्रमांकाचे विवरण जिल्हाधिकारी कोल्हापूर
यांच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. या आदेशामुळे ४६ प्रॉपर्टी
कार्डवरील ११८२ धारकांना लाभ होणार असून एकूण क्षेत्रफळ ३५,४१३. ६३१ चौरस मिटर
एवढे आहे.
संबंधित प्रॉपर्टी कार्ड धारकांनी या
आदेशानुसार त्यांच्या मिळकतीचे रूपांतरण संबंधित गा.का.तलाठी करवीर किंवा गा.का.
तलाठी कसबा बावडा यांच्याकडे जमा करावयाचे आहे. त्यानंतर नगर भूमापन अधिकारी
यांच्या कार्यालयात या जमा केलेल्या रुपांतरण शुल्काची पावती दिल्यास त्यांच्या
प्रॉपर्टी कार्डवरील "ब" सत्ताप्रकार हा कमी करण्यात येईल. ही मोहिम
कोविड-१९ मुळे थोडी शिथील झाली होती. तथापि, यापुढे ही मोहीम अधिक गतीने राबविली
जाईल, असेही जिल्हाधिकारी श्री देसाई यांनी स्पष्ट केले.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.