कोल्हापूर, दि. 23 (जिल्हा माहिती कार्यालय): कोरोना साथीचा प्रादुर्भाव
रोखण्यासाठी शासन युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. शासनाच्या प्रयत्नाबरोबरच जनतेनेही
योग्य ती खबरदारी घेऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील
यांनी केले.
डॉ. संदीप पाटील
व भारतभूषण गिरी यांनी लिहिलेल्या 'नोवेल कोरोना' या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी
पालकमंत्री श्री. पाटील बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी हा पुस्तक
प्रकाशन कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त
डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल उपस्थित
होते.
पालकमंत्री श्री.
पाटील म्हणाले, नोवेल कोरोना हा विषाणूजन्य आजार झपाट्याने जगभर पसरत आहे. हा आजार
आटोक्यात लवकरच येईल, शासन यासाठी सर्व उपायासह प्रयत्नशील आहे. कोरोना साथीने
जगभर थैमान घातले आहे. आपल्या देशातील जनतेची मुळातच रोगप्रतिकारक शक्ती चांगली
असल्याने व वेळीच योग्य ती खबरदारी शासनाने घेतल्यामुळे तसेच जनतेची प्रशासनाला,
शासनाला चांगली साथ दिल्याने, आजार नियंत्रणात आहे. सलग दीड-दोन महिने देशात व
राज्यात लॉकडाऊन केले. सध्या व्यवहार पूर्ववत होण्यासाठी शिथिलता देण्यात आली आहे.
मात्र, कोरोनाची साथ पसरू नये, यासाठी लोकांनी आता शासनाने सांगितल्याप्रमाणे
खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी श्री.
देसाई म्हणाले, कोरोना साथ जिल्ह्यात नियंत्रणात आहे. याला महत्त्वाचे कारण म्हणजे
जनतेचे मोलाचे सहकार्य होय. या महामारीचा धोका वेळीच जनतेने ओळखला. लॉकडाउनच्या
काळात प्रशासनाने काही नियम लागू केले. औषधे व जीवनावश्यक वस्तू उपलब्ध व्हाव्यात
यासाठी हे दोन घटक टाळून लॉकडाऊन केले. लोकांना व्यवसायिकांना नोकरदारांना वाहतूक
संस्थांना वाहतूकदारांना विश्वासात घेऊन पालकमंत्री सतेज पाटील,ग्राम विकास मंत्री
हसन मुश्रीफ,आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, पोलीस दल, स्थानिक
स्वराज्य संस्था या सर्वांच्या सहकार्याने साथ आटोक्यात आणण्याचा
कसोशीने प्रयत्न केला. या सर्वांचा परिणाम म्हणून कोरोना विषाणूमुळे
जिल्ह्यातील मृत्यूची संख्या व बाधितांची संख्या कमी झाली. कोरोनाबाधित रुग्णांना
त्वरित रुग्णालयात दाखल करून त्यांची योग्य ती काळजी घेतली जाते. त्यामुळे जिल्ह्यात
कोरोना विषाणूची साथ आतापर्यंत आटोक्यात ठेवण्यात यश मिळाले आहे.
डॉ. संदीप पाटील
म्हणाले, नोवेल कोरोना विषाणूची साथ जगभरात पसरत आहे, हे जेव्हा आम्हाला लक्षात
आले, तेव्हा मी व पत्रकार भारतभूषण गिरी मिळून याविषयी जनजागृती करण्याच्या हेतूने
पुस्तक लिहिण्याचा विचार केला. या पुस्तकात कोरोनाची ओळख, त्याची लक्षणे, साथ
वाढण्याचे टप्पे, कोणती काळजी घ्यायची, आहार, उपाय काय करायचे, याची माहिती आहे.
याच बरोबर पुस्तकात आतापर्यंतच्या साथीच्या रोगांचा आढावा, अन्य राष्ट्रातील
कोरोनाची स्थिती, यासाथीचा पर्यावरणावर झालेला परिणाम, पुनर्रचनेची संधी या
विषयाची माहिती पुस्तकात दिली आहे. या पुस्तकाला जगप्रसिद्ध योगतज्ज्ञ डॉ.
संप्रसाद विनोद यांनी प्रस्तावना लिहिली आहे.
प्रकाशन समारंभ प्रसंगी
आमदार राजेश पाटील,कुमार पाटील,कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आबाजी
शिर्के,जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.शिरीष पाटील, रक्तविकार तज्ञ
डॉ.विजय हिराणी,कृषीतज्ञ डॉ. जे.पी. पाटील,डॉ.केशव हरेल, डॉ. तानाजी हरेल,डॉ.सुधिर
गिरी, डॉ.पी.एम.शिंदे,महेश गरडे आदी उपस्थित होते.
सोबत : फोटो जोडला आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.