कोल्हापूर, दि.22
(जिल्हा माहिती कार्यालय) : बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या व्यक्तींचे स्क्रिनिंग
झाले पाहिजे. त्यातून कोणीही सुटणार नाही याची दक्षता घ्या. 60 वर्षांपुढील तसेच
व्याधीग्रस्त व्यक्तींची स्वॅब तपासणी झाली पाहिजे. त्याचबरोबर गावामध्ये कोव्हिड
काळजी केंद्र आणि संस्थात्मक अलगीकरण यासाठी पर्यायी जागांचे नियोजन करुन त्यामधील
सुविधा सज्ज ठेवाव्यात. संस्थात्मक अलगीकरणासाठी हॉटेल, रिसॉर्ट यांच्याशी चर्चा
करुन नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रांताधिकारी, तहसिलदार,
गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी जिल्हाधिकारी श्री. देसाई
यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी महापालिका आयुक्त डॉ.
मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवासी उप जिल्हाधिकारी
भाऊ गलांडे, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे, जिल्हा शल्य
चिकित्सक डॉ. बी.सी. केम्पीपाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे उपस्थित
होते.
जिल्हाधिकारी
श्री. देसाई यांनी तालुकानिहाय आढावा घेतला. ते म्हणाले, बाहेरील जिल्ह्यातून
तपासणी नाक्यावरुन येणाऱ्या व्यक्ती त्यांना दिलेल्या रुग्णालयात तपासणीसाठी जातात
का याची तपासणी करायला हवी. यातून एकही व्यक्ती सुटता कामा नये. पॉझिटिव्ह
रुग्णांच्या निकट सहवासितांची माहिती प्रभावीपणे दक्ष राहून गोळा करा. कोव्हिड
काळजी केंद्र तसेच संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ऑक्सीजन सिलेंडर, एन-95 मास्क,
पल्स ऑक्सीमीटर याबाबत सुविधा सज्ज ठेवा. त्याचबरोबर हॉटेल, रिसॉर्ट यांच्याशी
चर्चा करुन पेड आयक्यूबाबत नियोजन करा. प्रत्येक कोव्हिड काळजी केंद्रासाठी 15
ऑक्सीजन सिलेंडर ठेवावेत. त्याचबरोबर जिल्हा कोव्हिड आरोग्य केंद्रात एकूण
खाटांच्या 50 टक्के ऑक्सीजन सिलेंडरची सोय असली पाहिजे.
कोव्हिड काळजी केंद्रात आलेल्या प्रत्येकाला आरोग्य
सेतू ॲप इंस्टॉल करायला सांगा. त्याचबरोबर संगणक प्रणालीमध्ये रोजच्या रोज माहिती
भरा, ती तपासा आणि त्याचा स्क्रिनिंगसाठी पाठपुरावा करा. महा आयुष सर्व्हेक्षणात
राधानगरी, कागल आणि करवीर यांनी चांगले काम केले आहे. इतर तालुक्यांनीही दोन
दिवसात सर्व्हेक्षणाचे काम संपवावे. आकस्मिकताबाबतचे नियोजन तयार ठेवावे.
पूरबाधित गावांमधील नागरिकांच्या स्थलांतरणासाठी
माहिती पुस्तिका तयार करुन ती गावा गावात पोहोच करा. त्यामध्ये निवारा केंद्राची
माहिती, त्यामधील व्यक्तींचे नियोजन, महत्वाचे दूरध्वनी क्रमांक, नियंत्रण कक्षाचे
क्रमांक याचा समावेश असावा. त्याचबरोबर जनावरांच्या चारा पुरवठ्याबाबत एजन्सी
नेमण्याबाबत नियोजन करावे. रेस्क्यू
फोर्सना आताच गावे वाटून द्यावीत, असेही ते म्हणाले.
डेंग्यू, चिकनगुनिया बाबत बीडीओ,
टीएचओ यांनी सतर्क रहावे
डेंग्यू, चिकनगुनिया आणि
मलेरिया आजार उद्भवू नयेत यासाठी कोरडा दिवस पाळणे, फवारणी करणे याबाबत गट विकास
अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकारी यांनी सतर्क रहावे. असा कोणताही आजार
उद्भवल्यास संबंधितांना जबाबदार धरण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
|
जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. साळे यांनीही यावेळी
कोरोनाबाबत सूचना दिल्या. भविष्यात कोणताही धोका होणार नाही यासाठी इली, सारीचे
रुग्ण, हायरिस्क असणारे, व्याधीग्रस्त तसेच 60 वर्षापुढील व्यक्तींचा स्वॅब
घेण्यात यावेत. ग्राम पातळीवर कोव्हिड काळजी केंद्र आणि संस्थात्मक अलगीकरण
केंद्राबाबत आतापासूनच नियोजन करावे.
किटकजन्य आजार, जलजन्य आजार याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.