इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, ३० जून, २०२०

शेजारील जिल्ह्यात ये-जा करण्यासाठी 31 जुलैअखेर दैनंदिन पास देण्यासाठी विशेष अधिकारी प्राधिकृत -जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई



      कोल्हापूर,दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय): कोल्हापूर जिल्ह्याच्या स्थलसीमा हद्दीला लागून असणाऱ्या सांगली आणि सातारा जिल्ह्यात विविध आस्थापनामध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकारी, कर्मचारी तसेच कामगारांना ये-जा करण्यासाठी आता 31 जुलै 2020 पर्यंत दैनंदिन पास देण्यासाठी जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांनी विशेष अधिकारी प्राधिकृत केले आहेत, यापूर्वी ही मुदत 30 जून 2020 पर्यंत होती. 
              कोरोना विषाणू (कोव्हिड १९)चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, १८९७ मधील तरतुदी आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील तरतुदीची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रात सक्षम प्राधिकारी म्हणून शासनाने घोषित केले आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने 31 जुलै २०२० पर्यंत लॉकडाऊन वाढविले आहे.  मात्र, हे करताना राज्याची आर्थिक बाजू सक्षम करण्यासाठी उद्योग घटकांना परवानगी दिली आहे.
           जिल्हयातील विविध उद्योग घटकांमध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या स्थलसीमा हद्दीला लागून असणाऱ्या सांगली आणि सातारा जिल्ह्यात उद्योग घटकांमध्ये कामगार कामास आहेत तसेच विविध शासकीय, निम शासकीय विभागामधील अधिकारी / कर्मचारी, खासगी शाळा, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालयांचे सर्व शिक्षक व कर्मचारी वर्ग आणि सर्व बँक कर्मचारी यांना देखील कोल्हापूर जिल्ह्याच्या स्थलसीमा हद्दीला लागून असणा-या सांगली व सातारा जिल्हयातून वारंवार कामावर जाण्यासाठी ये-जा करावी लागते. त्यानुसार कामगार तसेच अधिकारी / कर्मचाऱ्यांना  त्यांच्या कामाच्या ठिकाणी ये -जा करण्यासाठी दैनंदिन पास देणे आवश्यक असून यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
          यामध्ये कोल्हापूर औद्योगिक क्षेत्रातील विविध उद्योग व इतर खासगी आस्थापनांसाठी  महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, कोल्हापूर यांची तर सर्व शासकीय विभाग व सर्व बँक आस्थापनांसाठी  तहसिलदार करवीर, शिरोळ, हातकणंगले, पन्हाळा आणि शाहूवाडी  यांची तसेच खासगी शाळा, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालयांसाठी गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती, करवीर, शिरोळ, हातकणंगले, पन्हाळा, शाहूवाडी यांना प्राधिकृत करण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी आदेशित केले आहे.  संबंधित अधिकारी/कर्मचारी व कामगारांना पास वितरीत करण्यापूर्वी अधिकारी/कर्मचारी व कामगारांची खालील कागदपत्रे तपासून 31 जुलैपर्यंतचे दैनंदिन पास देण्याबाबतची कार्यवाही करावी.
         यामध्ये ती  व्यक्ती काम करीत असलेल्या आस्थापनेचे प्रमाणपत्र, व्यक्ती कोल्हापूर जिल्ह्यातील त्या त्या तालुक्यातील स्थानिक रहिवासी असल्याबाबत आधारकार्ड किंवा इतर रहिवास इत्यादी पुरावा, व्यक्तीचे ओळखपत्र यांचा समावेश आहे. या आदेशाचे पालन न करणारी व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 (45) कलम 188 अन्वये आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी श्री देसाई यांनी दिला.
0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.