कोल्हापूर, दि. 23 (जिल्हा माहिती
कार्यालय): शेतकऱ्यांना
खते आणि बियाणे वाजवी दरात, दर्जेदार, गुणवत्तापूर्ण देण्याची राज्य शासनाची भूमिका
असून यामध्ये कसलीही तडजोड केली जाणार नाही, ज्या अधिकाऱ्यांच्या क्षेत्रात
यामध्ये हायगय होईल, त्या अधिकाऱ्यांवर थेट कारवाई केली जाईल, असा इशारा
कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिला.
खरीप हंगाम
आढावा बैठक कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहाच्या
राजर्षी शाहू सभागृहात संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस खासदार
धैर्यशील माने, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, आमदार
प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी
अधिकारी अमन मित्तल, विजयराव देवणे आदी उपस्थित होते.
शेतीमध्ये त्रिसुत्रीवर भर :
शेतकऱ्यांना आनंदी व चिंतामुक्त करणार
शेतकऱ्यांची
कसल्याही प्रकारे अडवणूक आणि फसवणूक होता कामा नये, अशी सक्त सूचना करुन
कृषीमंत्री श्री. भुसे म्हणाले, शासनाने यंदाचे वर्ष उत्पादकता वर्ष म्हणून घोषित
केले असून शेतीची उत्पादकता वाढ, दर्जेदार उत्पादन अणि शेतकरी ते ग्राहक थेट
शेतीमालाची विक्री या त्रिसुत्रीवर शेती विभागाने भर दिला आहे. कृषी अधिकाऱ्यांनी
याबाबत अधिक दक्ष राहून यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करुन शेतकऱ्यांना आनंदी आणि
चिंतामुक्त करण्यात पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
शेतकऱ्यांच्या मागणीनुसार
युरियाचा पुरवठा करु
शेतकऱ्यांच्या मागणीनुसार युरिया खताचा पुरवठा केला जाईल, अशी ग्वाही देऊन कृषीमंत्री
श्री. भुसे म्हणाले, राज्यातील विशेषत: कोल्हापूर जिल्हयातील एकही शेतकरी युरिया
खतापासून वंचित राहणार नाही, अशी व्यवस्था शासनामार्फत केली आहे. तसेच युरिया खत
खरेदी करताना दुकानदारांकडून अन्य वस्तू खरेदी करण्याची शेतकऱ्यांना सक्ती होणार
नाही, याची दक्षता कृषी अधिकाऱ्यांनी घ्यावी. तसेच, दुकानदारांनी दुकानामध्ये
खतांचे प्रकार, साठा आणि किंमत यांचे ठळकपणे दर्शनी भागात फलक लावावेत. सोयाबिन
पिकाच्या उगवण क्षमतेबाबत कृषी अधिकाऱ्यांनी दक्ष आणि सजग रहावे, अशी सूचना करुन
ते म्हणाले, खते आणि बियाणे विक्रीचे परवाने सहकारी संस्थांना देण्यामध्ये
असणाऱ्या अडचणी दूर करुन निश्चितपणे मार्ग काढला जाईल.
उसाचे अधिकाधिक क्षेत्र
ठिबकवर आणण्यास प्राधान्य
उसाचे अधिकाधिक क्षेत्र ठिबकवर आणण्यास शासनाने प्राधान्य दिले असल्याचे
सांगून कृषी मंत्री श्री. भुसे म्हणाले, ऊस ठिबकव्दारे घेतल्यास पाण्याची
आणि श्रमाची बचत होणार आहे. याकामी सहकारी साखर कारखान्यांनी पुढाकार घेऊन
शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर योजना राबवावी, असे आवाहनही त्यांनी केले. शेतकऱ्यांना
शेतीसाठी वीज जोडणी तात्काळ मिळावी याविषयी बोलतांना ते म्हणाले, विद्युत
विभागामार्फत लवकरच नवीन धोरण आणले जात असून यामध्ये वीज जोडणी तात्काळ देण्यावर
भर देण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना पुन्हा पीककर्ज देऊन उभं
करण्यास प्राधान्य
कोल्हापूर
जिल्हयातील 46 हजार 573 शेतकरी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती
योजनेसाठी पात्र शेतकरी असून त्यांना पुन्हा पीककर्ज देऊन उभं करण्यास शासनाचे
प्राधान्य राहील, असे सांगून कृषीमंत्री श्री. भुसे म्हणाले, कोल्हापूर जिल्हयात
95 टक्के पीककर्जाचे वाटप करण्यात आले आहे, ही समाधानाची बाब आहे. एकूणच राज्यातील
शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
कोल्हापुरात कृषी विद्यापीठ निर्माण करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचेही ते
म्हणाले.
यावेळी खासदार
धैर्यशील माने, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार आमदार
प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, यांनीही आपले मनोगत व्यक्त करुन कृषी विभागाबाबत
महत्वपूर्ण सूचना केल्या. या सर्व सूचनांचा आणि प्रश्नांच्या सोडवणुकीचा शासन
सकारात्मकदृष्टया विचार करेल, अशी ग्वाही कृषीमंत्री श्री. भुसे यांनी दिली.
प्रारंभी
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात
जिल्हयातील खंरीप हंगाम आणि कृषी विभागाच्या कामाची माहिती दिली. शेवटी कृषी विकास
अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी आभार मानले. या बैठकीस जिल्हा कृषी अधिकारी
उमेश पाटील, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, अग्रणी जिल्हा प्रबंधक राहुल माने यांच्यासह
सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सोबत : फोटो
जोडला आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.