गुरुवार, २५ जून, २०२०

टोळधाडीच्या प्रतिबंधासाठी टोळधाडीचे एकात्मिक व्यवस्थापनावर भर द्यावा -जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानदेव वाकुरे




       कोल्हापूर, दि. 25 (जिल्हा माहिती कार्यालय): देशाच्या आग्नेय दिशेकडून राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश मार्गे महाराष्ट्राच्या विदर्भ विभागात शेतीवर टोळधाड कीडीचे आगमन झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हयातील शेतकऱ्यांनी टोळधाडीच्या एकात्मिक व्यवस्थापनावर अधिक भर देऊन दक्ष रहावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे.
शेतीवर येणाऱ्या टोळधाडीच्या प्रतिबंधासाठी शासकीय यंत्रणा, कृषि विभागाचे अधिकारी-कर्मचारी, शेतकरी आणि ग्रामस्तरीय समित्या दक्ष केल्या असल्याचे सांगून जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानदेव वाकुरे म्हणाले की, टोळधाडीच्या प्रतिबंधासाठी नियमित सर्वेक्षणाबरोबरच आवश्यक उपाययोजनांसाठी साहित्याची जुळवाजुळव करून ठेवावी, यामध्ये प्रामुख्याने उंच झाडावरील किडीचा शोध घेण्यासाठी फ्लड लाईट्स, अस्का लाईट बॅटरी व फवारणीसाठी अग्नीशमन दलाचे बंब व ट्रॅक्टर चलीत फवारणी यंत्राचा वापर करणे गरजेचे आहे. त्यासाठी नगर परिषदेकडे, तहसिलदार कार्यालयाकडे, पंचायत समितीकडे असणारे आपत्ती निवारण अंतर्गत सदर साहित्य तसेच गावोगावी असणारे ट्रॅक्टर चलित फवारणी यंत्र इत्यादी साहित्यांची जुळवाजुळव व तयारी करून ठेवणे गरजेचे आहे. लागणारी किटकनाशके उदा. क्लोरोपायरीफॉस याची उपलब्धता कृषी विभागामार्फत करण्यात येईल.
देशाच्या आग्नेय दिशेकडून राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश मार्गे महाराष्ट्राच्या विदर्भ विभागात शेतीवर या कीडीचे आगमन झाले आहे. वाळवंटी टोळ या कीडीमुळे पिकांचे आणि इतर झाडे, झुडपे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अंडी. पिल्ले आणि प्रौढ अवस्था या कीडीच्या प्रमुख अवस्था आहेत. त्यापैकी प्रौढ अवस्था ही नुकसानकारक आहे. कीडीमुळे नुकसान व कीडीचे मार्गक्रमणावरून असे दिसून आलेले आहे की, सदर कीड रात्रीचे वेळी उंच झाडावर थव्याने एकत्र बसते व पानांचा फडशा पाडते तसेच दिवसा हवेच्या प्रवाहाबरोबर मार्गक्रमण करते. त्यासाठी रात्री पाहणी करून लगेच किटकनाशक फवारणी करावी लागते.
          या कीडीमुळे जिल्ह्यातील शेतीचे नुकसान टाळण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यवाही करण्याचे आवाहनही श्री. वाकुरे यांनी केले आहे.
          सर्वेक्षण/निरिक्षण यामध्ये शेतकऱ्यांनी नियमीतपणे सजग राहून आपल्या शेताच्या परिसरातील झाडा, झुडपांचे निरीक्षण करावे. विशेषत: रात्रीच्या वेळी गट तयार करून शेतात पाहणी व देखरेख करावी. कारण दिवसा उजेडी सदर कीड फारशी दृष्टीपथात येत नाही, मात्र रात्रीच्या वेळी झाडांवर मोठ्या प्रमाणात दिसून येते.
          प्रतिबंधात्मक उपापयोजनेमध्ये टोळ/कीटक आढळल्यास डबे, पत्रे, ढोल, सायरण, ट्रॅक्टर इ. आवाज करून कीड पिटाळता येते. संध्याकाळी/रात्रीच्या वेळी टोळ झाडांवर एकत्र जमा होतात. तसे आढळल्यास शेतामध्ये मशाली पेटवून तसेच टायर्स पेटवून धुर निर्माण करावा. टोळांची सवय थव्याथव्याने एका दिशेने पूढे जाण्याची आहे. त्यामुळे येणाऱ्या थव्यांच्या वाटेवर 60 से.मी. रूंद व 75 से.मी. चर खणून त्यात पिलांना पकडता येते.
          किटक नाशकांद्वारे नियंत्रणामध्ये थव्यांच्या स्थितीत पिलांची संख्या जास्त असल्यास निमअर्क प्रति हेक्टरी 2.5 लिटर फवारणी प्रभावी असल्याचे दिसुन आले आहे. विष आमिषांचा वापर गहू किंवा भाताचे तूस यामध्ये फिप्रोनिल 5 ईसी 3 मिली व त्यामध्ये किडीस आकर्षित करण्यासाठी मळी मिसळून प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये प्रति हेक्टरी 20-30 किलो याप्रमाणे फोकून द्यावे. मिथील पॅराथीआर 2 टक्के भुकटी 25 ते 30 किलो प्रति हेक्टरी धुरळणी करावी. क्लोरोपायरीफॉस 20 ईसी 24 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 50 ईसी 10 मिली किंवा डेल्टामिथ्रिन 2.8 ईसी 10 मिली किंवा फिप्रोनील 5 एससी 2.5 मिली किंवा ल्यांब्डा सायहेलथ्रिन 5 ईसी 10 मिली किंवा मॅल्याथिऑन 50 ईसी 37 मिली यापैकी एका किटकनाशकाची प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणी शक्यतो रात्री उशिरा किंवा पहाटेच्या वेळी करावी ज्यामुळे विश्रांतीसाठी झाडा, झुडपांवर मोठ्या संख्येने जमा झालेल्या टोळ कीडीचे नियंत्रण बऱ्याच प्रमाणात शक्य होते.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.