इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, ३० जून, २०२०

संसर्ग रोखण्यात यशस्वी झाल्याबद्दल गृहराज्यमंत्र्यांकडून कौतुक कोरोना रोखण्यासाठी कोल्हापूरने युनिक पॅटर्न राबविला -गृहराज्यमंत्री(ग्रामीण) शंभुराज देसाई



कोल्हापूर, दि. 30 (जिल्हा माहिती कार्यालय): कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोल्हापुरातील तीनही मंत्र्यांनी तसेच प्रशासनाने विशेषत: पोलीस, आरोग्य, महसूल   या सर्वांनी युनिक पॅटर्न राबवून प्रभावीपणे काम केले आहे. या नियोजनामुळे संसर्ग रोखण्यात जिल्हा यशस्वी ठरला आहे. यापुढेही असेच चांगले काम करा, अशा सूचना गृहराज्यमंत्री(ग्रामीण) शंभुराज देसाई यांनी आज दिल्या.
        येथील शासकीय विश्राम गृहातील राजर्षी शाहू सभागृहात गृह राज्यमंत्री (ग्रामीण) श्री. देसाई यांनी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील गृह, वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन या विभागांची आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव आदी उपस्थित होते.
            मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मित्तल यांनी संगणकीय सादरीकरण करून कोव्हिडबाबत सद्यस्थितीची माहिती दिली. जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी यावेळी 18 प्रवेश नाक्यावरून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींच्या संगणक प्रणालीद्वारे तपासणीबाबतची सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर जिल्ह्यातील प्रयोगशाळेत स्वॅब तपासणी अहवालाबाबतही सविस्तर माहिती दिली. पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आणि कोरोनातील कामकाजाबाबत सादरीकरण केले. जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती यादव, समाज कल्याण आयुक्त बाळासाहेब कामत, उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश पाटील, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनीही यावेळी माहिती दिली. सांगली जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनीही आपापल्या विभागाचा आढावा दिला.
            गृह राज्यमंत्री (ग्रामीण) श्री. देसाई यावेळी म्हणाले, पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनीही कोरोना रोखण्यासाठी चांगलं प्रभावीपणे काम केले आहे. प्रशासनाने युनिक पॅटर्न राबवून कोरोनाचा संसर्ग रोखला आहे. 24*7 फिल्डवर राहून परिस्थिती हाताळली आहे. विशेषत: पोलीस, महसूल, आरोग्य यांच्यावर अधिक जबाबदारी होती. या सर्वांचे आभार मानून ते पुढे म्हणाले, सांगली जिल्ह्यातही पालकमंत्री जयंत पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्यासह प्रशासनाने चांगले काम केले आहे.
            जिल्ह्यामध्ये विनापास कोणीही येणार नाही, याची दक्षता या पुढील काळात घ्यावी. पणन, उत्पादन शुल्क, वस्तु व सेवा कर विभाग यांनीही अधिक काम करून महसूल वाढवावा. लोकाभिमुख आणि स्वच्छ प्रशासन राबविण्याचे मुख्यमंत्री महोदयांचे धोरण आहे. यापुढेही आपण सर्व चांगले काम कराल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

सोबत : फोटो जोडला आहे.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.