गुरुवार, २५ जून, २०२०

प्रतिबंधित क्षेत्र वगळता सेतू व आपले सरकार सेवा केंद्रे सुरू जिल्हाधिकारी यांचे आदेश



कोल्हापूर, दि. 25 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यातील सर्व सेतू व आपले सरकार सेवा केंद्रामार्फत देण्यात येणाऱ्या सेवा प्रतिबंधात्मक क्षेत्र वगळता प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवत सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले.
सेतू व आपले सरकार केंद्रातील सामग्री/उपकरणे व परिसराचे 3 टक्के सोडीयम हायपोक्लोराईडने निर्जंतुकीकरण करून घेणे आवश्यक आहे.
केंद्रातील केंद्र चालक व इतर ऑपरेटर यांनी स्वच्छता विषयक सर्व निर्देशाचे पालन करणे आवश्यक आहे, यामध्ये वारंवार साबणाने हात धुणे, सॅनिटायझर वापरणे, मास्क इ.
          केंद्रामध्ये काम करताना ऑपरेटर यांनी नाक, तोंड व डोळ्यांना स्पर्श होणार नाही याची दक्षता घेतील. केंद्रातील ऑपरेटर व येणाऱ्या नागरिकांनी पूर्णवेळ तोंडाला मास्क वापरावा. केवळ फोटो काढण्याच्या वेळेस मास्क काढण्यास परवानगी देण्यात यावी.
          केंद्र व्यवस्थापक टेबल/ऑपरेटर स्थानकांदरम्यान सामाजिक अंतर किमान 1 मीटर सुनिश्चित करण्याचे आहे. जास्त गर्दी टाळण्यासाठी सेतू व आपले सरकार केंद्रामध्ये 10 वी, 12 वी च्या विद्यार्थ्यांना अग्रक्रम देण्यात यावा. 
नागरिकांना सामाजिक अंतर निश्चित करण्यासाठी योग्य अंतरासह जेथे उपयुक्त असेल तेथे मोकळ्या हवेत बसण्यास प्रोत्साहीत करावे.
नागरिकांना किंवा कर्मचाऱ्यांना खोकला, ताप, कफ, श्वासोच्छवासाच्या अडचणी इ.सारखे लक्षणे आढळल्यास त्यांनी सेतू व आपले सरकार केंद्रात न येण्याबाबत फलक लावावेत.
ऑपरेटर व मालक यांना प्रतिबंधित क्षेत्रातून प्रवास करता येणार नाही. प्रतिबंधीत क्षेत्र यामधील गावे/भागात सेतू व आपले सरकार केंद्र चालू करण्यात येऊ नयेत.
वरील बाबींचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती व त्यास सहाय करणाऱ्या सर्व संबंधित व्यक्तींवर अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे कारवाई करण्यात यावी, असेही आदेशात म्हटले आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.