गुरुवार, २२ एप्रिल, २०२१

खासगी बसमधील प्रवाशांची चाचणी करून 14 दिवस अलगीकरणाचे शिक्के मारणे आवश्यक -जिल्हाधिकारी दौलत देसाई

 








कोल्हापूर, दि. 22 (जिल्हा माहिती कार्यालय) : राज्य शासनाने प्रवासावर घातलेल्या निर्बंधाच्या अनुषंगाने खासगी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची ॲन्टीजेन टेस्ट करावी. तसेच, त्यांच्या हातावर 14 दिवस गृह अलगीकरणाचे शिक्के संबंधित खासगी वाहतूक संस्थेने मारणे आवश्यक आहे. राज्य शासनाच्या नियमाची परिवहन मंडळ तसेच खासगी वाहतूक संघटनांनी पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज राज्य शासनाने प्रवासावर घातलेल्या निर्बंधाच्या अनुषंगाने बैठक घेण्यात आली. बैठकीला पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस, विभाग नियंत्रक रोहन पलंगे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे, तहसिलदार अर्चना कापसे, रंजना बिचकर यांच्यासह खासगी वाहतूक संघटनेचे पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, बाहेरून येणाऱ्या बसेससाठी तालुकास्तरीय ठिकाणं निश्चित करा. येणाऱ्या प्रवाशांची ॲन्टीजेन टेस्ट करून  प्रवाशांचा हातावर 14 दिवस गृह अलगीकरणाचे शिक्के मारावेत. प्रवास सुरू करण्यापूर्वीच प्रवाशांची ॲन्टीजेन चाचणी  केल्यास सोईस्कर होईल. परिवहन मंडळानेही याबाबत नियोजन करावे. रेल्वेमधून येणाऱ्या प्रवाशांसाठीही रेल्वे प्रबंधक यांनी महापालिका कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने नियोजन करावे.

प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि पोलीस विभाग यांनी याबाबत ठिकाणांचे निश्चितीकरण करावे. खासगी प्रयोगशाळेंच्या मदतीने या चाचण्या संबंधित वाहतूक संस्थेने करणं आवश्यक आहे. राज्य शासनाने प्रवासावर घातलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन होईल याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.