बुधवार, १४ एप्रिल, २०२१

मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या मार्गदर्शक सूचना

 


 

  कोल्हापूर, दि. 14 (जिल्हा माहिती कार्यालय) : मुस्लिम बांधवांतर्फे पवित्र रमजान महिना दि. 13 किंवा 14/04/2021 (चंद्रदर्शनावर अवलंबून) ते दि. 13 किंवा 14/05/2021 पर्यंत साजरा केला जाणार आहे. पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम समाजामध्ये मोठ्या संख्येने मशिदीमध्ये जाऊन सार्वजनिकरित्या नमाज अदा करण्याची प्रथा आहे. या कालावधीत मुस्लिम बांधव नमाज, तरावीह व इफ्तारसाठी एकत्र येतात. राज्यात सुरु असलेला कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता शासनाच्या दिनांक 04 एप्रिल, 2021 नुसार पारीत केलेल्या आदेशानुसार  या वर्षी पवित्र रमजान महिना साजरा करणे आवश्यक आहे. त्यास अनुसरुन दि. 13 किंवा 14/04/2021 रोजी पासून सुरु होणाऱ्या मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान महिना साजरा करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

१)      कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी पवित्र रमजान महिन्यात मुस्लीम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी मशिदीमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपआपल्या घरातच साजरे करावेत. नमाज पठणाकरीता मशिदीत तसेच मोकळ्या जागेत एकत्र येऊ नये.

२)     सार्वजनिक ठिकाणी एकावेळी 5 पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र न येता सोशल डिस्टंन्सिंग व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे  (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पालन करुन पवित्र रजमान महिना अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात यावा.    

३)     या पवित्र महिन्यात मुस्लीम बांधव 30 दिवस दररोज पहाटे पासून उपवास ठेवतात व संध्याकाळी मगरीब नमाजपुर्वी उपवास सोडतात. या सेहरी व इफ्तारच्या वेळी  अनेक फळ व अन्नपदार्थ विक्रेते गर्दी करण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने स्थानिक प्रशासनाने या बाबत योग्त ती उपाययोजना करावी. शासनाकडील दिनांक 04/04/2021, दिनांक 05/04/2021 व दिनांक 13/04/2021 रोजीच्या आदेशाप्रमाणे  निर्गमित केलेल्या  या कार्यालयाकडील क्रमांक कार्या-12/नैआ/कोरोना/आरआर /108/2021 दिनांक 05/04/2021 व दिनांक 06/04/2021 तसेच क्रमांक कार्या-12/नैआ/कोरोना/आरआर /126/2021 दिनांक 14/04/2021 रोजीच्या आदेशान्वये दिलेल्या सर्व सुचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे..               

४)     पवित्र रमजान महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी दुवा पठण (अलविदा जुम्मा)  करण्याची प्रथा आहे. त्यासाठी मुस्लीम बांधव मोठया प्रमाणात मशिदीमध्ये येऊन दुवा पठण करतात. परंतू यावेळी कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता कोणीही मशिदीमध्ये दुवा पठणाकरीता एकत्र जमू नये. आपापल्या घरातच दुवा पठण करावे.

५)     शब-ए-कदर ही पवित्र रात्र रमजान महिन्याच्या 26 व्या दिवशी साजरी करण्याची प्रथा आहे. या निमित्ताने मुस्लीम बांधव  तरावीह नमाज संपल्यानंतर आपल्या विभागातील मशिदीमध्ये रात्रभर कुराण पठण व नफील नमाज अदा करतात. परंतू यावर्षी सर्व मुस्लीम बांधवांनी सदर धार्मिक कार्यक्रम आपापल्या घरात राहूनच करावेत.

६)     पवित्र रमजान महिन्यात बाजारामध्ये सामान खरेदीकरीता गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये. तसेच याबाबत स्थानिक प्रशासनाने सामान खरेदीसाठी वेळेचे बंधन घालून दिले असल्यास त्याचे तंतोतंत पालन करण्यात यावे.

७)     धार्मिक स्थळे बंद असल्याने वाझ कार्यक्रमांचे आयोजन शासनाच्या नियमांचे पालन करुन बंद जागेत शक्यतो ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात यावे.

८)     कोवीड-19 या विषाणूच्या अनुषंगाने राज्यात फौ.दं.प्र.सं.कलम 144 लागू असल्याने तसेच रात्रीची संचारबंदी असल्यामुळे फेरीवाल्यांनी रस्त्यावर स्टॉल लावू नये तसेच नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरु नये.

९)     या पवित्र रमजान महिन्यात कोणत्याही प्रकारे मिरवणूका,धार्मिक,सामाजिक,सांस्कृतिक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येवू  नये.

१०) धार्मिक स्थळे बंद असल्याने मुस्लीम समाजातील धर्मगुरु,सामाजिक कार्यकर्ते,राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून पवित्र रमजान महिना साधेपणाने साजरा करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करण्यात यावी.

११) पवित्र रमजान महिन्यात सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्याबाबत  काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

१२) कोवीड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका,पोलीस,स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष रमजान सण सुरु होण्याच्या व चालू असतानाच्या मधल्या कालावधीत अजून काही सुचना प्रसिध्द झाल्यास त्यांचेदेखील अनुपालन करावे.

                                                           

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.