कोल्हापूर, दि. 9 (जिल्हा माहिती कार्यालय) : ग्राम कृषी विकास समिती
स्थापन करून तिच्या माध्यमातून प्रत्यक्ष शेतावर जावून अधिकाऱ्यांनी सत्य
परिस्थितीवर आधारित कृषी आराखडा सादर करावा, असे निर्देश कृषी मंत्री दादाजी भुसे
यांनी आज दिले.
कृषी मंत्री श्री. भुसे
यांनी दूरदृश्यप्रणालीव्दारे येथील जिल्हाधिकारी कार्यालयातून राज्यस्तरीय खरीप
हंगामपूर्व तयारी बैठकीत सहभाग घेतला. यावेळी आमदार
ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, कृषी सहसंचालक उमेश पाटील, जिल्हा अधीक्षक
कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, आत्माच्या
प्रकल्प संचालक सुनंदा कुऱ्हाडे, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, उल्हास पाटील आदी
उपस्थित होते.
कृषी मंत्री श्री. भुसे
म्हणाले, चालू वर्षी वेध शाळेने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. लॉकडाऊनच्या
काळात शेतकरी बांधवांनी राज्याची अर्थव्यवस्था सुरळीत ठेवण्यात पुढाकार घेतला.
कोणत्या पिकाखाली किती क्षेत्र येणार आहे, कोणत्या ठिकाणी किती पाऊस होतो, कोणत्या
प्रकारची पिके किती क्षेत्रावर होतात याबाबतची वस्तूनिष्ठ आकडेवारी हवी. त्यासाठी
अधिकाऱ्यांनी शेतावर जाणं आवश्यक आहे. त्याचबरोबर गावात स्थापन झालेल्या ग्राम
कृषी विकास समितीतून याची माहिती द्यावी. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या
संकल्पनेतून साकारलेली विकेल ते पिकेल योजनेखाली पीक पध्दतीत बदल करायची आवश्यकता आहे. मशागतीपासून
शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाच्या विक्रीपर्यंत नियोजन आवश्यक आहे.
रासायनिक खतांची दरवाढ आणि
कापूस बियाण्यांची दरवाढ मागे घ्यावी, अशी विनंती करणारे पत्र आजच केंद्र शासनाला
पाठवले जाईल. बीज उगवण परिक्षणाबाबत प्रत्यक्ष कृतीतून काळजी घ्यायला हवी.
रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनींचा पोत खराब झाला असून मानवी जीवनावर गंभीर
परिणाम होतोय. त्यासाठी चालू वर्षी 10 टक्के वापर कमी करण्याबाबत नियोजन आराखडा
आतापासून करा. त्याबाबत जनजागृती मोठ्या प्रमाणात करा. शेतकऱ्यांना त्यांच्या
समस्या, अडीअडचणी मांडण्यासाठी आणि त्या सोडवण्यासाठी आयुक्त कार्यालयात एक खिडकी
योजना राबवावी. त्याबाबत नियोजन करावं. युरियाचा बफर स्टॉक करायला घेणार आहोत.
त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यात किती वाण लागतोय त्याबाबतही अभ्यास करून बफर स्टॉक
करावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
कोल्हापूर जिल्ह्यात
चहाच्या शेतीबाबत आणि पर्यटनाबाबत खासदार धैर्यशील माने यांनी शिफारस केली आहे.
असे नाविण्यपूर्ण प्रयोग करून शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे. कष्टातून शेती उभी
करणाऱ्या शेतकऱ्यांची शासन दरबारी नोंद घेऊन अधिकाऱ्यांनी त्यांचा सन्मान करावा.
खरीप हंगामाचे नियेाजन करताना पीक कर्ज लवकरात लवकर कसे उपलब्ध होईल याबाबतही
नियोजन करावे. त्याचबरोबर कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, कृषी
महाविद्यालये, शिक्षक आणि विद्यार्थी यांनाही सोबत घेवून नियोजन करावे, असेही ते
म्हणाले.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.