कोल्हापूर,
दि. 22 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यामध्ये कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव वाढत आहे.
जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने व इतर उद्योगामधील असलेली ऑक्सिजन सिलेंडर ही कोव्हिड-19
विषाणूबाधित रूग्णांच्या उपचारासाठी वापरण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने व इतर उद्योग/कारखाने
यामध्ये उपलब्ध असलेल्या ऑक्सिजन सिलेंडर संख्या व त्याचा सविस्तर तपशिल तात्काळ एकत्रित
करून जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद व आरोग्य अधिकारी कोल्हापूर महानगरपालिका यांना
देण्यात यावा. व त्यांच्या मागणीप्रमाणे संबंधित कारखाने/उद्योगांकडून ऑक्सिजन
सिलेंडर अधिग्रहित करून त्यांना पुरविण्यात यावी. ऑक्सिजन सिलेंडर अधिग्रहित
करताना व आरोग्य यंत्रणेला पुरविताना त्यांच्या स्वतंत्र नोंदवह्या ठेवून त्यामध्ये
आवश्यक असणारा सर्व तपशिल नमूद करण्यात यावा, असेही जिल्हाधिकारी श्री. देसाई
यांनी म्हटले आहे.
जिल्ह्यामध्ये कोव्हिड-19 संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असून
कोव्हिड-19 बाधित रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. त्यामुळे
कोव्हिड-19 बाधित रूग्ण मोठ्या प्रमाणात सर्व शासकीय/ खासगी रूग्णालयामध्ये,
कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल होत
असून या रूग्णांना वैद्यकीय ऑक्सिजन उपचारासाठी पुरवठा केला जात आहे. तथापि कोव्हिड-19
रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे येत्या काही दिवसात रूग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या
वैद्यकीय ऑक्सिजनची गरज अनेक पटीने वाढण्याची शक्यता आहे. वैद्यकीय ऑक्सिजनच्या
कमतरतेमुळे कोव्हिड-19 रूग्णांच्या उपचारावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत
नाही. यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ,
कोल्हापूर, जिल्हा महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, कोल्हापूर व जिल्हा
उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर यांना आज जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पत्र
पाठविले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.