कोल्हापूर, दि. 21 (जिल्हा माहिती कार्यालय) : सी.पी.आर.हे सर्वसामान्यांचे
आधारवड आहे. गेल्या 10 ते 15 वर्षात आपण प्रचंड काम केले आहे. त्याचपध्दतीने अत्यंत
दक्षतापूर्वक गांभीर्याने सध्याच्या महामारीत सर्व विभागाने काम करून मृत्यूदर कसा
कमी करता येईल, याबाबत जबाबदारी उचलावी, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी
केले.
छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयात आज पालकमंत्री
श्री. पाटील यांनी सर्व विभागप्रमुखांची आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत
देसाई, प्रभारी अधिष्ठाता डॉ.सुधीर सरवदे, जिल्हा
शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे आदी उपस्थित
होते.
पालकमंत्री श्री. पाटील यांनी सर्वप्रथम आढावा
घेतला. संभाव्य वाढती रूग्णसंख्या लक्षात घेवून तयारी करण्याबाबत सांगितले. ते
म्हणाले, गेल्यावर्षी आपण सर्वांनी समर्थपणे आणि प्रामाणिकपणे काम केले आहे. वर्षभरात
चांगले काम झालेले आहे. त्यामध्ये काही उणिवा राहात आहेत, त्या कमी करण्याची जबाबदारी
आपणाला घ्यावी लागेल. वैद्यकीय क्षेत्रात जीवन-मरणाचा विषय असल्याने दुर्लक्ष करून
अथवा हलगर्जीपणा करून चालणार नाही. कोविड येण्यापूर्वी ओ.पी.डी. आणि आय.पी.डी.
किती होती? आणि सध्या किती आहे? याचा बारकाईने विचार केला तर, आपण कुठे कमी पडतोय
याचे चिंतन करणे आवश्यक आहे.
कोविड
येण्यापूर्वी इतर रूग्णसंख्या मोठ्यासंख्येने असतानाही उपचाराबाबत नियोजन होत
होते. सद्यस्थितीत, कोविडचे रूग्ण संख्या कमी असताना कुठे कमी पडतो का? याबाबत,
सर्वांनी दक्ष असणे आवश्यक आहे. सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येकाने थोडे
जास्तीचे काम करावे. सी.पी.आर.ची यंत्रणा सक्षम आहे. जिल्ह्याच्या सी.पी.आर.वर
विश्वास आहे. हा विश्वास सार्थ करून दाखविण्यासाठी सर्व विभागाने जबाबदारीने काम करावे.
मृत्यूदर रोखण्यासाठी सक्षमपणे पावले उचलावीत. सी.पी.आर. मध्ये रूग्णासाठी बेड मिळावा
असे फोन आले पाहिजेत, अशा पध्दतीने आपण सर्वांनी काम करावे, असे पालकमंत्री
म्हणाले. यानंतर त्यांनी उपस्थितांच्या समस्यांबाबतही चर्चा केली.
मन लावून काम करू, मृत्यू दर रोखू पालकमंत्र्यांच्या आवाहनाला, अधिक दक्षता
घेवून 24 तास सेवा देऊ, मृत्यू दर कमी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करू, मन लावून
काम करू, मृत्यू दर रोखू, आलेले रूग्ण बरे होऊन घरी जातील याची हमी देतो, असा
विश्वास उपस्थित विभागप्रमुखांच्यावतीने डॉ. सरवदे, डॉ.उल्हास मिसाळ, डॉ.विजय
बर्गे, डॉ. राहूल बडे यांनी यावेळी व्यक्त केला. |
सी.पी.आर.मधील आजची स्थिती
ऑक्सीजन बेड- 480,
आयसीयू बेड-91,
व्हेंटिलेटर-91,
एकूण रूग्ण संख्या-212,
व्हेंटिलेटरील रूग्ण-42,
ऑक्सीजनवरील रूग्ण-179,
नवीन रूग्ण-22,
डिस्चार्ज-11,
संशयित-25,
डॉक्टर्स – 178,
नर्सिंग स्टाफ-414,
जिल्हाधिकारी श्री. देसाई यावेळी म्हणाले, एकही
रूग्ण दगावणार नाही असे ध्येय प्रत्येकाने ठेवा. रूग्ण ज्या वार्ड मध्ये उपचार घेत
आहे, त्या वार्ड मधील डॉक्टर, नर्स यांनी रूग्ण बरा होऊन घरी जाईल याची जबाबदारी
घ्यावी. माझ्या ड्युटीत एकही मृत्यू होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी. सी.पी.आर.कडूनही
चांगलचं घडावं अशी अपेक्षा आहे. आपलेच नातेवाईक उपचार घेत आहेत, असे समजून काळजी
घ्यावी. सी.पी.आर.चे नावलौकिक आहे. सर्वसामान्यांसोबत आपुलकीचं नातं आहे. हाच
नावलौकिक जपूया खासगी रूग्णालयापेक्षा सी.पी.आर. कशातही कमी नाही, हे दाखवून
देवूया.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.