कोल्हापूर दि. २२ : पर्यावरणाचा ढासळणारा समतोल सांभाळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करणे आणि त्याचे संवर्धन करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज केले.
सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने आयोजित राष्ट्रीय हरित सेना कार्यशाळेचे उद्घाटन आज डॉ. म्हैसेकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. येथील मुख्याध्यापक संघाच्या सभागृहात ही कार्यशाळा झाली.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, ‘पर्यावरणाचे संवर्धन होण्यासाठी वृक्ष लागवड आणि त्याचे संवर्धन होण्याची आवश्यकता आहे. शासनाने १०० कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प सोडला आहे. हा संकल्प साध्य करण्यासाठी आपल्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करावी लागणार आहे. यासाठी राष्ट्रीय हरित सेनेला आपली भूमिका प्रभावीपणे बजवावी लागणार आहे.’
सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक एस. एम. गुजर यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी यंदाचे वर्ष जागतिक वन वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यासाठी वृक्ष लागवड करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
यावेळी मुख्य वनसंरक्षक एन. मोहन कर्नाट, वनसंरक्षक एच. एन. पाटील, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी उमेश पाटील, उदय गायकवाड, अनिल चौगले आदी उपस्थित होते. यावेळी सामाजिक वनीकरण विभागामार्फत घेण्यात आलेल्या निबंध, वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.