कोल्हापूर,दि.
14 (जिल्हा माहिती कार्यालय): मूळ गावी
निघून गेलेले कामगार आता पुन्हा आपापल्या कारखान्यात येण्यास सुरुवात झाली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जिल्ह्यातील इतर व्यक्तींना होऊ नये, यासाठी बाहेरुन
येणाऱ्या अशा सर्व व्यक्तींना 14 दिवस संस्थात्मक अलगीकरणात ठेवणे बंधनकारक असून
याची सर्व जबाबदारी संबंधित कारखानदारांची राहील, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत
देसाई यांनी आज दिले.
कोव्हीड 19 प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक कालावधीत
नागरिक व वाहनांच्या हालचालीसाठी असणाऱ्या जिल्हा बंदीत कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यामधील
विविध कारखाने व आस्थापनांमधील कामगार/कर्मचारी त्यांच्या परराज्यातील/इतर जिल्ह्यातील
मूळ गावी निघून गेलेले आहेत. बंदी कालावधीत परराज्यातील व इतर जिल्ह्यातील मूळ
गावी निघून गेलेले कामगार कर्मचारी आता पुन्हा आपापल्या कारखाना / आस्थापनामध्ये
येण्यास सुरुवात झालेली आहे किंवा असे आस्थापनाधारक/ कारखानदार त्यांच्या
त्यांच्या आस्थापनामध्ये काम करण्यासाठी कामगार कर्मचाऱ्यांना पुन्हा बोलवीत आहेत
व असे कामगार कर्मचारी जिल्ह्यामध्ये परतण्यास सुरुवात झालेली आहे. जिल्हा
बंदीच्या कालावधीत किंवा त्यांनतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे बाहेरुन
येणाऱ्या व्यक्तीमुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव/संसर्ग जिल्ह्यातील इतर
व्यक्तींना होऊ नये यासाठी बाहेरुन येणाऱ्या अशा सर्व व्यक्तींना किमान 14
दिवसांच्या कालावधीसाठी संस्थात्मक अलगीकरणात ठेवणे बंधनकारक आहे. याबाबत खालील
प्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात येत आहेत.
जिल्ह्यामध्ये बाहेरील जिल्हा / राज्यामधून
येणाऱ्या सर्व कामगार/ कर्मचाऱ्यांची तालुकास्तरीय कोव्हीड काळजी केंद्रामार्फत
तपासणी करण्यात यावी. असे कामगार/कर्मचारी परस्पर त्या त्या
आस्थापना/कारखान्यामध्ये गेल्यास त्याबाबतची सर्व जबाबादारी संबंधित
आस्थापना/कारखान्याची राहील.
कोव्हीड काळजी केंद्रामार्फत तपासणी करण्यात आलेल्या कामगार/कर्मचाऱ्यांचे
कोव्हीड 19 तपासणी स्वॅब घेणे आवश्यक असल्यास ते घेण्यात यावेत व अशा व्यक्तींना
कोव्हीड काळजी केंद्रात अहवाल येईपर्यंत निरिक्षणाखाली ठेवण्यात यावे.
ज्या व्यक्तींचे अहवाल पॉझीटीव्ह (कोरोना बाधीत)
असल्याचे निष्पन्न होईल अशा व्यक्तींना कोव्हीड काळजी केंद्रात वैद्यकीय
उपचारासाठी विलगीकरणात दाखल करुन घ्यावे व त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु
करावेत.
ज्या व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह येतील
त्यांना संस्थात्मक अलगीकरणासाठी संबंधीत आस्थापना/कारखाना प्रशासनाकडे हस्तांतरीत
करावे.
ज्या व्यक्तींना कोव्हीड काळजी केंद्रात तपासणी
अंती स्वॅब घेण्याची आवश्यकता नाही असे निष्पन्न झाल्यास अशा सर्व व्यक्तींना
संस्थात्मक अलगीकरणासाठी संबंधीत आस्थापना कारखाना प्रशासनाकडे हस्तांतरीत करावे.
ज्या कामगार कर्मचारी यांना संस्थात्मक
अलगीकरणासाठी संबंधीत आस्थापना/कारखाना प्रशासनाकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहे,
अशा सर्व कामगार/कर्मचा-यांचे 14 दिवस संस्थात्मक अलगीकरण करण्याची संपूर्ण
व्यवस्था संबंधीत कारखाना आस्थापनांनी स्वतंत्र ठिकाणी करावी व तेथील राहणे,
जेवण,वैद्यकीय सुविधा व इतर सर्व अनुषंगिक खर्च संबंधीत आस्थापना/कारखाना यांनी
करणे बंधनकारक राहील. या ठिकाणी ठेवलेल्या सर्व कामगार/कर्मचाऱ्यांची दैनंदिन
वैद्यकीय तपासणी करणे बंधनकारक असेल व ज्या व्यक्तींना कोरोनासदृष्य लक्षणे दिसू
लागतील त्यांची माहिती तात्काळ नजीकच्या कोव्हीड काळजी केंद्राचे प्रभारी
अधिकाऱ्यास देणे बंधनकारक राहील, अशा व्यक्तींना तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी
कोव्हीड केंद्रात दाखल करण्याची जबाबदारी संबंधित आस्थापना /कारखाना प्रशासनाची
राहील.
ज्या कामगार/कर्मचाऱ्यांना संस्थात्मक अलगीकरणामध्ये 14 दिवसांसाठी
ठेवावयाचे आहे अशी अलगीकरणाची ठिकाणे ही शासकीय संस्थात्मक अलगीकरण केंद्रा
व्यतिरिक्त संबंधीत आस्थापना/कारखाना प्रशासनाने स्वखर्चाने उपलब्ध करुन
त्याठिकाणी त्यांच्या आस्थापना/कारखान्यामध्ये काम करण्यासाठी आलेल्या सर्व
कामगारांसाठी व्यवस्था करावयाची आहे. त्याचप्रमाणे अशा बाहेरुन आलेल्या सर्व
कामगार/कर्मचाऱ्यांची नोंद संबंधीत आस्थापना/कारखाना प्रशासनाने सहायक आयुक्त,
कामगार कार्यालयाकडे करण्याची आहे.
या आदेशाचे पालन करण्यास नकार देणाऱ्या
आस्थापना/कारखाने त्याचप्रमाणे त्यांच्या आस्थापनामधील कामगार/कर्मचाऱ्यांची
संस्थात्मक अलगीकरणाची सुविधा निर्माण करण्यास व आवश्यक सोई सुविधा पुरविण्यास
नकार देणा-या आस्थापना, कारखाना प्रशासना विरुध्द या आदेशाचा भंग केल्याबद्दल
भारतीय दंड संहिता 1973 च्या कलम 188 अन्वये फौजदारी कारवाई करण्यासाठी सहायक
आयुक्त, कामगार व त्यांचे प्रतिनिधी, उप विभागीय अधिकारी, तहसिलदार किंवा त्यांचे
प्रतिनिधी यांना प्राधीकृत करण्यात येत आहे. सर्व संबंधीतांनी या आदेशाची
काटेकारपणे अंमलबजावणी करावी.
0 0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.