इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२०

सक्षम ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत 12 रूग्णालयातील अत्याधुनिक आरोग्य सुविधांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण कायमस्वरूपी साथरोग नियंत्रण रूग्णालय उभे करण्यासाठी पुढाकार घ्या -मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

 



 

कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय): कोणत्याही साथीला सामोरे जाण्यासाठी रूग्णालयांची आवश्यकता आहे. यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.  कोल्हापूर जिल्ह्यात कायमस्वरूपी साथरोग नियंत्रण रूग्णालय उभे करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा. त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज दिली.

सक्षम ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत जिल्ह्यातील 10 ग्रामीण रूग्णालय व दोन उपजिल्हा रूग्णालयांमध्ये करण्यात आलेल्या अत्याधुनिक आरोग्य सुविधांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून आज झाला.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यावेळी म्हणाले, खासदार, आमदार अनेकजण होतात. प्रत्येकाला वारसा, परंपरा असते. दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांची परंपरा खासदार संजय मंडलिक पुढे चालवित आहेत. या रुग्णालयांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे मिळणारे आशीर्वाद फार मोलाचे आहेत. दररोज केवळ आरोग्यावरच आपले काम सुरु आहे. विकासाचे मार्गक्रमण करत आहोत. जिल्ह्यासाठी सदृढ आरोग्य सुविधा देणे आवश्यक आहे. त्यासाठी मुंबईसारख्या सेवा ग्रामीण भागात करायच्या आहेत.

आजही आपण फिल्ड, जंबो रुग्णालयांची उभारणी राज्यभर केली आहे. या सुविधा तात्पुरत्या असल्या तरी त्यातून आपण दर्जेदार आरोग्य सेवा देत आहोत. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, आयसीयु कक्षात आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध आहेत. याचा उपयोग कायम स्वरुपी यंत्रणा उभी करताना करता येईल. जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक असलेला प्रस्ताव पाठवावा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

दुर्गम भागात सेकंड ओपिनिएन हवे असेल, तज्ज्ञांचा सल्ला हवा असेल तर मुंबई पुण्याचाच नाही तर जगभरातील तज्‌ज्ञांची सेवा टेलीमेडिसिनच्या माध्यमातून उपलब्ध करुन देता येईल.  पुढील महिन्यात चेस द व्हायरसचा संपूर्ण कार्यक्रम महाराष्ट्रभर राबविण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. 55 वर्षावरील सर्व नागरिकांची यात तपासणी करण्यात येणार असून ज्यांना ह्दयरोग, किडनीचे किंवा इतर आजार आहेत त्यांच्यावर या अंतर्गत उपचार करण्यात येईल.

महाराष्ट्र हा लढवय्या आहेच. मनाने आणि विचारांनी सदृढ आहे. या महाराष्ट्राला आपण सर्वजण मिळून आरोग्याच्या दृष्टिने सदृढ महाराष्ट्र घडवूया, स्वयंशिस्तीने एकमेकांची काळजी घेऊन, परस्पर सहकार्याने काम करुन कोरोनाला नक्की हरवू या असा विश्वासही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी व्यक्त केला.

 

सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यावेळी म्हणाले, दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी ग्रामीण भागातील वंचित घटकांना आधार देण्याचे काम केले आहे. तिच परंपरा खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी पुढे जोपासली आहे. चंदगडमध्ये ट्रॉमा सेंटर मंजूर केले आहे. मात्र त्यासाठी लागणाऱ्या जागेचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. तो मार्गी लावावा. एनएचएम मधून प्रस्ताव पाठविला असून त्यासाठी निधी मिळावा आणि फिजीशिएनना कायमस्वरुपी सेवेत घेणेबाबत मार्ग काढवा अशी मागणी त्यांनी केली.

आमदार प्रकाश आबिटकर यावेळी म्हणाले, दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या स्मृती दिनानिमित्त सदाशिवराव मंडलिक इरिगेशन डेव्हलपमेंट रिसर्च फौंडेशन मार्फत देण्यात येणारा स्मृती गौरव पुरस्कार रद्द करुन पुरस्काराची संपूर्ण रक्कम तसेच स्थानिक विकास निधी आणि मित्र परिवार व विविध औद्योगिक संस्थानी केलेली मदत अशा निधीतून ग्रामीण भागातील रुग्णालयांना सुविधा देत सक्षम केले आहे. याचा लाभ सर्वसामान्य जनतेला होणार आहे.

आमदार राजेश पाटील म्हणाले, दुर्गम, डोंगराळ भागात असणाऱ्या चंदगड, आजरा, गडहिंग्लज या तिन्हीसाठी गडहिंग्लज येथील उप जिल्हा रुग्णालयाची क्षमता वाढवावी. ट्रामा केअर सेंटरच्या जागेचा प्रश्नही मार्गी लावावा. माजी आमदार चंद्रदीप नरके यांनीही मनोगत व्यक्त केले.

जिल्हाधिकारी दौलत देसाई यावेळी म्हणाले, जिल्ह्यातील कागल, मुरगुड, राधानगरी, गारगोटी, सोळांकूर, आजरा, चंदगड, नेसरी, गगनबावडा व खुपिरे ही दहा ग्रामीण रुग्णालये आणि गडहिंग्लज व वळीवडे या दोन उप जिल्हा रुग्णालयांचा कायापालट करण्याचे काम फौंडेशनने केले आहे. याचा लाभ या भागातील सर्वसामान्य रुग्णांसाठी होणार आहे.

लॉकडाऊन शिथील केल्यानंतर मोठ्या प्रमाणात बाहेरच्या जिल्ह्यातून नागरिक आले. त्यामुळे जिल्ह्यामध्ये रुग्णांची संख्या वाढली.  जिल्ह्यात 45 कोव्हिड काळजी केंद्र आणि 2 समर्पित कोव्हिड आरोग्य केंद्रे उभारण्यात आली असून या ठिकाणी ऑक्सिजनची सुविधा देण्यात आली आहे. खासगी रुग्णालयांमध्ये खाटांची संख्या वाढविण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 20 कोटीचा निधी खर्च केला आहे. यात प्रामुख्याने  सर्वात आधी लॅब उभी करण्यात आली आहे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. प्रारंभी सक्षम ग्रामीण आरोग्य अभियानांर्गत 12 रूग्णालयातील अत्याधुनिक आरोग्य सुविधांबाबतची चित्रफित दाखविण्यात आली.

यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अधीष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील, प्रांताधिकारी विजया पांगारकर, रामहरी भोसले उपस्थित होते. आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार यांनी आभार मानले.

000000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.