कोल्हापूर, दि.
25 (जिल्हा माहिती कार्यालय) : कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची तात्काळ सोय उपलब्ध
व्हावी यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी युध्दपातळीवर निर्णय घेवून जिल्हा
नियोजन समितीमधून 20 हजार लिटरच्या लिक्विड ऑक्सिजन टँक खरेदीला मंजुरी दिली होती.
हा टँक आजपासून कार्यान्वित करण्यात आला आहे. त्यामुळे दिवसाला 275 रुग्णांच्या ऑक्सिजनची सोय झाली असून आणखी
125 रुग्णांसाठी पुरवठा करण्याचे काम युध्द पातळीवर सुरु आहे.
30 फूट
उंच, 2 मीटर व्यास असलेला हा लिक्विड टँक आज बसविण्यात आला. यासोबतच 400 क्युबिक
मीटर प्रतीतास क्षमतेचा वेपोरायझरही बसविण्यात आला आहे. 20 हजार लीटर क्षमतेचा हा
टँक असून यातील 1 लीटर द्रवापासून 850 लीटर वायूरुप ऑक्सिजन मिळणार आहे. या टँकमधून सीपीआरमध्ये 17 ठिकाणी असणाऱ्या
ऑक्सिजन बँकमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. तेथून पाईपलाईनद्वारे
रुग्णांच्या खाटापर्यंत ऑक्सिजन सुविधा देण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी
दौलत देसाई यांनी चेन्नई येथील व्हीआरव्ही एशिया पॅसिफिक प्रा. लि. कंपनीशी
संपर्क साधून हा टँक मागवला आहे. हा टँक बसविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे
कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, शाखा अभियंता अविनाश पोळ, कोल्हापूर ऑक्सिजनचे
मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र गाढवे, तांत्रिक व्यवस्थापक रवींद्र देसाई, संजय
दिंडे, अभियंता सुजित प्रभावळे, मेंटन्स
हेड शैलेश धुळशेट्टी, लगमा मधिहाळ, प्रदिप भोपळे यांनी परिश्रम घेतले. आज वैद्यकीय
अधीष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के यांनी भेट देवून याची पाहणी केली. यावेळी डॉ.
उल्हास मिसाळ आणि बायोमेडिकल अभियंता वैजनाथ कापरे हे उपस्थित होते.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.