कोल्हापूर, दि. 20
(जिल्हा माहिती कार्यालय) :- सामान्य माणसाला आधार
देण्यासाठी शासनाने आरोग्य केंद्रे उभी केली आहेत. गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयाची
सेवा लक्षात घेऊन रुगणालयात बेडची क्षमता दोनशे पर्यंत नेण्यासाठी प्रयत्न केले
जातील, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य
राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.
आमदार राजेश पाटील यांच्या निधीतून
गडहिंग्लज उप जिल्हा रुग्णालयासाठी दिलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण आरोग्य
राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते झाले. तद्नंतर पंचायत समिती
कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस खासदार संजय मंडलिक, आमदार
राजेश पाटील, गडहिंग्लजच्या नगराध्यक्षा स्वाती कोरी, पंचायत समिती सभापती रुपाली
कांबळे, प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार
दिनेश पारगे, गटविकास अधिकारी शरद मगर, उदय जोशी, माजी सभापती अमर चव्हाण, विजय
देवणे आदीउपस्थित होते.
श्री. यड्रावकर म्हणाले, मुंबईत जेव्हा
कोरोना रुग्णांची संख्या वाढत होती तेव्हा धारावीची संख्या कशी कमी होणार याकडे
साऱ्या महाराष्ट्राचे, देशाचे लक्ष लागले होते.
ही संख्या आता नगण्य आहे. पण ग्रामीण भागात वाढणारी रुग्णांची वाढती संख्या
चिंताजनक आहे. मात्र कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी शासन व प्रशासनास सर्व
उपाययोजना राबवत असून नागरिकांनी त्यास सहकार्य करावे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना
सामाजिक अंतर पाळून मास्काचा वापर करावा, असे आवाहन आरोग्य राज्यमंत्री श्री.
यड्रावकर यांनी केले.
गडहिंग्लज
तालुक्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अत्यंत चांगले आहे. तर मृत्यूचे प्रमाणही कमी
आहे. महसूल, आरोग्य कर्मचाऱ्यांसह सर्वांनीच घेतलेल्या कष्टामुळे आपण कोरोनावर
नियंत्रण मिळविण्यात यशस्वी होत आहोत. सरकारी दवाखान्याकडे पाहण्याची लोकांची
मानसिकता आता बदलली आहे. सरकारी दवाखान्याशिवाय दर्जेदार उपचार होऊ शकत नाही. ही
धारणा सर्वांचीच आहे. त्यामुळे प्रशासन गतिमान करूया, कोरोना मुक्तीकडे वाटचाल
करीत सामान्य माणसाचे जगणे सुकर करूया. असे आवाहनही श्री. यड्रावकर यांनी केले.
खासदार श्री. मंडलिक यांनी आपल्या निधीतून
व ट्रस्टच्या माध्यमातून ग्रामीण रुग्णालये सक्षमीकरण करण्याचा कार्यक्रम हाती
घेतला असल्याचे सांगितले. गडहिंग्लज उप जिल्हा रुग्णालयास सर्व सुविधा देण्याचा
मानस असून गडहिंग्लज तालुक्याचा भौगोलिक रचनेचा विचार करता 100 खाटांचे उपजिल्हा
रुग्णालय दोनशे खाटांचे व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रशासनाच्या प्रयत्नामुळे कोरोनाचा फैलाव
नियंत्रणात आणण्यात यश येत असल्याचे आमदार राजेश पाटील यावेळी म्हणाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.