मंगळवार, २५ ऑगस्ट, २०२०

खासगी रुग्णालयात बेडची क्षमता वाढवा जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांचा आदेश

 

 



कोल्हापूर, दि. 25 (जिल्हा माहिती कार्यालय)- शहर परिसरातील खासगी रुग्णालयांनी बेडची क्षमता वाढवावी, असा आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आज संयुक्तपणे दिला आहे. ग्रामीण भागातील खासगी रुग्णालयांनाही याचप्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत.

   जिल्हाधिकारी श्री देसाई आणि महापालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने दिलेल्या आदेशात म्हटले आहे, शासन निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व रुग्णालयातील ८०% बेड कोव्हीड-१९ आणि सर्वसाधारण रुग्णांच्या उपचारासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत आणि महामारी रोग अधिनियम, १८९७ मधील तरतुदीनुसार कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील सोबतच्या सर्व खासगी व धर्मादाय रुग्णालयांनी कोव्हीड रुग्णांच्या उपचारासाठी आपली क्षमता व्हेंटीलेटर, एन आय व्ही, अतिरिक्त ऑक्सीजनेट बेड आणि अतिदक्षता विभाग वैद्यकीय साधनसामग्रीसह आठवड्याभरात वाढवावी.  रुग्णालयात कोविड उपचार सुविधा काटेकोरपणे देण्यास निर्देशित करण्यात येत आहे.

 सोबत परिशिष्ट अ मधील स्तंभ ३ ते ७ मध्ये नमूद केलेल्या विद्यमान क्षमतेपेक्षा अधिक क्षमता वाढवावी. या आदेशानुसार रुग्णालयांनी अतिरिक्त कोविड उपचार सुविधा निर्माण करण्यासाठी स्वत: च्या निधीचा वापर करावा. उपरोक्त निर्देशांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ (१८६० च्या ४५) नुसार रुग्णालयांवर कारवाई करण्यात येईल. तसेच नर्सिंग कायद्यांतर्गत रुग्णालयांची नोंदणीही  रद्द करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. संबंधित रुग्णालयांच्या व्यवस्थापनासाठी परिशिष्ट अ मधील स्तंभ १२ मध्ये नमूद केल्याप्रमाणे अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांना कारवाईचे अधिकारही प्रदान करण्यात आले आहेत.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.