गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०

धर्मादाय सह आयुक्त कार्यालयाकडून कोरोना रुग्णांसाठी व्हेंटिलेटर व ऑक्सिजन यंत्रे कार्यालयाचे काम इतरांसाठी प्रेरणादायी - पालकमंत्री सतेज पाटील

 


            कोल्हापूर, दि. 20 (जिल्हा माहिती कार्यालय) :- जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांसाठी धर्मादाय सह आयुक्त कार्यालयाने 20 लाखाच्या निधीतून IMS BIPAP ही व्हेंटिलेटर, 15 ऑक्सिजन यंत्रे खरेदी करुन जिल्हा प्रशासनाकडे सूपूर्द केली आहेत. सामजिक उत्तरदायित्वाच्या भावेतून धर्मादाय आयुक्त कार्यालयाने केलेले कार्य इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले आहे.

            कोल्हापूर धर्मादाय सह आयुक्त, कार्यालय (सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय) यांच्यावतीने कोरोनाग्रस्तांसाठीच्या व्हेंटिलेटर बाय पॅप हे यंत्र जिल्हा प्रशासनाकडे पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी धर्मादाय सह आयुक्त शशिकांत हेर्लेकर, सहाय्यक धर्मादाय आयुक्त रामदास याबळे व सहाय्यक धर्मादाय आयुक्त रुपाली कोरे आदी उपस्थित होते.   

            धर्मादाय सह आयुक्त कार्यालयाच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. सामुदायिक विवाह सोहळा, गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, वृक्षारोपण, बंदीजनांसाठी मोफत आरोग्य तपासणी, महापालिका शाळांची रंगरंगोटी अशा अनेक सामाजिक उपक्रमांचा यामध्ये समावेश आहे. २०१९ साली कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरावेळी धर्मादाय कार्यालयाच्या वतीने पूरग्रस्त सहाय्यता समिती नेमून या समितीमार्फत पूरग्रस्तांना सर्व प्रकारची मदत केली होती. त्यातील काही निधी शिल्लक राहिला होता. यानिधीतून जिल्ह्यातील कोरोनागस्तांसाठी ही मदत करण्यात आली.

            पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, कोल्हापूर धर्मादाय आयुक्तालयाचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. या कार्यालयाने आपल्या दानशूर कृतीतून एक वेगळा ठसा महाराष्ट्रात निर्माण केला आहे. नागरिकांनी कोरोनाचा समूह संसर्ग टाळावा तसेच लक्षणे आढळल्यास तात्काळ जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध यंत्रणेकडून तपासणी करुन घ्यावी, असे आवाहनही त्यांनी  केले.

कोल्हापूरचे दातृत्व वाखाणण्याजोगे- जिल्हाधिकारी

            जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची आपत्ती आल्यास या आपत्तीमध्ये मदतीसाठी नेहमी कोल्हापूरकर अग्रेसर असतात. कोल्हापुकरांचे दातृत्व वाखाणण्याजोगे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले. धर्मादाय सह आयुक्त शशिकांत हेर्लेकर यांनी धर्मादाय कार्यालयाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. अधीक्षक शिवराज नाईकवाडे यांनी स्वागत व प्रस्तावना करताना दानशूर संस्थांनी या उपक्रमात अधिकाधिक सहभागी होण्याचे आवाहन केले. 

            कार्यक्रमाला धर्मादाय उप आयुक्त- प्रदिप चौधरी, पूरग्रस्त सहाय्यता निधी समितीचे अध्यक्ष भरत ओसवाल, उपाध्यक्ष किशोर शहा, सचिव- अॅड अमित बाडकर, चॅरिटी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. वैभव पेडणेकर, उद्योगपती व्ही. बी. पाटील, अॅड प्रविण कदम, अॅड. डी. एस. पाटील यांच्यासह सर्व समिती सदस्य य धर्मादाय आयुक्त कार्यालयातील सर्व कर्मचारी, वकील आदीजण उपस्थित होते.

 00 0 0 0  0

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.