गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०

साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा स्थानिक स्वराज्य संस्थांनी विसर्जनाबाबत सूक्ष्म नियोजन करावे -पालकमंत्री सतेज पाटील विधायक उपक्रम राबविण्याबाबत मंडळांचाही प्रतिसाद

 





कोल्हापूर, दि. 20 (जिल्हा माहिती कार्यालय) :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा. उत्सव साजरा करताना मंडळाने आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे. यंदाच्या गणेशोत्सवात मूर्तीची प्रतिष्ठापना शक्यतो मंडळाच्या कार्यालयात व तालमीच्या कार्यालयात करावी. गणेश विसर्जनासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी सूक्ष्म नियोजन करावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.

पालकमंत्री श्री. पाटील यांनी आज गणेशोत्सव व मोहरम सण साजरा करण्याबाबत शांतता कमिटीच्या सदस्यांशी व्हीडीओ कॉन्फरंसिंगद्वारे  संवाद साधला. पालकमंत्री यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत विधायक उपक्रम राबवून गणेशोत्सव व मोहरम साजरा केला जाईल, असे आश्वासन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिले.

पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हास्तरीय शांतता कमिटीची ही बैठक झाली. बैठकीस महापौर निलोफर आजरेकर,  जिल्हाधिकारी दौलत  देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्यासह शांतता कमिटीचे सदस्य व्हीसीद्वारे सहभागी झाले.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, गणेशोत्सव हा मांगल्याचा आणि आनंदाचा सण. जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र यंदा कोरोनाची साथ असल्याने हा सण साधेपणाने साजरा करुन जिल्ह्यात एक वेगळा आदर्श निर्माण करावा. शक्यतो गणेश मंडळांच्या व तालमीच्या कार्यालयात गणेश मूर्ती प्रतिष्ठापना कराव्यात.

 शक्य नसल्यास 15 बाय 15 फूट मंडप घालून गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यास यावेळी सांगितले. जिल्ह्यात गणेश मूर्तीकार यांच्याकडून घरगुती गणेश मूर्ती किती देण्यात आल्या याबाबात माहिती गोळा करावी. जेणेकरुन प्रशासनाला किती घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यास नियोजन करणे शक्य होईल.

दीड दिवसाचा गणपती बसवावा-जिल्हाधिकारी

   जिल्हाधिकारी श्री देसाई, म्हणाले, दीड दिवसाचा गणपती बसविण्यास प्राधान्य द्यावे. जास्ती गर्दी होणार नाही. आज कोरोना बाधित मृत्यूमुखी पडले आहेत, हे त्यांच्या कुटुंबावर आलेलं संकट नसून आपल्यापैकीच भाऊबंधांवर आलेलं संकट समजावे. घरात एखादी दुर्घटना घडलेली असते, त्यावेळी दीड दिवसाचा गणपती बसवला जातो. त्याच धर्तीवर आपण दीड दिवसाचा गणपती बसवण्यास प्राधान्य द्यावे. पुढच्या वर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन केले. गणेशोत्सव व मोहरम सण साजरा करताना शासनाने दिलेले नियम व अटीचे मंडळ व कार्यकर्त्यांनी पालन करावे. सण, उत्सव साजरे करताना कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्याकरिता सामाजिक अंतर ठेवण्याबरोबरच मास्कचा वापर करावा. गणेशोत्सवात सामाजिक उपक्रम राबवून अनावश्यक खर्च टाळावेत. 

            आयुक्त श्री. कलशेट्टी म्हणाले, गणेश मूर्ती विसर्जन करिता प्रत्येक वॉर्ड/प्रभाग निहाय शहरात विसर्जन कुंड ठेवण्यात येणार असून, विसर्जना दरम्यान दान करण्यात येणा-या गणेश मूर्तींचे कोल्हापूर महानगरपालिकेव्दारे योग्य प्रकारे नियोजन करण्यात येणार आहे. या कालावधीत जमा होणाऱ्या निर्माल्यापासून खत तयार करण्यात येईल जेणेकरून जल प्रदूषण रोखण्यास मदत होईल असेही ते म्हणाले.

            खासदार धैर्यशिल माने म्हणाले, एक गाव एक गणपती साजरा करताना सक्ती नसावी, तसेच जी गणेश मंडळे उत्सव साजरा करणार नाहीत व प्रशासनास सहकार्य करणार आहेत त्या गणेश मंडळांचा सत्कार करण्यात यावा.

            आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, कोरोनाचा प्रार्दुभाव व संसर्ग रोखण्यासाठी सर्व गणेश मंडळांनी गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना झाल्यावर ऑनलाईन दर्शन व आरती करावी जेणेकरुन लोक बाहेर पडणार नाहीत.

आमदार चंद्रकांत जाधव म्हणाले, सर्व गणेश मंडळांनी कोरोना प्रार्दुभाव व संसर्ग होवू नये या करिता शासनाने दिलेल्या नियमांचे तंतोतत पालन करावे. तसेच सर्व गणेश मंडळांनी आपल्या मंडपामध्ये स्थानिक डॉक्टर, ऑक्सीमिटर, सॅनिटायझर यांचा वापर करावा जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग होणार नाही.

संजय पवार म्हणाले, गणेशोत्सव कालावधीत घरगुती गणेश मूर्ती विसर्जनाचे योग्य ते नियोजन करावे.  जेणेकरून गणेश मूर्तीची विटंबना होणार नाही व विधीपूर्वक योग्य ठिकाणी विसर्जन करावे.

                                   

बाबा पार्टे म्हणाले, आम्ही सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी शासनाने दिलेले नियम व अटी यांचे तंतोतंत पालन करणार आहे. मोहरम सणात खाई फोडण्याच्या कार्यक्रमास गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. 

शासनाने दिलेल्या अटी व नियम हे मान्य असून त्याचे पालन करु.गणेश मूर्ती विसर्जन करीता कोटीतीर्थ तलाव बंद करण्यात आलेला असल्याचे दुर्गेश लिंग्रज म्हणाले.  राजारामपुरी येथील नागरिकांसाठी शाळा नं. 09 व राजारामपुरी 1 गल्ली येथील गार्डन येथे विसर्जन कुंड ठेवण्यात येणार याठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी

महेश जाधव म्हणाले, ज्या सार्वजनिक गणेश मूर्तीची उंची 4 फूट आहे. अशा मूर्ती विसजर्नाची व्यवस्था वेगळी करावी.

श्री.अत्तार म्हणाले, जिल्ह्यात ज्या प्रमाणे रमजान ईद व बकरी ईद साध्या पध्दतीने साजरा करुन त्यातून उपलब्ध झालेल्या निधीमधून सीपीआर व आय जी एम हॉस्पीटल यांना खर्च केले त्याप्रमाणे गणेश मंडळांनी आपला निधी उपलब्ध करुन ऑक्सीमिटर, सॅनिटायझर व मास्कची खरेदी करावी तसेच गरीब गरजू लोकांना धान्य वाटप करावे.  श्री. मुजावर म्हणाले, मोहरम सण साजरा करताना कोणीही नैवेद्य आणू नयेत. 

 शासनाने केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन मोहरम व गणेशोत्सव सण साजरे केले जातील, असे आवश्वासन जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीमध्ये उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी दिले.

            यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, इचलकरंजीच्या नगराध्यक्षा अलका स्वामी, जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉ. निता माने, गडहिंग्लज नगराध्यक्षा स्वाती कोरी, इचलकरंजीचे प्रातांधिकारी डॉ. विकास खरात, गडहिंग्लजचे प्रांताधिकारी विजया पांगारकर, इचलकरंजी नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष खांडेकर, बाबा पार्टे, बंडा साळोखे, हर्षल सुर्वे, विश्वास देशमुख, संजय पवार, राजू लाटकर, दुर्गेस लिंग्रज, महेश जाधव, आर के पोवार,.गणी आजरेकर, कादर मलवारी, जाफर बाबा, प्रा. शहाजी कांबळे, शिवजी व्यास इचलकरंजी, भरतराम छाबडा, बाळासाहेब ओझा,  हारुण सय्यद, कोल्हापूर तसेच इचलकरंजी शहरातील गणेश मंडळांचे पदाधिकाऱ्यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे बैठकीस उपस्थिती नोंदवली.

पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी स्वागत केले. तर अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी आभार मानले.

 00 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.