कोल्हापूर,
दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय): हेरे सरंजाम जमिनीच्या प्रश्न सोडवणुकीमुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पहायला
मिळत आहे. हेरे सरंजाम प्रश्नासारखाच जिल्ह्यात देवस्थान जमिनीचा प्रश्न मोठा असून
या पुढील काळात हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. त्यासाठी लोकप्रतिनिधी,नागरिकांनी
सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले.
हेरे (ता.चंदगड ) येथे हेरे सरंजाम जमिनी
वर्ग 2 चे वर्ग 1 केलेल्या दुरुस्त 7/12
वाटपाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमास खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील,
उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर, चंदगडचे तहसीलदार विनोद रणवरे, गडहिंग्लजचे
तहसिलदार दिनेश पारगे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, हेरे संरमजान जमिनीचा 7/12 नसल्याने शेतकऱ्यांची कुचंबना होत होती.
जमिनीचा मालकी हक्क नाही या दुःखातही शेतकरी त्याच शेतात राबत होता. मालकी हक्क नसल्याने या शेतीवर कर्ज काढता येत
नाही, तारण नाही, भावाभावात वाटणीही करता येत नाही आणि मोजणीही करता येत नाही शा
संकटात तो अडकला होता. या साऱ्या विवंचनेतून शेतकऱ्याला मुक्त करण्यासाठी जिल्हा
प्रशासनाने जानेवारीमध्ये कालबद्ध कार्यक्रम आखला. त्यानुसार हेरे सरंजाम
जमिनीच्या कामासाठी आठ उपजिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली आठ पथके स्थापून
कामकाजास सुरवात केली.
जिल्हाधिकारी म्हणाले, हेरे सरंजाम जमिनीचे
काम करताना लोकांनी आपल्याकडे येऊ नये, आपण लोकांकडे जावे असे धोरण आखून कामकाज
करण्यात आले. त्यानुसार 56 गावे-वाड्यामधील शेतकऱ्यांकडून केवळ अर्ज भरून घेण्यात
आले. महसूल विभागाकडे व अन्य कार्यालयाकडे या संदर्भात असलेली माहिती, पुरावे
संकलित करुन शेतकऱ्यांच्या हेरे संरजाम जमिनीचे काम करण्यात येत आहे.
काम सुरु असताना जिल्ह्यात कोव्हिड-19 च्या
प्रादुर्भावास सुरुवात झाली. मात्र महसूल यंत्रणेने कोरोनाच्या कामाबरोबरच हेरे
सरंजाम जमिनीचे काम सुरु ठेवले. आतापर्यंत 3 हजार 613 शेतकऱ्यांच्या हेरे जमीन
संदर्भात कामकाज पूर्ण झाले आहे.उर्वरित कामही गतीने पूर्ण केले जाईल, असेही
जिल्हाधिकारी म्हणाले. जिल्ह्यातील देवस्थान जमिनीचा प्रश्न मोठा आहे. यामध्ये
नोंदणी झालेले व नोंदणी न झालेल्या जमिनीचा प्रश्न आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी जिल्ह्यातील
लोकप्रतिनिधींनी, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
शेतकऱ्यांच्या जीवनात सोन्याचा दिवस- खासदार संजय
मंडलिक
हेरे सरंजाम जमिनी वर्ग 2 चे वर्ग 1 केलेल्या
7/12 दुरुस्तीच्या कामामुळे या शेतकऱ्यांच्या जीवनात आज सोन्याचा दिवस उगवला आहे.
या शेतकऱ्यांना एक प्रकारे महसुली स्वातंत्र्य मिळाले, असे म्हणणे वावगे ठरणार
नाही. महसूल विभागाने हेरे सरंजाम जमिनीचा धडक कार्यक्रम राबवून शेतकऱ्यांप्रती
असलेले आपले उत्तरदायित्व जपले आहे. या कामाबद्धल त्यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई
यांचे अभिनंदन केले. तसेच जिल्ह्यातील देवस्थानच्या जमिनीचा प्रश्न सोडविण्यासाठी
पुढाकार घ्यावा असे आवाहन केले
महसूल विभागाने हेरे सरंजाम जमिनी वर्ग 2
चे वर्ग 1 करून शेतकऱ्यांना या
स्वातंत्र्य दिनी भेट दिली आहे. याबद्धल आमदार श्री. पाटील यांनी जिल्हाधिकारी
दौलत देसाई यांचे आभार मानले. शेतकऱ्यांचे अन्य प्रलंबित प्रश्नही मार्गी लावून जिल्ह्यातील
देवस्थान जमिनींचे प्रश्नही सोडवावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
उप विभागीय
अधिकारी श्रीमती पांगारे यांनी हेरे सरंजाम जमिनी वर्ग 2 चे वर्ग 1 करण्यासंदर्भात
केलेल्या व सुरु असलेल्या कामाची माहिती दिली. जिल्हाधिकारी यांनी जनतेमध्ये जावून
काम करा या दिलेल्या सुचनेनुसार कोणत्याही शेतकऱ्यांना त्रास होणार नाही या
दृष्टिने कामकाज करण्यात असल्याचे त्या म्हणाल्या. गेले सात महिने हेरे सरंजाम जमिनी वर्ग 2 चे
वर्ग 1 करण्यासाठी आठ पथकामार्फत 128 अधिकारी-कर्मचाऱ्यांमार्फत काम सुरु असल्याचे
श्रीमती पांगारकर म्हणाल्या.
हेरे सरंजाम
जमिन शेतकरी लाभार्थी गुरुप्रसाद गावडे, महादेव प्रसादे यांनी आपले मनोगत
व्यक्त केले.
कार्यक्रमात लक्ष्मण बाबू वंजारे, उमाजी
तानाजी नाईक, सुनीता लक्ष्मण पवार, श्रीपाद कृष्णाजी तेलंग, ईश्वर कृष्णा गावडे, साताप्पा
शिवलिंग प्रसादे, गुरुप्रसाद पांडुरंग गावडे या शेतकऱ्यांना हेरे सरंजाम जमीन वर्ग
2 चे वर्ग 1 केले बाबतचे 7/12 उतारे प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित मान्यवरांच्या
हस्ते देण्यात आले.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.